गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (09:40 IST)

कोरोना : शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये संसर्ग वाढतोय का?

मयांक भागवत
कोरोनासंसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या.
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी शाळा सुरू झाल्या. पण गेल्याकाही दिवसात शाळकरी मुलांमध्ये कोरोनासंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलंय.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालानुसार, 2 ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत 11 ते 20 वर्ष वयोगटातील 6836 शाळकरी मुलांना कोरोनाचा संसर्ग झालाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "गेल्या 20 दिवसात कोरोनाबाधित मुलांची संख्या हजारावर गेलीये हे बरोबर आहे."
राज्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागलीये. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये कोरोनासंसर्ग वाढतोय का? या परिस्थितीत शाळा सुरू कराव्यात का? हे आम्ही जाणून घेतलं.
 
11-18 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये खरंच वाढलाय संसर्ग?
कोरोनासंसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सरकारने ऑक्टोबर महिन्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
 
शाळा, कॉलेज सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये कोरोनासंसर्ग झपाट्याने पसरेल अशी भीती वर्तवण्यात येत होती.
शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये खरंच संसर्ग वाढलाय का? हे तपासण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य (Medial Education and Drug Development) विभागाच्या रिपोर्टचा अभ्यास केला.
या रिपोर्टनुसार, (आत्तापर्यंत)
•1 नोव्हेंबर 2021 - 11 ते 20 वर्ष वयोगटातील कोरोनाबाधित मुलांची संख्या 4,94,506
 
•22 नोव्हेंबर 2021- 11 ते 20 वर्ष वयोगटातील कोरोनाबाधित मुलांची संख्या 4,96,180 नोंदवण्यात आली
याचा अर्थ गेल्या 22 दिवसात राज्यातील कोरोनाबाधित शाळकरी मुलांच्या संख्येत 1674 ने वाढ झाली. म्हणजेच राज्यात दिवसाला सरासरी 76 शाळकरी मुलांना कोरोनासंसर्ग झाल्याचं आढळून आलं.
 
राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्यात आल्या होत्या. यासाठी आम्ही ऑक्टोबर महिन्यातील आकडे तपासले.
 
•2 ऑक्टोबर 2021ला 11 ते 20 वर्ष वयोगटातील कोरोनाबाधित मुलांची संख्या होती 4,89,344
 
•पण, 31 ऑक्टोबरला ही संख्या 5 हजाराने वाढून 4,94,404 पर्यंत पोहोचली
या आकड्यांवरून स्पष्ट होतं की ऑक्टोबर महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनासंक्रमित मुलांची संख्या 6,734 ने वाढली.
 
मुलांचं लसीकरण महत्त्वाचं-टोपे
राज्यात 11 ते 20 वर्ष वयोगटातील शाळकरी मुलांमध्ये कोरोनासंसर्ग वाढल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिलीये.
ते म्हणाले, "राज्यात शाळा-कॉलेज सुरू झालेत. व्हायरसच्या गुणधर्मामुळे शाळेत एकामुळे दुसऱ्याला संसर्ग होणार हे साहाजिक आहे. त्यामुळे गेल्या 20 दिवसात कोरोनाबाधित मुलांची संख्या हजारावर गेलीये हे बरोबर आहे."
राज्यात मुलांमध्ये कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येतीये. हा धोका पाहता मुलांच्या लसीकरणाची मागणी जोर धरू लागलीये. मुलांच्या लसीकरणाच्या मुद्यावर राजेश टोपेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियांची भेट घेतली होती.
टोपे पुढे म्हणतात, "11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोव्हिड विरोधी लस मिळालेली नाही. ही मुलं शाळेत जातायत, बाहेर फिरतायत. मुलांना गंभीर आजार होत नाही. पण, कुटुंबियांना जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे मुलांचं लसीकरण झालंच पाहिजे."
राज्याच्या लहान मुलांच्या टास्क फोर्ससोबत सरकार लसीकरण आणि शाळा सुरू करण्याच्या मुद्यावर चर्चा करणार आहे.
 
मुलांमध्ये संसर्ग वाढत असताना शाळा सुरू कराव्यात?
शहरी भागात सातवीपर्यंत तर, ग्रामीण भागात प्राथमिक शाळा (पहिली ते चौथी) अजूनही सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
सरकार दिवाळीनंतर प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. पण, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही.
प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि लहान मुलांच्या कोव्हिड टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू सांगतात, "टास्कफोर्सने सरकारला शाळा सुरू करण्याची शिफारस केलीये. शाळा सुरू करण्याचा लसीकरणाशी काही संबंध नाही."
 
शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये कोरोनासंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलंय. यावर डॉ. प्रभू म्हणतात, "कोरोनाचे रुग्ण वाढलेत. याकडे धोका म्हणून न पहाता सरकारने याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे."
 
शाळेतील 10 टक्के मुलांना कोरोनासंसर्ग झाला, तर शाळा बंद करण्याची शिफारसही टास्सफोर्सने सरकारने केलीये केलीये. कोरोनासंसर्ग वाढल्यामुळे शाळा बंद करण्याची परिस्थिती दिसून आलेली नाही, असं ते पुढे म्हणाले.
 
मग मुलांमध्ये कोरोनासंसर्ग वाढत असताना शाळा सुरू करणं योग्य आहे का? डॉ. प्रभू पुढे सांगतात, "मुलांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत. पण, म्हणून शाळा बंद करणं पर्याय नाही. याचं उत्तर आहे मुलांचं लसीकरण."
 
नागपूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर म्हणतात, "शाळा न उघडल्यामुळे मुलांवर होणारे परिणाम जास्त आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्याच पाहिजेत."
 
तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांना प्रौढांच्या तुलनेत आजार गंभीर होण्याचा धोका अत्यंत कमी आहे.
 
शाळकरी मुलांमध्ये केसेस वाढण्याचं कारण काय? डॉ. बोधनकर म्हणाले, "शाळेतील शिक्षक, कर्मचारी, बस-रिक्षा ड्रायव्हर किंवा केअरटेकर यांनी लस घेतली नसेल तर संसर्ग होण्याचा धोका आहे. यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे."
 
"शाळा बंद करण्यापेक्षा शाळकरी मुलांना संसर्ग होण्याचं कारण काय हे शोधलं पाहिजे," ते पुढे म्हणाले.
 
बालरोगतज्ज्ञ सांगतात शाळा सुरू नसल्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, चिडचिडेपणा, मोबाईल पहाण्याचं व्यसन आणि मानसिक आजारांचं प्रमाण वाढलंय.
 
मुलांमध्ये आजार गंभीर होण्याचं प्रमाण कमी?
वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभागाच्या रिपोर्टनुसार,
 
शून्य ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये कोरोनासंसर्गाचं प्रमाण 0.99 टक्के
11 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांना होणाऱ्या कोरोनासंसर्गाचं प्रमाण 2.29 टक्के
डॉ. प्रभू सांगतात, "मुलांमध्ये केसेस वाढत असल्या तरी मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी आहे. प्रौढांप्रमाणे त्यांना गंभीर आजार होत नाही." तज्ज्ञ म्हणतात, मुलांमध्ये केसेस वाढण्याचा धोका नाही. प्रौढांमध्ये केसेस वाढल्या तर धोका होऊ शकतो.
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर देशातील अनेक राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. पंजाब, बिहारसारख्या राज्यांमध्ये शाळकरी मुलांमध्ये कोरोनासंसर्ग वाढला होता.