शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (19:39 IST)

नाओमी ओसाका टेनिसः 23 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी नाओमी ओसाका तुम्हाला माहिती आहे का?

जान्हवी मुळे
बीबीसी मराठी प्रतिनीधी
तरुण, उत्साही, कोमल पण तेवढीच आक्रमक. टेनिसस्टार नाओमी ओसाकाचं वर्णन करायला हे शब्द पुरेसे ठरावेत. अवघ्या 23 वर्षांच्या वयात ओसाकानं चौथं ग्रँड स्लॅम विजेतेपद साजरं केलं आहे. तिनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर मात केली.
 
मेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेनामध्ये झालेला हा सामना ओसाकानं सरळ सेट्समध्ये 6-4, 6-3 असा जिंकला.
 
कोरोना विषाणूची साथ, मेलबर्नमधलं लॉकडाऊन, कधी प्रेक्षकांसह तर कधीकधी प्रेक्षकांविना झालेले सामने अशा अनिश्चित वातावरणात ओसाकानं दाखवलेली जिद्द आणि सातत्य याची सगळे वाहवा करत आहेत. तिच्या या विजयानंतर जणू टेनिसमध्ये ओसाका युगाची सुरुवात झाली आहे.
 
महिला टेनिसची नवी 'बॉस'
या स्पर्धेत उपांत्य फेरीत ओसाकानं सेरेना विल्यम्सचा धुव्वा उडवला होता. त्यानंतरच टेनिसमध्ये ही नव्या युगाची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली.
 
बेल्जियमची माजी टेनिसस्टार जस्टिन हेनानं ओसाकाचं कौतुक करताना "महिला टेनिसला नवी बॉस मिळाली" असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
 
ओसाकाच्या खात्यात आता दोन ऑस्ट्रेलियन विजेतीपदं जमा झाली आहेत. तिनं याआधी 2019 साली या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं.
 
त्याशिवाय 2018 आणि 2020 साली तिनं यूएस ओपनही जिंकलं होतं. 2019 साली ओसाका टेनिस महिला एकेरीच्या क्रमवारीत अव्व्ल स्थान गाठणारी ती पहिली आशियाई खेळाडूही बनली.
 
पण ओसाकाला टेनिस कोर्टवरच्या कामगिरीइतकीच कोर्टबाहेरची तिची वागणूकही महान खेळाडूंच्या यादीत नेऊन ठेवते. अमेरिकेची महानतम टेनिसस्टार बिली जीन किंगला म्हणूनच ओसाका इतरांपेक्षा वेगळी वाटते.
 
ओसाकाचं मिश्र वंशाचं असणं, मुक्तपणे आपले विचार मांडणं याचं बिली जीननं अनेकदा कौतुक केलं आहे.
 
खरी 'इंटरनॅशनल' आयकॉन
ओसाकाचे वडील लेओनार्ड फ्रान्स्वा हैटीचे तर आई तामाकी ओसाका जपानची आहे. तिची मोठी बहीण मरी ओसाकादेखील टेनिस खेळते.
 
सेरेना आणि व्हीनस विल्यम्सचा खेळ पाहून लेओनार्ड यांनी आपल्या दोन्ही मुलींना टेनिस शिकवायला सुरूवात केली होती. ओसाकाचा जन्म जपानच्या ओसाका शहरात झाला होता. पण तीन वर्षांची असल्यापासून अमेरिकेत राहिली आहे.
 
अमेरिकेत लहानाची मोठी झाली असली, तरी ती अजूनही जपानची नागरीक आहे आणि जपानचंच प्रतिनिधित्व करते. जपानसोबतच हैटीविषयीही तिनं प्रेम आणि अभिमान वेळोवेळी व्यक्त केला आहे.
 
गेल्या वर्षी यूएस ओपन जिंकल्यावर अधिकृत फोटो काढताना तिनं हैटी आणि आफ्रिकन वंशाचं प्रतिनिधित्व करणारा हेडबँड घातला होता. त्याच स्पर्धेत ओसाकाची एक वेगळी बाजू जगाला दिसून आली.
 
मास्कद्वारा फोडलेली वर्णभेदाला वाचा
आजच्या जमान्यात अनेकदा खेळाडू एखाद्या विषयावर मत प्रदर्शन करण्याचं टाळतात. पण वर्णद्वेष आणि वंशभेदाची चर्चा सुरु असताना नओमी शांत बसली नाही. तिनं टेनिस कोर्टवर या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आणि स्वतःच त्यातल्या काही प्रश्नांचं उत्तरही बनली. ओसाका गेल्या वर्षी यूएस ओपनमध्ये प्रत्येक सामन्यात एक वेगळा मास्क घालून खेळायला उतरली. काळ्या रंगाच्या त्या प्रत्येक मास्कवर अमेरिकेत पोलिसांकडून किंवा वर्णद्वेषातून मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तींची नावं लिहिली होती.
 
मग या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यांचे व्हीडियो संदेश पाठवत ओसाकाचे आभार मानले. स्पर्धेचं प्रसारण करणाऱ्या वाहिनीनं ते संदेश ओसाकाला दाखवले, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
 
अगदी दगडालाही पाझर फुटावा अशी ती कृती होती. कोरोना विषाणूच्या सावटाखाली रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या त्या स्पर्धेत एरवीसारखा प्रेक्षकांचा आवाज नव्हता. त्या विचित्र शांततेत ओसाकानं मूकपणे व्यक्त केलेला आवाज जणू घुमत राहिला.
 
ओसाकानं बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला हरवून ती स्पर्धा जिंकली. फायनलनंतर तिला विचारण्यात आलं, का या मास्कमधून कुठला संदेश देते आहेस? तिचं प्रत्युत्तर होतं, "तुम्हाला कोणता संदेश मिळाला?" लोकांनी हा मुद्दा विसरू नये, जितकी जास्त चर्चा होईल तितका लवकर बदल घडेल असं तिला वाटत असल्याचं ओसाकानं तेव्हा सांगितलं होतं.