रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (17:11 IST)

वैष्णवी पाटीलः लाल महालात लावणी, नाराजीनंतर मागितली माफी

vaishanavi  lavani
Instagram
छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तव्य लाभलेल्या लाल महालमध्ये इन्स्टाग्रॅम स्टार वैष्णवी पाटीलने लावणी केल्याने मोठा गदारोळ माजला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या वैष्णवी पाटीलने आपल्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवरून सर्वांची माफी मागितली आहे.
 
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेस ठेच पोहचवण्याचा माझा कधी हेतू नव्हता आणि पुढेही नसेल. अज्ञानातून माझ्याकडून ही चूक घडली. मला चूक मान्य असून यासाठी मी सर्वांची जाहीर माफी मागते," असं वैष्णवी पाटीलने माफीनाम्यात म्हटलं आहे.
 
वैष्णवी पाटीलचा लाल महालातील लावणी डान्स समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.
 
अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन हा प्रकार योग्य नसल्याचं म्हटलं.
 
दरम्यान, लाल महालात डान्स केल्याप्रकरणी वैष्णवी पाटीलवर पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
 
पण, वैष्णवीने हे प्रकरण अंगलट येत असल्याचं पाहून तत्काळ सर्वांची माफी मागितली आहे. आता शिवप्रेमी आणि राजकीय संघटना या प्रकरणावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
 
काय आहे प्रकरण?
वैष्णवी पाटील ही इन्स्टाग्रॅम स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिच्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर 9 लाख 62 हजार फॉलोअर्स आहेत. विविध गाणी व डायलॉग यांच्यावर लिपसिंक तसंच नृत्य करणं, यासाठी ती प्रसिद्ध आहे.
 
वैष्णवी पाटीलने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रॅमवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. यामध्ये ती पुण्याच्या लाल महालात मध्यवर्ती ठिकाणी लावणीवर नृत्य करताना दिसते.
 
लाल साडी आणि दागदागिने परिधान करून प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर वैष्णवीने हे नृत्य केलं.
 
वैष्णवीने हा व्हीडिओ तिच्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर प्रसिद्ध करताच त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लाल महालात केलेल्या या नृत्यावर लोकांच्या बहुतांश नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहून वैष्णवीने हा व्हीडिओ तत्काळ डिलीट केला.
 
पण संभाजी ब्रिगेडने या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
 
शिवप्रेमींकडून संताप
"पुणे महानगरपालिकेने लाल महाल लोकांसाठी बंद ठेवला. मात्र तिथे सिनेमातील गाण्यांवर तसेच तमाशातील गाण्यांवर डान्स करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. इतकी वाईट अवस्था लाल महालाची झाली आहे. महाराष्ट्राच्या स्मृतीस्थळावर असं बिभत्स पद्धतीने गाणं वाजवलं जातं, डान्स केला जातो. मला पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विनंती करायची आहे, तुम्ही याच जातीने लक्ष घालून फरासखाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या", अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली.
 
दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालाचं शुद्धीकरण करण्यात आलं. ज्याठिकाणी वैष्णवी पाटीलने नृत्याचं शूटिंग केलं, तिथं गोमूत्र तसंच गुलाबपाणी शिंपडून मराठा महासंघाने शुद्धीकरण केलं. तसंच यावेळी माता जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
 
अटकेची मागणी
एका फालतू रिलसाठी वंदनीय छत्रपतींच्या स्मृतींनी पावन झालेल्या वास्तूत लावणी करून त्याचे पावित्र्य भंग करणाऱ्या दोषींना फक्त अटक नाही तर तात्काळ कारवाई करून अद्दल घडेल असा धडा पुणे पोलिसांनी शिकवावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून केली.
 
वाघ यांच्याप्रमाणेच मंत्री आण राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.
 
"पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका", असं आव्हाड म्हणाले.
 
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने तर वैष्णवी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली.
 
"लाल महाल ही पुण्यातील ऐतिहासिक भूमी आहे. जिथे जिजाऊंनी शिवरांयांना स्वराज्याचे धडे दिले. त्याच लाल महालात अशा प्रकारचं कृत्य करणं लज्जास्पद आहे. महिला दिनाला याच महालात आम्ही आदर्श पुरस्कार दिले. याच ठिकाणी पारंपरिक आणि ऐतिहासिक कार्यक्रम होतात. याआधी अशा प्रकारचं कृत्य कधीही घडलं नाही. त्यामुळे यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही वैष्णवीवर कारवाई करण्याची मागणी केली.
 
ते म्हणाले, "ऐतिहासिक लालमहालात नाच-गाण्यांचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा. ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची व महाराष्ट्राची अस्मिता आहे."
 
वैष्णवी पाटीलचा माफीनामा
लाल महालात नृत्य केल्याप्रकरणी इन्स्टाग्रॅम स्टार वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
लाल महालामध्ये लावणी नृत्य सादर करून त्याची ध्वनीचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित करून भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली.
 
प्रकरण अंगलट येत असल्याचं पाहून वैष्णवी पाटीलने तत्काळ एक व्हीडिओ तिच्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर प्रसिद्ध केला. यामध्ये तिने आपली चूक मान्य करून सर्व शिवप्रेमींची माफी मागितली.
 
माफीनाम्यात वैष्णवीने म्हटलं, "एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे. काही दिवसांपूर्वी लाल महालात मी चंद्रा गाण्यावर व्हीडिओ केला होता. मी जेव्हा तो व्हीडिओ केला तेव्हा माझ्या ध्यानीमनीही पुढे असं काही होईल याचा विचार आला नाही. कुणाचंही मन दुखावण्याचा, शिवप्रेमींचं मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी स्वतः एक शिवप्रेमी आहे. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली हे मला कळलं.
 
"ज्या क्षणी मला माझ्याकडून चूक झाली हे कळलं त्याक्षणी मी तो व्हीडिओ डिलीट केला होता. परंतू मी तो व्हीडिओ डिलीट करण्याआधीच माझ्या चाहत्यांनी तो व्हीडिओ व्हायरल केला. मी सर्वांना तर सांगू शकत नाही, पण मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो व्हीडिओ डिलीट केला. आत्ताही मी माझ्या चाहत्यांना व्यक्तिगतपणे तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगत आहे," असं आवाहन वैष्णवीने केलं.
 
"माझ्याकडून लालमहालात लावणी व्हीडिओ शूट करण्याची चूक झाली आहे. माझ्या मनात काहीच नव्हतं. मी जाणूनबुजून केलं असंही नाही. असा विचार मी माझ्या स्वप्नातही करू शकत नाही. गाणं चांगलं होतं म्हणून मी तो व्हीडिओ केला. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली. ही चूक मी मान्य करते. तुमच्याप्रमाणेच मीही एक शिवप्रेमी आहे. सर्व शिवप्रेमी आणि माझ्या चाहत्यांची मी माफी मागते. तसेच जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेला धक्का बसेल असा माझा हेतू नव्हता," असं म्हणत वैष्णवीने सर्वांची माफी मागितली आहे.
 
या मुद्द्यावर राजकारण करू नका - सुरेखा पुणेकर
दरम्यान लावणी सम्राज्ञी यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "लावणीसाठी भरपूर व्यासपीठ दिले आहेत. वैष्णवीने ऐतिहासिक ठिकाणी लावणी करायला नको होती. पण यावरुन जे राजकारण सुरु आहे. लावणी महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे त्यावरुन राजकारण करु नका. हे चुकीचं आहे.