बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 21 एप्रिल 2021 (21:23 IST)

भारत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात अपयशी का ठरला?

-सौतिक बिस्वास
गेल्या महिन्याच्या म्हणजे मार्चच्या सुरुवातीला भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी घोषित केलं की, 'भारतातली कोरोना साथ संपत आली आहे.'
 
एवढंच नव्हे तर हर्षवर्धन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्याचं उत्तम उदाहरण असल्याचंही म्हटलं होतं. जानेवारीपासून भारतानं 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'अंतर्गत विविध देशांना लशी पुरवल्या.
 
हर्षवर्धन यांचा हा आशावाद नि आत्मविश्वास भारतात कोरोनाग्रस्तांची कमी होत जाणाऱ्या आकडेवारीच्या आधारावर बेतलेला होता. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या मध्यात रुग्णसंख्या पिकवर असताना, 93 हजारहून अधिक रुग्ण दरदिवशी आढळत होते.
 
त्यानंतर यंदा फेब्रुवारीच्या मध्यात भारतात दरदिवशी सरासरी 11 हजार रुग्ण आढळत होते. कोरोनानं मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी होऊन, दिवसाला 100 च्या खाली आली होती.
 
गेल्या वर्षापासून कोरोनाशी लढा दिला जातोय. राजकीय नेते, धोरणकर्ते आणि माध्यमातील काही लोक असं मानू लागले की, भारत कोरोनाच्या संकटातून बाहेर पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर 'व्हॅक्सिन गुरू' उपाधी देऊनही सगळे मोकळे झाले होते.
 
निवडणुका आणि क्रिकेटचे सामने
 
यंदा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधील निवडणुका जाहीर केल्या. 18 कोटी 60 लाख लोक मतदार असलेल्या या राज्यांमधील 824 जागांची ही निवडणूक.
 
27 मार्चपासून मतदान सुरू झालेली ही निवडणूक अजूनही सुरू आहे. महिनाभर मतदानाचे टप्पे आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचारही मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरक्षेचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा पार फज्जा उडाला.
 
त्यानंतर गेल्या महिन्यात मार्च महिन्याच्या मध्यात भारतीय क्रिकेट बोर्डानं भारत विरुद्ध इंग्लंड सामना पाहण्यासाठी 1 लाख 30 हजार क्रिकेट रसिकांना गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानात उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती. यातील बरेच क्रिकेट रसिकांनी मास्कही परिधान करून आले नव्हते.
 
या घडामोडींच्या अवघ्या महिन्याभरात भारतात दुसऱ्या लाटेनं धडका देण्यास सुरुवात केली. भारतातील अनेक शहरात अचानक रुग्णसंख्या वेगानं वाढू लागली. पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची अनेक शहरांवर वेळ आली. एप्रिलच्या मध्यापर्यंत तर भारतात दिवसाला सरासरी एक लाखांहून अधिक रुग्ण सापडू लागले.
 
'कोरोनाचं संकट आणखी तीव्र होऊ शकतं'
रविवारी म्हणजे 18 एप्रिल रोजी एका दिवसात 2 लाख 70 हजार नवीन रुग्ण सापडले आणि 1600 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. हे दोन्ही एका दिवसातले आजवरचे विक्रम म्हणून नोंदवले गेले.
 
लॅन्सेट कोव्हिड-19 कमिशनच्या अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, नीट खबरदारी घेतली गेली नाही, तर दिवसाला किमान 1750 लोकांचे बळी जातील आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ही संख्या दिवसाला 2320 इतकी होईल.
 
भारत आजच्या घडीला आरोग्य आणीबाणीच्या कचाट्यात अडकलाय. सोशल मीडियावर कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्काराचे व्हीडिओमागून व्हीडिओ शेअर केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांच्या पार्थिवांच्या स्मशानाबाहेर रांगा लागल्यात. बऱ्याच ठिकाणी एकाच बेडवर दोन दोन रुग्णांना ठेवावं लागत आहे. हॉस्पिटलच्या कॉरिडोअर आणि लॉबीमध्येही रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
 
बेड्स, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधं आणि चाचण्या यांसाठी मदतीच्या याचनाही सोशल मीडियाद्वारे केल्या जात आहेत. औषधं काळ्या बाजारात विकली जात आहेत. चाचणीचे अहवाल येण्यासाठी बरेच दिवस लागत आहेत.
 
"माझा मुलगा मृत्युमुखी पडल्याचं त्यांनी मला तीन तास सांगितलं नाही," असं एक आई एका व्हीडिओत आयसीयूबाहेर बसून सांगत होती.
 
'लसीकरणाचा वेगही मंद'
भारतातल्या लसीकरण मोहिमेतही अडथळे येऊ लागलेत. देशभरात एक कोटीहून अधिक डोसेस पुरवल्यानंतरही अनके ठिकाणी लशींचा तुटवडा जाणवू लागलाय.
 
भारतातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं म्हटलं की, आर्थिक कुवत कमी पडत असल्यानं जूनपर्यंत लशींचा पुरवठा वाढवू शकत नाही.
 
भारतानं ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेका लशीची निर्यात काही काळासाठी थांबवलीय. कारण देशांतर्गत लशीला आधी प्राधान्य देण्याचं भारतानं ठरवलंय. शिवाय, परदेशी लशीची आयात करण्याचाही निर्णय सरकारनं घेतलाय. किंबहुना, आता ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी बहुधा तेही आयात करण्याची शक्यता आहे.
 
एकीकडे असा गोंधळ आणि भीतीचं वातावरण असतानाच, दुसरीकडे जगातील सर्वांत श्रीमंत मानली जाणारी क्रिकेट स्पर्धा अर्थात इंडियन प्रीमियर लीग बंद मैदानांमध्ये कुठल्याही क्रिकेट रसिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना सुरूच आहेत आणि तेही रोज. दुसरीकडे, ज्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत, तिथं हजारो लोक आपापल्या नेत्यांच्या सभांमध्ये उपस्थित राहत आहेत, हिंदू धर्मियांच्या कुंभमेळ्यातही सहभागी होत आहेत.
 
दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष झालं का?
"जे काय होतंय, ते विचार करण्याच्या पलीकडचं आहे," असं समाजशास्त्राचे प्राध्यापक शिव विश्वनाथन यांनी माझ्याशी बोलताना म्हटलं.
 
तज्ज्ञांच्या मते, भारत सरकारनं दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष केलं, जी भारतात सर्वांत वेगानं पसरलीय.
 
फेब्रुवारीच्या मध्यात द इंडियन एक्स्प्रेसचे पत्रकार तबस्सुम बरनागरवाला यांनी महाराष्ट्रातील काही भागात सातपटीत रुग्णसंख्या वाढत असल्याचं सांगितलं होतं.
 
महिन्याअखेरीस बीबीसीने कोरोनाग्रस्तांच्या वाढीबाबत महाराष्ट्रातील एका जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन डॉ. श्यामसुंदर निकम यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं, "या लाटेचं कारण नेमकं काय आहे हे आम्हाला माहित नाही. काळजीचं कारण म्हणजे पूर्ण कुटुंबच्या कुटुंब कोरोनाग्रस्त होत आहे. हे पूर्णपणे नवीन आहे."
 
भारतातील युवा वर्ग, भारतातील रोगप्रतिकारक शक्ती, अधिकाधिक ग्रामीण भाग अशा गोष्टी पाहून भारतानं कोरोनावर मात केल्याच जाहीर केलं. मात्र, हा अतातायीपणा होता. ब्लूमबर्गमधील स्तंभलेखक मिहीर शर्मा म्हणतात, "अधिकाऱ्यांचा अहंकार, अति-राष्ट्रवाद, प्रशासनातील अक्षमता यांमुळे हे संकट पुन्हा वाढलंय."
 
लोकांनी सुरक्षेच्या नियमांकडे केलेलं दुर्लक्ष, लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणं, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी, तसंच सरकारकडून येणाऱ्या संदेशांचा गोंधळ दुसऱ्या लाटेला जोर मिळाला. कोरोनाची साथ थोडी कमी होत गेली, तसं लोकांनी लस घेण्याचंही कमी केलं. लसीकरण मोहीम मंदावली होती. खरंतर जुलै अखेरीपर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं लक्ष्य होतं.
 
नेमकी चूक कुठे झाली?
फेब्रुवारीच्या मध्यात अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधील जीवशास्त्रज्ज्ञ भ्रमार मुखर्जी यांनी ट्वीट करून म्हटलं की, "भारतानं कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असली, तरी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे." मात्र, याकडे कुणीच लक्ष दिलं नाही.
 
"इथं एकप्रकारच्या विजयाचं वातावरण होतं. काहीजणांना वाटलं की आपण हर्ड इम्युनिटी कमावलीय. प्रत्येकाला पुन्हा कामावर जायचं होतं. काहीजण याबाबत बोलत होते, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले," असं पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष के. श्रीनाथ रेड्डी म्हणतात.
 
भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचे प्राध्यापक गौतम मेनन म्हणतात, "भारतातील कोरोनाची दुसरी लाट टाळता आली नसती, पण तिचं उपद्रव-मूल्य कमी करता आलं असतं, इतर देशांप्रमाणेच भारतानेही जानेवारीपासूनच इतर व्हेरिएंटच्या तपासणीसाठी जिनोमिक सर्व्हेलन्स करायला हवं होतं."
 
काही व्हेरिएंट कोरोनाग्रस्तांच्या वाढीला कारणीभूत असू शकतात. "फेब्रुवारीत महाराष्ट्रातील काही रुग्णांमुळे आपल्याला नव्या व्हेरिएंट्सबद्दल कळलं. मात्र, प्रशासानं तेव्हाही नाकारलं होतं. हा आपल्याकडील दुसऱ्या लाटेचा टर्निंग पॉईंट ठरला," असं मेनन म्हणतात.
 
सार्वजनिक आरोग्याच्या संकटामुळे भारताने काय धडा घेतला? भारतानं अतातायीपणा करत विजयाची घोषणा करायला नको होता. भविष्यातल्या आरोग्य संकटावेळी लोकांनीही लहान-सहान लॉकडाऊनसाठी अनुकूल राहायला हवं. भारत अद्यापही लसीकरण मोहिमेत खूप मागे आहे. अनेक साथरोग तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की अजून कोव्हिडच्या बऱ्याच लाटा येऊ शकतात. भारताचा लसीकरणाचा दरही मंद आहे आणि भारत हर्ड इम्युनिटीपासूनही दूर आहे.
 
"आपण लोकांचं आयुष्य ठप्प करू शकत नाही. आपण गर्दीच्या शहरात अंतर पाळू शकत नसू, तर किमान सगळेजण नीट मास्क वापरू तरी शकतो. आणि ते मास्क नीट परिधान केलं पाहिजे. ही काही मोठी गोष्ट नाहीय," असं प्रा. रेड्डी म्हणतात.