रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (14:23 IST)

पहिली ते चौथीच्या शाळा सुरु होणार? कॅबिनेटच्या बैठकीत काय निर्णय?

Will the first to fourth school start? What is the decision of the cabinet meeting? Maharashtra BBC Marathi News In Webdunia Marathi
महाराष्ट्रात लवकरच पहिलीपासूनच्या शाळा सुरू होऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत.
इयत्ता पहिली ते चौथी आणि सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याला कोव्हिड टास्क फोर्सने परवानगी दिली आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले, "12-18 वयोगटाच्या मुलांचं लसीकरणही करायला हवं असंही टास्क फोर्सने सुचवलं आहे. कारण ही मुलं अनेक गोष्टींसाठी घराबाहेर अधिक असतात. निर्बंधांचं पालन करून पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू करण्यास हरकत नाही असंही टास्क फोर्सने सांगितलं आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाला हा निर्णय घेण्यास कोणताही आक्षेप नाही."
शुक्रवारी (25 नोव्हेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत शाळांचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं असंही ते म्हणाले.
याबाबत बीबीसी मराठीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही संपर्क साधला. बीबीसी मराठीशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी असं सांगितलं,"शिक्षण विभाग पहिलीपासून सर्व शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक आहे. आम्ही यापूर्वीच टास्क फोर्सचं मत जाणून घेतलं आहे. आरोग्य विभाग आणि मुख्य सचिवांशी चर्चा करून संबंधित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. ते सध्या उपचार घेत आहेत. त्यामुळे ते रुजू झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून मला सांगण्यात आलं की, ते समोरासमोर माझ्याशी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर आम्ही घोषणा करू." आताच्या घडीला राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत, तर शहरी भागांत आठवी ते बारीवीच्या शाळा सुरू आहेत. दिवाळीच्या सुटीनंतर पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू कराव्या अशी मागणी जोर धरू लागली. यासंदर्भात पालक आणि शिक्षकांनीही शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या प्राथमिक शाळा सुरू करू नये असाही एक मतप्रवाह दिसून येतो. परंतु विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षण तज्ज्ञांनीही प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा सल्ला शिक्षण विभागाला दिला.
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी शाळा सुरू झालेल्या आहेत.
सरकार दिवाळीनंतर प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा होती.
प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि लहान मुलांच्या कोव्हिड टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांनी याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं "टास्कफोर्सने सरकारला शाळा सुरू करण्याची शिफारस केलीये. शाळा सुरू करण्याचा लसीकरणाशी काही संबंध नाही."शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये कोरोनासंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलंय. यावर डॉ. प्रभू म्हणतात, "कोरोनाचे रुग्ण वाढलेत. याकडे धोका म्हणून न पहाता सरकारने याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे."शाळेतील 10 टक्के मुलांना कोरोनासंसर्ग झाला, तर शाळा बंद करण्याची शिफारसही टास्सफोर्सने सरकारने केलीये केलीये. कोरोनासंसर्ग वाढल्यामुळे शाळा बंद करण्याची परिस्थिती दिसून आलेली नाही, असं ते पुढे म्हणाले.