बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2019 (10:50 IST)

अबब! फेसबुकला अंदाजे 34 हजार कोटी रुपयांचा दंड

केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लीक प्रकरणात युझर्सच्या खाजगी माहितीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून फेसबुकला अमेरिकेने 5 अब्ज डॉलर्स (अंदाजे - 34,280 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.
 
अमेरिकेतल्या विविध माध्यमांनी ही बातमी दिली आहे. अमेरिकेची फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ही संस्था या गैरव्यवहाराचा तपास करत होती.
 
केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीवर आरोप होते की त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून 8 कोटी 70 लाख युझर्सच्या खाजगी डेटाचा गैरवापर केला. हाच डेटा या ब्रिटिश कंपनीने 2016 अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रंप यांना पुरवला, ज्याचा त्यांना फायदा झाला.
 
बीबीसीने FTC शी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर बोलायला नकार दिला.
 
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर झुकरबर्ग यांनी "या प्रकरणात आमचा विश्वासघात झाला आहे," असं म्हटलं होतं.
 
या प्रकरणाशी संबंधित सुत्रांनी वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत असा दंड ठोठावला आहे याची पुष्टी केली.
 
अर्थात फेसबुकला आपल्याला असा दंड होणार आहे याची आधीच कल्पना होती. या वर्षी एप्रिलमध्ये फेसबुक सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केलं होतं की डेटा चोरी प्रकरणात जे काही खर्च होतील किंवा दंड भरावे लागतील त्यासाठी आम्ही 3 अब्ज डॉलर्स बाजूला काढून ठेवले आहेत.
 
अमेरिकेच्या जस्टीस डिपार्टमेंटने या दंडावर शिक्कामोर्तब करणं अपेक्षित आहे. असं झाल्यानंतर कोणत्याही टेक्नोलॉजीसंबंधित कंपनीला झालेला हा सगळ्यांत मोठा दंड ठरेल.
 
केंब्रिज अॅनालिटिकावर नेमके आरोप काय?
"तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते जाणून घ्या," अशी पर्सनॅलिटी टाईप जाणून घेण्यासाठी निमंत्रण देणारी एक क्विझ 2014मध्ये फेसबुकवर टाकण्यात आली होती. ही क्विझ केली केंब्रिज विद्यापीठाचे अलेक्झांडर कोगन यांनी (विद्यापीठाचा केंब्रिज अॅनालिटिकाशी काहीही संबध नाही).
 
त्या वेळी अॅप्स आणि गेम्सचा वापर सर्रासपणे होत असल्यानं केवळ या क्विझमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीची नव्हे तर त्यांच्या मित्रांचीही संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ही क्विझ डिझाइन करण्यात आली होती.
 
डेटा डेव्हलपर अशा पद्धतीनं माहिती मिळवू शकणार नाही, याकरिता नंतरच्या काळात फेसबुकने बरेच बदल केले.
 
केंब्रिज अॅनालिटिकासोबत काम केलेले ख्रिस्तोफर विली यांनी हे उघडकीस आणत आरोप केला की, या क्विझमध्ये 2.70 लाख लोकांनी सहभाग घेतल्यानं त्यांच्या फेसबुक फ्रेंड्ससह जवळपास पाच कोटी लोकांची, विशेषतः अमेरिकेतील लोकांची, माहिती त्यांच्या मित्रांच्या नेटवर्कमधून मिळवण्यात आली होती, तेही त्यांची संमती न घेता.
 
फेसबुकचं म्हणणं आहे की ही माहिती केंब्रिज अॅनालिटिकाने कायदेशीररीत्या मिळवली असली तरी ती त्यांनी वेळेवर डिलीट केली नाही.
 
हे फेसबुकच्या नियमांविरोधात होतं का?
ही सगळी माहिती त्यावेळी फेसबुकचं व्यासपीठ वापरून गोळा करण्यात आली होती आणि अनेक डेव्हलपर्सनी त्याचा फायदा उठवला होता. पण ही माहिती इतरांना शेअर करण्याची त्यांना परवानगी नव्हती.
 
यात आणखी एक विशेष मुद्दा असा आहे की, ज्या लोकांनी पर्सनॅलिटी व्क्विझमध्ये सहभाग घेतला होता त्यांना अशी कुठलीही कल्पना नव्हती की, ते त्यांची खाजगी माहिती डोनल्ड ट्रंप यांच्या निवडणूक प्रचारासाठी शेअर करत आहेत.
 
फेसबुकचं म्हणणं आहे की, त्यांच्या नियमांचा भंग झाला होता हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी अॅप हटवलं आणि ती माहिती डिलिट करण्यात येईल, असं आश्वासन घेतलं.
 
केंब्रिज अॅनालिटिकाने दावा केला की, त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कधीही वापरली नाही आणि फेसबुकने सांगितल्यानंतर त्यांनी सगळी माहिती डिलिट करून टाकली.
 
ही माहिती योग्य पद्धतीनं मिटवण्यात आली की नाही, हे फेसबुक आणि युनायटेड किंगडमचे माहिती आयुक्त दोघंही जाणून घेऊ इच्छितात. पण असं काही एक करण्यात आलं नसल्याचा दावा विली यांनी केला.
 
तुमची ऑनलाईन माहिती कशी सुरक्षित ठेवाल?
इंटरनेटचा वापर करताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही दिलेल्या माहितीचा दुरुपयोग टळू शकतो.
 
तुमच्या फेसबुक खात्यावरून लॉग इन करा असं सांगणाऱ्या अॅप्सवर लक्ष ठेवा. बहुतेकदा तुमची माहिती गोळा करण्यासाठी ते वेगवेगळी परवानगी मागतात.
 
जाहिराती थांबवण्यासाठी अॅड ब्लॉकरचा वापर करा.
 
फेसबुकची सिक्युरिटी सेटिंग्स तपासत राहा. कोणत्या गोष्टी चालू आहेत ते पाहा. वैयक्तिक अॅपची सेटिंग तपासा. तुमचे मित्र कोणत्या गोष्टी पाहू शकतात हे पडताळा.
 
फेसबुकवरील तुमचा डेटा तुम्ही डाउनलोड करू शकता. जनरल सेटिंग्सच्या सर्वांत खाली डाउनलोड बटन असतं. पण तुमच्या काँप्युटर किंवा लॅपटॉपमधील डेटा हा फेसबुक डेटापेक्षा कमी सुरक्षित असतो. तुमचा लॅपटॉप हॅक केला तर त्यामधील सर्व माहीतीची चोरी होऊ शकते.