मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (21:48 IST)

लंडनमध्ये एक फणस 16 हजार रुपयांना का मिळतोय?

फणसाचा हा फोटो बीबीसी पत्रकार रिकार्डो सेनरा यांनी काढला होता. हा फोटो नंतर ब्राझीलमध्ये प्रचंड व्हायरल झाला.
 
हा फोटो तब्बल एक लाख वेळा शेअर करण्यात आला. लंडनच्या सगळ्यात मोठ्या आणि जुन्या मार्केटमध्ये हा फणस सुमारे 16 हजार रुपयांना (160 पाऊंड) विकायला ठेवलेला होता.
 
या फणसाची किंमत पाहून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. काहींनी तर मजेत म्हटलं, फणस विकून करोडपती बनायचं असेल तर ब्रिटनला या.
 
खरंतर भारतातील बाजारपेठेत एक ताजा फणस केवळ 100 ते 150 रुपयांना मिळतो. अनेक ठिकाणी विकले न गेल्यामुळे फणस तसेच रस्त्यावर पडून सडतात. इतर अनेक देशांमध्ये फणस प्रचंड स्वस्त आहेत. अनेक ठिकाणी ते झाडांवरून तोडून मोफत घेता येतात.
मग लंडनमध्ये फणसाची किंमत इतकी कशी वाढली? गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय पातळीवर फणसाच्या मागणीत इतकी वाढ का झाली?
 
अर्थव्यवस्थेत एक सर्वसाधारण नियम आहे. कोणत्याही वस्तूची किंमत त्याच्या मागणीवरच पूर्णपणे अवलंबून असते.
 
फणस महागण्याची कारणे कोणती?
साओ पावलो राज्यात तीन हजार प्रकारच्या फळांची बाग सांभाळत असलेल्या कंपनीच्या CEO सबरिना सारतोरी यांच्याशी बीबीसीने चर्चा केली.
 
त्या म्हणाल्या, "ब्राझीलमध्ये फणसाच्या किंमतीमध्ये चढउतार होत असतो. अनेक ठिकाणी तर लोक फणस मोफत तोडून नेतात. मात्र काही ठिकाणी फणस फारच महाग मिळतो."
ब्रिटनसारख्या थंड हवामानाच्या प्रदेशात फणसाची व्यावसायिक लागवड करता येत नाही.
 
जाणकारांच्या मते, फणसाचा आंतरराष्ट्रीय व्यापार फारच गुंतागुंतीचा आणि जोखमीचा आहे.
 
त्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये लवकर खराब होण्याचं फणसाचं गुणधर्म, विशिष्ट हंगामातच हे फळ उपलब्ध होणं तसंच याचा मोठा आकार या गोष्टींचा समावेश आहे.
 
एका फणसाचं वजन सुमारे 40 किलोपर्यंत असू शकतं. लंडनमध्ये फणस प्रामुख्याने आशिया खंडातून येतात. आकारमान आणि वजन जास्त असल्याने त्याची पॅकिंग तसंच वाहतूक हे अवघड काम आहे. तसंच नाशवंत असल्यामुळे इतर समस्या निर्माण होतात.
सारतोरी सांगतात, "फणस वजनाने जड असतो. तसंच कमी वेळेत पिकतो. त्याला एक वेगळाच गंध असतो. प्रत्येकाला हा गंध आवडतोच, असं नाही."
 
ज्या देशांमध्ये फणस मुबलक प्रमाणात आढळतो, तिथं याला फारसं महत्त्व दिलं जात नाही.
 
मात्र विकसित देशांतील शाकाहारी लोकांमध्ये याची लोकप्रियता वाढली आहे.
 
याठिकाणी मांसाहाराला पर्याय म्हणून फणसाची मागणी वाढू लागली आहे.
 
शिजवल्यानंतर ते बिफ किंवा पोर्कप्रमाणे दिसतं. त्यामुळेच टोफू, कॉर्न आणि ग्लुटेन-फ्री याच्यासारखंच एक मीट-फ्री पर्याय म्हणून ओळखलं जात आहे.
 
एकट्या ब्रिटनमध्ये शाकाहारी लोकांची संख्या सुमारे 35 लाख असून दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे.
 
फणस चांगल्या पद्धतीने पिकल्यानंतर त्याला एक गोड चव प्राप्त होते. त्यामुळे गोड पदार्थ म्हणूनही त्याचा वापर अनेकजण करतात. काही लोक स्वस्त पर्याय म्हणून डबाबंद फणस खरेदी करतात.
डबाबंद फणस ब्रिटिश सुपरमार्केटमध्ये जवळपास 300 रुपयांना मिळतो. मात्र त्याची चव ही मूळ फळासारखी नसते, अशी तक्रार लोकांमध्ये आहे.
 
मोठ्या आकारामुळे फणसाचं पॅकिंग करता येत नाही. इतर फळांप्रमाणे ते कोणत्याही बॉक्समध्ये ठेवू शकत नाही.
 
शिवाय फणस बाहेरून पाहून तो चांगला आहे किंवा नाही, याचा अंदाज लावणंही अवघड असतं.
 
फणसाची शेती दक्षिण किंवा दक्षिण-पूर्व आशियात बहुतांश होते. या फळाची लागवड ज्या देशांमध्ये केली जाते. तिथं पुरवठा साखळीही मजबूत नाही.
 
फणस झाडावरून काढल्यानंतर ते साठवताही येत नाहीत. या सर्व कारणांमुळे एकूण उत्पादनापैकी सुमारे 70 टक्के फणस नष्ट होतात, असा अंदाज आहे.
 
आपले शेजारी बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचं राष्ट्रीय फळ म्हणून फळसाची ओळख आहे.
 
भारतातही फणस मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. ग्रामीण भागातील अनेक नागरिक फणसाचा वापर आहारात करतात.
 
पण असं असलं तरी याच्याबाबत जागरूकता कमी आहे, असं म्हटलं जातं. या कारणामुळे आयुष्यात कधीच फणस खाल्ला नाही, अथवा पाहिलाही नाही, असे लोकही भरपूर आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून फणसाला मागणी वाढली आहे. लोकांमध्ये ते लोकप्रिय होऊ लागले आहेत.
 
नेदरलँड येथील परदेशी फळांचे आयातदार कंपनी टोरेस ट्रॉपिकल बी. व्ही. चे मालक फॅब्रिकियो टोरेस यांनी म्हटलं, "कोव्हिड-19 साथीनंतर मालवाहू विमानांचं भाडं प्रमाणाबाहेर महागलं आहे. फळं-भाज्या महाग होण्याचं हे प्रमुख कारण आहे."
 
ते म्हणतात, "आशिया आणि दक्षिण अमेरिका खंडातून अनेक फळं युरोपात दाखल होतात. विमान कंपन्या जास्त नफ्यासाठी जास्त किंमतीच्या उत्पादनांचा शोध घेत असतात. फणस नाशवंत तर आहेच, शिवाय मागणी कमी असल्याने ते आयात करण्याला योग्य मानलं जात नाही. याच आधारावर युरोपात त्याची किंमत निर्धारित केली जाते."
फणसाचा वाढता व्यापार
अनेक अडचणी असूनसुद्धा गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फणसाला मागणी वाढली आहे.
 
कन्सल्टन्सी इंडस्ट्री ARC च्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांत फणसाची बाजारपेठ 3.3 टक्के वार्षिक दराने वाढेल. 2026 पर्यंत ही बाजारपेठ 35.61 कोटी डॉलरपर्यंत वाढू शकते.
 
2020 मध्ये एशियन-पॅसिफिक क्षेत्र फणसाची बाजारपेठेत 37 टक्क्यांसह आघाडीवर होतं. खालोखाल युरोप 23 टक्के, उत्तर अमेरिका 20 टक्के, इतर क्षेत्र 12 टक्के आणि दक्षिण अमेरिका 8 टक्के यांचा समावेश होतो.