शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

गुजरातमधलं एकमेव हिल स्टेशन सापुतारा

सापुतारा हे 3 हजार 600 फूट उंचीवर आहे. वर्षभरात हजारो पर्यटक सापुताराला भेट देत असतात. प्रत्येक ऋतुत सापुतारा तितकंच मनमोहन रूप धारण करतं. सनसेट पॉइण्टपासून ते रोझ गार्डनपर्यंत अनेक पॉइण्टस् इथे आहेत. तसंच सापुतार्‍याहून जवळपास असलेली इतर काही ठिकाणंही पर्यटकांना भावतील अशी आहेत. गुजरातचं एकमेव आणि प्रसिद्ध हिलस्टेशन म्हणजे सापुतारा. गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्यादी पर्वताच्या रांगांमध्ये सापुतारा समुद्रसपाटीपासून 3600 फूट उंचीवर आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आणि उत्तम पॅनोरॅमिक व्हू साइट्‍स असल्याने वर्षभरात पर्यटक ‍‍तिथे खूप मोठ्या संख्येने भेट देत असतात. उन्हाळा असो, थंडीचे दिवस असो किंवा अगदी पावसाळा, प्रत्येक सीझनमध्ये पर्यटकांना इथलं वाइल्ड लाइफही प्रसिद्ध आहे. द्राक्षं-स्ट्रॉबेरीची शेती असल्याने ही फळं इथे उत्तम मिळतात. बांबूपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करायलाही तिथे एकच झुंबड उडते.

सापुतार्‍याहून 50 किलोमीटर्सवर असलेलं बोटॅनिकल गार्डन 24 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. या गार्डनमध्ये भारतभरातली 1400हून अधिक प्रकारच्या वेली आहेत. बांबूचेही अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. चायनीज बांबू, सोनेरी बांबू, बीअर बॉटल बांबू ही इथल्या खास बांबूंची काही उदाहरणं. सापुतारा-वाघाई रोडवर असलेला गिरा वॉटरफॉल अनुभवण्यासाठी जून ते नोव्हेंबर या काळात जायला हवं. त्याच्याजवळ असलेल्या आंबापाडा गावात बांबूच्या विविध वस्तू बनवण्याचं काम चालतं. सापुतार्‍याहून 70 किलोमीटर्सवर असलेल्या महल जंगलात वन्यजीवन अनुभवता येतं. वर्षातून ठराविक काळच जाता येऊ शकत असलेल्या या जंगलात जाण्यासाठी वनखात्याची विशेष परवानगी लागते. सापुतार्‍याहून 6 किलोमीटर्स अंतरावर नाशिक रोडवर असलेला हतगड किल्ला प्रसिद्ध आहे. वणीच्या सप्तश्रृंगी मंदिर इथून अवघ्या 50 किलोमीटर्स अंतरावर आहे.