सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (18:11 IST)

कोरोना संदर्भात पुणे, नाशिकसह अन्य शहरांमध्ये काय आहेत नियम?

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी (21 फेब्रुवारी) दिवसभरात कोरोनाचे सात हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले.
 
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातल्या जनतेला संबोधित केले. जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर सर्वांनी कोरोनाला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
 
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे की नाही हे 8-15 दिवसांत कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना रोखण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
 
अकोला आणि अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर आणि अचलपूर या ठिकाणी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
राज्यातील इतर शहरांमध्येही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासंदर्भात काही नियम लागू करण्यात आले आहेत.
 
 
पुणे
पुण्यातील कोरोना प्रादूर्भावाचा आढावा घेण्यासाठी काल (21 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांची माहिती दिली.
 
28 फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहतील. 28 तारखेनंतर आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार
खासगी क्लासेस बंद राहतील.
स्पर्धा परीक्षा अभ्यासिका निम्म्या क्षमतेने सुरू राहतील.
हॉटेल, बार, रेस्टॉरंटला रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी
रात्री 11 पासून सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. भाजीपाला, फळ वाहतुकीला हे निर्बंध नाहीत.
 
हॉटस्पॉट्समध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करणार
ग्रामीण भागात कोव्हिड केअर सेंटर सुरू करणार
ससून रुग्णालयात चाचण्या वाढवणार
लग्न, संमेलन, खासगी, राजकीय कार्यक्रमासाठी 200 लोकांची परवानगी
लग्न समारंभासाठी पोलीस परवानगी लागणार
पुण्यातील कोव्हिड केअर सेंटर्स आणि जम्बो कोव्हिड केअर सेंटर गरज पाहून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
 
नाशिकमध्ये संचारबंदी
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत पुन्हा संचारबंदी लागू
शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई,
पोलीस आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने 1000 रुपये दंड वसूल करणार, गुन्हेही दाखल होण्याची शक्यता
गोरज मुहूर्तावर होणारे लग्न सोहळे न करण्याचे नागरिकांना आवाहन
अकोला-अमरावतीत लॉकडाऊन
अकोला आणि अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
 
अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर आणि अचलपूर या ठिकाणी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागून करण्यात आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा केली.
 
त्यानंतर अकोल्यातही आठवड्याभराचं लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा अकोल्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली.
 
अकोल्यातील अकोला महानगरपालिका, अकोट नगरपालिका आणि मूर्तीजापूर नगरपालिका या क्षेत्रात एक मार्च 2021 पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे.
 
या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
 
नागपूर
7 मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद, सर्व शाळा, कोचिंग सेंटर्स बंद राहणार आहेत.