शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (10:16 IST)

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद काय?

श्रीकांत बंगाळे
उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली. "सातारा येथे आमचे बंधू आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली, यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली," असं ट्वीट उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
 
उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशामागे त्यांचा आणि शिवेंद्रसिंह राजे यांच्यामधील वाद, हे इतर कारणांपैकी एक कारण असल्याचं सांगितलं जातं.
 
शिवेंद्रराजे आणि आपल्यात ठिणगी टाकणारे निघून गेल्यामुळे आता आपला काही वाद नाही असं उदयनराजे यांनी बीबीसीला म्हटलं आहे.
 
पण हा वाद नेमका काय होता? हा प्रश्न अनेकांचा मनात वारंवार येतो.
 
या वादाला एक इतिहास आहे. गोष्ट नव्वदच्या दशकातील आहे.
 
उदयनराजे भोसले यांचे काका अभयसिंह राजे भोसले काँग्रेसमध्ये होते. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक, रचनात्मक कामाला सुरुवात केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून संघटना उभी केली. कारखाना, दोन बँका उभ्या केल्या. अशापद्धतीनं हळूहळू त्यांनी राजकारणात पाय रोवायला सुरुवात केली होती.
 
याबाबत 2015च्या 'कालनिर्णय'च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी लिहिलं होतं : "अभयसिंह राजे यांचा हा उत्कर्ष कल्पनाराजे भोसले यांना खुपत होता. राजकारणातली सगळी जागा अभयसिंहांनी व्यापली तर आपल्या मुलाचं, उदयनराजेंचं काय, ही चिंता त्यांना सतावत होती. त्याच ईर्ष्येतून त्यांनी 1989मध्ये निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात हातपाय पसरू पाहणाऱ्या शिवसेनेला साताऱ्यातून राजघराण्यातील व्यक्ती उमेदवार म्हणून मिळाली.
 
"कल्पनाराजे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून साताऱ्यातून अभयसिंहराजे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या. परंतु अभयसिंह यांच्या संघटनापुढे त्यांचा निभाव लागला नाही."
 
त्यानंतर 1991मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. याच निवडणुकीत उदयनराजेंनी काका अभयसिंह राजेंच्या विरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं. स्वत: दोन वॉर्डातून उभे राहिलेले उदयनराजे एका वॉर्डातून निवडून आले आणि एकात त्यांचा पराभव झाला.
 
1996मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली.
 
"या निवडणुकीत उदयनराजे उमेदवार असतानाही अभयसिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला. त्यामुळे अभयसिंह राजे आणि उदयनराजे यांच्यात फूट पडली," चोरमारे लिहितात.
पुढच्या पिढीत वाद
 
1998ला लोकसभेची निवडणूक झाली. त्यात अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार असतानाही लोकसभेला उभे राहिले आणि निवडून आले. यामुळे मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथं पोटनिवडणूक घ्यावी लागली.
 
"अभयसिंह राजे लोकसभेत गेल्यानंतर सातारा विधानसभेची जागा आपल्याला मिळेल, अशी उदयनराजेंची अपेक्षा होती. परंतु अभयसिंहराजेंनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारतानाच पुत्र शिवेंद्रराजे यांच्या उमेदवारीची हमी घेतली होती. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी शिवेंद्रराजे यांना मिळाली.
 
"याच काळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष होतं. त्यांनी उदयनराजेंना हेरलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचं मन वळवलं. ते भाजपचे उमेदवार झाले. अभयसिंहराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या रूपानं एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी, असं सत्तेचं केंद्रीकरण दिसू लागलं. त्यातून उदयनराजेंच्या बाजूनं सहानुभूती निर्माण झाली आणि त्यांनी निवडणूक जिंकली," चोरमारे लिहितात.
 
1999ला विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी उदयनराजे यांच्यासमोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं. मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली. ते 22 महिने तुरुंगात होते. नंतर उदयनराजेंची यातून निर्दोष मुक्तता झाली.
 
"या खून खटल्यात अभयसिंहराजे यांनी आपल्याला गोवलं आणि आपली राजकीय कारकीर्द संपवली, असा आरोप उदयनराजेंनी केला. या प्रकरणानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद वाढीस लागला," असं 'पुण्य नगरी'च्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक विनोद कुलकर्णी सांगतात.
 
भावांचं मनोमिलन
2006ला सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निकाल त्रिशंकू लागला. 19 जागा उदयनराजेंच्या आघाडीला, 18 जागा शिवेंद्रराजेंच्या आघाडीला तर 2 जागा विरोधकांना मिळाल्या.
 
"त्यावेळेस या राजघराण्यातील ज्येष्ठ असलेल्या शिवाजीराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सगळं घराणं एक करायचं ठरवलं. त्यांनी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन घडवून आणलं. मग या दोघांनी मिळून नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली. पुढेची 10 वर्षं हे मनोमिलन कायम राहिलं. पण 2016च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते मनोमिलन तुटलं," असं विनोद कुलकर्णी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.
 
वाद अजूनही कायम?
 
2016 मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली. यावेळी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून येणार होता.
 
या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी वेदांतिका राजे उमेदवार होत्या तर उदयनराजेंच्या गटाकडून माधवी कदम उमेदवार होत्या. या निवडणुकीत माधवी कदम यांचा विजय झाला.
 
"2019मध्ये शरद पवारांनी उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसाठी काम केलं, मात्र निवडणूक झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. त्यांचं महत्त्व भाजपमध्ये वाढणार, हे लक्षात घेऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील संघर्ष हा सत्तासंघर्ष आहे. तो आजही कायम आहे," कुलकर्णी सांगतात.
उदयनराजे या वादावर काय म्हणतात?
"माझ्यात आणि शिवेंद्रराजे यांच्यात कोणताही वाद नव्हता. काही लोक त्यांचं इप्सित साध्य करण्यासाठी वाद लावायचे प्रयत्न करत होते. माझा आणि शिवेंद्रराजे यांचा प्रवास सुरळीत चालणार आहे, जे ठिणगी टाकणारे होते ते आता राहिले नाहीयेत," असं उदयनराजे यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.