मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2019 (10:35 IST)

फोक्सवॅगन बीटल: जगाच्या लाडक्या कारची निर्मिती कायमची बंद

तुम्हाला फोक्सवॅगनची बीटल गाडी आठवते? लहान कीटकासारखा आकार, मोठे डोळे म्हणजेच हेडलाइट्स आणि तिचं ते छोटुसं रूप जे कुठल्याही रंगात छान दिसतं. म्हणूनच जगभरात सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्यांपैकी बीटल एक होती.
 
10 जुलैला फोक्सवॅगनने अखेरची बीटल गाडी आपल्या कारखान्यातून रवाना केली. यानंतर या आयकॉनिक गाडीची निर्मिती होणार नाही, हे कंपनीने आधीच स्पष्ट केलं होतं.
 
ही गाडी एकेकाळी जगात सर्वांत विकली जाणारी गाडी होती. आणि तिच्या क्यूट रूपामुळे अनेकांनी या गाडीला ती बंद पडल्यावरही जपून ठेवली, कुठल्या ना कुठल्या रूपात.
 
फोटोग्राफर डॅन गियानोपलोस हे मेक्सिकोत फिरत होते, तेव्हा तिथं या गाडीविषयी लोकांमध्ये विलक्षण प्रेम आणि आवड असल्याचं त्यांना जाणवलं.
 
ऑटोमोबाईल क्षेत्राचा इतिहास पाहिला तर फोक्सवॅगन बीटलला नेहमीच चाहत्यांचं प्रेम लाभल्याचं लक्षात येतं. जर्मनीत तयार झालेली बीटल मेक्सिकोच्या संस्कृतीचा भाग कधी झाली, हे तिथल्या लोकांना कळलंही नाही.
 
ही गाडी साधारण 50 वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या बाजारात दाखल झाली. मेक्सिकोतल्या ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानं या गाडीची मागणी दिवसेंदिवस वाढतच गेली.
 
2003 मध्ये कंपनीने या मूळ मॉडेलचं उत्पादन बंद केलं. पण मेक्सिकोत आजही ही गाडी हमखास नजरेस पडते.
 
छोटे रस्ते, पार्किंग लॉट्स, ट्रॅफिक सिग्नल अशी सगळीकडे फोक्सवॅगन बीटल गाडी फिरताना दिसते. आणि एकात नाही तर वेगवेगळ्या, रंगीबेरंगी रूपात.