शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (13:31 IST)

विकास दुबे : कानपूर एन्काऊंटरमधला मोस्ट वॉन्टेड उज्जैनमध्ये सापडला

-समीरात्मज मिश्र
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये बिकरू गावातील चकमकीत 8 पोलिसांच्या हत्येला जबाबदार ठरवण्यात आलेल्या विकास दुबे यांना मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून अटक करण्यात आली आहे.
 
उज्जैनच्या महाकाल मंदिर ठाण्यात त्यांच्या अटकेची नोंद करण्यात आली आहे. विकास दुबे महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सुत्रांकडून मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
 
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
मागच्या आठवड्यात झालेल्या या चकमक प्रकरणी चौबेपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रमुख विनय तिवारी आणि पोलीस उपनिरीक्षक के. के. शर्मा यांनाही अटक करण्यात आली आहे.
 
तत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा विकास दुबेचा सहकारी अमर दुबे याला एसटीएफने हमीरपूरमध्ये एका चकमकीदरम्यान कंठस्नान घातलं होतं.
 
याप्रकरणी कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. "संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांवर विकास दुबे याच्याशी संबंध ठेवणे, चकमकीदरम्यान पोलिसांचा जीव धोक्यात घालणे आणि घटना स्थळावरून पळून जाणे अशा कारणांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असं कुमार यांनी सांगितलं.
 
नुकतेच चौबेपूर पोलीस ठाण्यातील सगळ्या 68 कर्मचाऱ्यांची चौकशी करून याबाबत जाब विचारण्यात आला होता. तसंच ठाण्यातील पूर्ण पोलीस यंत्रणा बदलण्यात आली आहे.
 
एसओ विनय तिवारी आणि पोलीस उपनिरीक्षक के. के. शर्मा यांना घटनेनंतर तातडीने निलंबित करण्यात आलं होतं.
 
विकास दुबेचा निकटवर्तीय ठार
मंगळवारी रात्री उशिरा विकास दुबे याचा प्रमुख सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमर दुबे याला हमीरपूरजवळ झालेल्या एका चकमकीत एसटीएफने ठार केलं.
 
याप्रकरणी काही संशयास्पद पोलीस कर्मचाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. पण मुख्य आरोपी विकास दुबे अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.
 
पोलिसांना मारण्याचं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी बुधवारी म्हटलं. पण विकास दुबेबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशांत कुमार चाचपडताना दिसले.
 
हमीरपूरमध्ये मारला गेलेला अमर दुबे बिकरू गावचाच रहिवासी होता. विकास दुबेच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात येत आहे. पोलिसांवर हल्ला चढवणाऱ्या गुन्हेगारांचं एनकाऊंटर केलं जात आहे. अमर दुबे याच्यावर 50 हजारांचं बक्षीस होतं. त्याच्याकडून 32 बोरची पिस्टल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत, असंही कुमार यांनी सांगितलं.
 
याशिवाय श्यामू वाजपेयी, जहान यादव आणि संजीव दुबे या आणखी काही आरोपींना कानपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. जहान यादव याचं नाव एफआयआरमध्येही आहे.
 
फरीदाबादच्या खिरीपूरमध्ये कार्तिकेय उर्फ प्रभात, अंकुर आणि श्रवण यांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. याशिवाय नोएडा आणि बुलंदशहरमध्येसुद्धा चकमक झाली. यात आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे, असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं.
 
फरीदाबादमध्ये विकास दुबे लपलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचं सांगितलं जातं होतं. पण चकमकीआधीच तो तिथून पळून जाण्यास यशस्वी ठरला.
 
कानपूर पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबेची एक सून, शेजारी आणि मोलकरीण यांना अटक केली आहे.
 
पोलिसांच्या मते, या तिघांनी विकास दुबेला पळून जाण्यात मदत केली होती. शिवाय हे तिघे पोलिसांच्या हालचालींबाबत विकास दुबे याला सातत्याने माहिती पुरवत होते.
 
शनिवारी विकास दुबेचं बिकरू गावातलं वडिलोपार्जित घर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या लखनऊमधील घरातही तपासणी सुरू आहे.
 
लखनऊ विकास प्राधिकरणातून काही लोक घराची कागदपत्रं पाहण्यासाठी आले होते. त्यांना ती दाखवण्यात आली, असं विकास दुबेची आई सरला दुबे यांनी सांगितलं होतं. पण लखनऊ विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं सांगितलं.
 
पोलीस विभागांतर्गत चौकशीही सुरू
विकास दुबे याला पकडण्याच्या प्रयत्नात त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्याची कारवाई सुरू असतानाच पोलीस प्रशासनाकडून विभागांतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
 
विकास दुबेला कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहिती देण्याचं काम पोलिसांपैकी कुणी केलं का, याची चौकशी केली जात आहे.
 
या अंतर्गतच मंगळवारी चौबेपूर ठाण्याच्या 68 पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती.
 
मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारने चार आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये एसटीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक अनंत देव यांचासुद्धा समावेश आहे.
 
अनंत देव यांची बदली मुरादाबादच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. ते काही दिवसांपूर्वीच कानपूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक पदावरून पदोन्नती आणि बढती मिळून एसटीएफला आले होते.
 
बिकरू गावात झालेल्या चकमकीदरम्यान मृत्युमुखी पडलेले डीवायएसपी देवेंद्र मिश्र यांनी विकास दुबे याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मार्च महिन्यात एक पत्र लिहिलं होतं. त्यावेळी अनंत देव हेच कानपूर पोलिसांत वरिष्ठ पोलीस अधीक्षक होते.
 
त्यावेळी या पत्राबाबत कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, असं विचारलं जात आहे. त्यामुळे अनंत देव यांचीही चौकशी होऊ शकते. चकमकीत सहभागी आरोपींचा शोध आणि चौकशी एसटीएफकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच अनंत देव यांची बदली तिथून दुसरीकडे करण्यात आली आहे.