शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 7 सप्टेंबर 2019 (11:51 IST)

एमआयएमनं का तोडलं वंचित बहुजन आघाडीशी नातं?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाल्यावर नव्या आघाड्यांची बांधणी आणि मोडतोडही सुरू झाली आहे. एमआयएम पक्षानं शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.
 
या पत्रकामध्ये एमआयएमनं गेले दोन महिने आपण वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करत होतो, मात्र दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारे जागावाटपावर योग्यप्रकारे एकमत झालं नाही असं लिहिलं आहे.
वंचित बहुजन आघाडीनं आपल्याला केवळ आठ जागा देऊ केल्या. हे आजिबात स्वीकारार्ह नाही आणि 'औरंगाबाद मध्य' ही जागाही त्या यादीत समाविष्ट केली नव्हती त्यामुळे ते अन्यायकारक आहे असंही जलील यांनी या पत्रकात म्हटलं आहे.
 
या पत्रकात जलील पुढे म्हणतात, "आमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी बाळासाहेब (प्रकाश आंबेडकर) यांची अनेकदा भेट घेतली . तसंच शेवटची भेट 5 सप्टेंबर रोजी घेतली. वंचित बहुजन आघाडीचा निर्णय बाळासाहेब आणि त्यांच्या संसदीय बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी त्यांना कळवला तसंच एमआयएमला केवळ आठ जागा देण्यात येतील असं ओवेसी यांना इमेलद्वारे कळवलं.
 
जलील पुढे म्हणतात, "एमआयएमनं 2014 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 24 जागा लढवल्या होत्या. त्यातील औरंगाबाद आणि भायखळा जागा पक्षानं जिंकल्या होत्या. तसेच 9 जागांवर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या जागांवर आमचा पक्ष होता. आज पक्षाच्या राज्यभरात विविध जातींचे आणि समुदायांचे 150 नगरसेवक आहेत.
 
औरंगाबाद पालिकेत आमचे 26 नगरसेवक आहेत. पालिकेतील आमचे विरोधीपक्षनेत्या सरिता अरुण बोर्डे आणि गटनेते गंगाधर ढगे दोन्हीही अनुसुचित जातींचे आहेत."
 
"आता औरंगाबादमध्ये आपल्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या होणाऱ्या मुलाखतींचे वेळापत्रक प्रसिद्ध करू", असेही जलील यांनी पत्रकात म्हटलं आहे.
 
प्रकाश आंबेडकरांबद्दल आमच्या मनात आदर
"बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. तो कायम राहिल. त्यांना आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही शुभेच्छा देतो. आता आघाडी होत नसली तरी समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी काम करत राहू", असं जलील यांनी पत्रकात लिहिलं आहे.
 
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
गेल्या आठवड्यात प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एमआयएमशी सुरू असलेल्या चर्चेत कोणतीही अडचण नसल्याचं म्हटलं होतं.
 
ते म्हणाले होते, "असदुद्दीन ओवेसींशीच जागावाटपाची बोलणी होणार. इतर कुणाशी होणार नाही, असं ठरलंय. माझं आणि त्यांचं बोलणं सुरू आहे. तिथं अडचणी नाहीत. मी ओवेसींशी फोनवरून बोललो. त्यांच्यात आणि माझ्यात चांगलं अंडरस्टँडिंग आहे. आमच्यात काही प्रॉब्लेम नाही. मी हैद्राबादला जाणार आहे. त्यांच्या घरी दावतलाही जाईन. आमच्यात फायनल आहे, हे लक्षात घ्या. पक्षाध्यक्ष जे सांगतील ते महत्त्वाचे. काही नेते स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी स्टेटमेंट करतात. लोअर लेव्हलवर जे बोलतात, ते मी गृहित धरत नाही," असं आंबेडकर यावेळी म्हणाले होते.
 
'सत्ताधाऱ्यांना फायदा होणार'
एमआयएनं वंचित बहुजन आघाडीशी युती न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधाऱ्यांनाच मदत होईल असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "इम्तियाज जलील यांनी महिना ते दीड महिन्यापूर्वी एक सर्वेक्षण केलं. त्यातून राज्यभरातील 72 मतदारसंघात एमआयएमचं अस्तित्व असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्या अहवालाच्या आधारे त्यांनी चर्चेला सुरूवात केली होती. वंचित बहुजन आघाडीनं 8 जागा दिल्यावर 'औरंगाबाद मध्य' ही जागा एमआयएमला देण्यास नकार दिला. या जागेवर गेल्या निवडणुकीत दलित मतं एमआयआएमच्या जलील यांना मळाली होती. त्यामुळे आता एमआयएमनं वंचित बहुजनच्या उमेदवाराला मतं द्यावीत असं आघाडीनं ठरवलं. पण या जागेवर वंचित बहुजन आघाडीनं दिलेला उमेदवार एमआयएमला पसंत नव्हता. त्यामुळे आघाडीची बोलणी फिसकटली. आता राज्यात जी एमआयएम, वंचित बहुजन अशी शक्ती तयार झाली होती. त्यावर निश्चित परिणाम होईल आणि सत्ताधारी पक्षांना त्याचा फायदा होईल."