Darjeeling : क्वीन ऑफ हिल्स
दार्जिलिंगला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळालं आहे. मोठमोठाले चहाचे मळे, आल्हाददायक हवामान आणि पर्यटकांचं आकर्षण असणारी टॉय ट्रेन यांच्यामुळे दार्जिलिंगला अनेक पर्यटक भेट देतात. तिबेटी आणि नेपाळी संस्कृतीचं मनोहारी दर्शन या परिसरात होतं. शिमला, कुलू-मनाली आणि त्याचबरोबर अग्रक्रमानं येणारं पर्यटनस्थळाचं नाव म्हणजे दार्जिंलिंग. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील मध्य हिमालयात असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे दार्जिलिंग. बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेल्या, हिरव्यागार दर्यांनी सुशोभित झालेल्या दार्जिलिंगला पश्चिम बंगालचं स्वित्झर्लंड असंही म्हणतात कलकत्त्यात ईस्ट इंडिया कंपनी स्थापून राज्य करणार्या ब्रिटिशांनी दार्जिलिंगला उन्हाळी राजधानी बनवली होती. 7 हजार 100 फूट उंचीवर असणार्या दार्जिलिंगमध्ये उन्हाळ्यातसुद्धा हवा थंड व सुखद असते. तिला क्वीन ऑफ हिल्स म्हणतात. ब्रिटिशांनी तिथलं हवामान, माती यांचा अभ्यास करून तिथे चहाचे मळे विकसित केले. हे चहाचे मळे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेतच, परंतु सतत कटिंग करून निगा राखलेले चहाचे मळे दार्जिलिंगच्या सौंदर्यात भर टाकतात. दार्जिलिंगच्या डोंगरउतारावर जणू हिरवे गालिचेच पसरलेत असं भासतं. सर्व प्रकारच्या हिरव्या रंगांच्या शेड असणार्या वनस्पतींनी नटलेल्या टेकड्या तिथं आहेत. त्यामुळं दार्जिलिंगचं स्वत:चं असं एक सौंदर्य आहे आणि वेगळपणही आहे. निसर्गसौंदर्याची आवड असणार्यांसाठी ते एक नंदनवनच आहे, त्यामुळे संपूर्ण जगातले पर्यटक इथं येतात.