शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (18:39 IST)

पारधी महिलेला उकळत्या तेलातून नाणं काढायला लावणारं प्रकरण नेमकं काय आहे?

उकळत्या तेलातून पाच रुपयाचं नाणं बाहेर काढण्यास सांगून पतीने पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा घेतल्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडल्याचे समोर आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चंदगुडे यांनी ही माहिती दिली आहे.
 
या संदर्भातील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची पडताळणी करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. तसंच पोलीसही या पती-पत्नीचा शोध घेत आहेत.
 
ही घटना घडण्याआधी संबंधित महिलेवर दोन जणांनी बलात्कार केला असून यात एका पोलिसाचाही समावेश असल्याचा कृष्णा चंदगुडे यांचा दावा आहे.
 
"संबंधित महिलेशी संपर्क झाला असून आज (22 फेब्रुवारी) संध्याकाळपर्यंत उस्मानाबाद अधीक्षक कार्यालयात या संपूर्ण प्रकरणाविरोधात गुन्ह्याची नोंद दाखल करणार आहोत," अशी माहिती कृष्णा चंदगुडे यांनी दिली.
 
यासंदर्भात बीबीसी मराठीने उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील पोलीस निरीक्षक गिद्दे यांच्याशी संपर्क साधला.
 
"आम्हालाही व्हीडिओच्या माध्यमातून असा प्रकार झाल्याचं कळलं आहे. आम्ही त्या महिलेचा शोध घेत आहोत. परांडा तालुक्यातील त्यांच्या घरी गेलो होतो, पण घरी कोणीही नव्हतं. नेमका प्रकार कधी घडला? महिलेवर काही अत्याचार झाले आहेत का? महिला नेमकी कुठली आहे? याचा शोध आम्ही घेत आहोत," अशी माहिती पोलीस निरीक्षक गिद्दे यांनी दिली.
 
प्रकरण काय आहे?
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये चुलीवर ठेवलेल्या कढईत उकळतं तेल आहे. चुलीसमोर एक महिला बसली आहे. या महिलेचा पती कॅमेऱ्यासमोर पाच रुपयाचं नाणं उकळत्या तेलात टाकतो आणि आपल्या पत्नीला हे नाणं तेलातून बाहेर काढण्यास सांगतो.
 
या दृश्याचे चित्रिकरण करत असताना महिलेचा पती आपल्या पत्नीला शिक्षा देत असल्याचंही सांगत आहे. व्हीडिओमधील भाषा पारधी समाजाची आहे.
 
पतीच्या आग्रहास्तव पत्नी उकळत्या तेलात हात टाकून नाणं बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण तिचा हात खूप भाजतो आणि ती ओरडते. व्हायरल झालेला व्हीडिओ या दृश्यासोबत थांबतो.
 
हा व्हीडिओ समोर आल्यानंतर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते संबंधित जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चंदगुडे यांचा महिलेशी थेट संपर्क झाला नसला तरी तिच्याकडून काही प्राथमिक माहिती मिळाल्याचा दावा केला आहे.
 
ते म्हणाले, "महिला काही दिवस घरी नसल्याने तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत पतीने तिची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि उकळत्या तेलातून पाच रुपयांचं नाणं काढण्यास सांगितलं."
 
व्हीडिओमधील पारधी भाषेतील संभाषण नेमके काय आहे?
हा व्हीडिओ पारधी भाषेतील असल्याने पती आणि पत्नीचं नेमकं संभाषण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पारधी समाजाच्या आणि समाजातील महिलांसाठी काम करणाऱ्या सुनीता भोसले यांना संपर्क साधला.
 
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले, "या व्हीडिओमध्ये पती पारधी समाजातील लोकांना भाईयो आणि बहिणींनो आपल्याकडे दिज नावाची प्रथा आहे. मी माझ्या पत्नीसोबत आज दिज प्रथेचं पालन करत आहे. मी तीला मारणार नाही. तोडणार नाही. पण तिचं पावित्र्य तिला सिद्ध करावं लागेल."
 
"तू पोलिसांबरोबर चार दिवस गायब होतीस. तू त्यांच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले. मी तिला विचारत आहे की तू असं काही केलं आहेस का?"
 
"पत्नी म्हणते- माझ्यासोबत असं काहीही घडलं नाहीय,"
 
"मग हे खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी तुला पावित्र्याची परीक्षा द्यावी लागेल. आपल्या प्रथेनुसार पाच रुपयाचं नाणं उकळत्या तेलात टाकलेलं आहे. हे नाणं काढताना तुझा हात भाजला नाही तर तू पवित्र आहेस असं मी समजेन,"
 
"महिलेने उकळत्या तेलात हात घातला आणि तिचा हात भाजला. त्यावर पती म्हणाला- बघा तिचा हात भाजला म्हणजे ती अपवित्र आहे."
 
महिला गुन्हा दाखल करणार?
पारधी समाजासाठी काम करणारे समाजिक कार्यकर्ते यशवंत फडतरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सध्या पती आणि पत्नी फरार आहेत. त्यांचा शोध घेत आहोत. व्हीडिओ परांडा तालुक्यातील असल्याची माहिती मिळते आहे."
 
सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चंदगुडे यांनी सांगितलं, "महिलेसंदर्भात माहिती मिळाली असून आज उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहोत."
 
महिलेची नेमकी ओळख पटली नसल्याने महिला कुठली आहे? कुठे राहते? याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
 
गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही या व्हीडिओची दखल घेतली आहे.
 
त्या म्हणाल्या, "गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी निवेदन देत असून याप्रकरणाची माहिती दिलेली आहे. उकळत्या तेलातून नाणं काढणं किंवा अशी शिक्षा देणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. या महिलेला संरक्षण आणि सहकार्य मिळाले पाहिजे. तसंच समुपदेशन करण्याचीही गरज आहे."
 
गृहमंत्री अनिल देशमुख तसंच पोलिसांकडून अद्याप यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.