शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

सांस्कृतिक भारत : दमण व दीव

दमण व दीवचे भौगोलिक क्षेत्रफळ 112 चौरस किमी असून राजधानी दमण ही आहे. दमण व दीव मिळून केंद्रशासित प्रदेश आहे. 2011 च्या जनगणनेनुसार दमण व दीव ची लोकसंख्या 2,42,911 इतकी आहे. यात साक्षरतेचे प्रमाण 87.07 इतके आहे. दमण व दीव हे दोन जिल्हे असून इथे प्रामुख्याने गुजराती भाषा बोलली जाते.
 
स्वातंत्र्योत्तर काळातही गोव्यासोबत दमण आणि दीव येथे पोर्तुगिजांची वसाहत होती. 1961 मध्ये दमण व दीव भारतात समाविष्ट करण्यात आले. 30 मे 1987 ला दमण व दीव केंद्रशासित प्रदेश घोषित झाले. दमण मुंबईपासून 193 किमी अंतरावर असून दमणच्या पूर्वेला गुजरात, पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला कोलाक नदी व दक्षिणेला कलई नदी आहे. गुजरात मधील बलसाड जिल्हा दमण जवळ आहे. दीव बेट दोन पुलांनी जोडलेले आहे. गुजरात मधील जुनागड जिल्हा दीव जवळ आहे.
 
दमण ही दोन जुळी शहरे मिळून एक शहर आहे. कोइम्ब्रा आणि पोर्तुगाल ही ती अंतर्गत असलेली दोन शहरे. दीवमध्ये जे लोऊरेस नावाचे शहर आहे ते पोर्तुगालमध्ये सुद्धा याच नावाचे एक शहर आहे. दमणगंगा नदी ही दमणला दोन भागात विभागते. 
 
दमणच्या अधिकृत भाषा इंग्रजी, गुजराती, हिंदी, कोकणी या आहेत. पोर्तुगिज भाषाही कुठे कुठे अजून बोलली जाते.
 
कालव्यातील जमीन 1121.03 हेक्‍टर आहे. मुख्य शेती व बागायती उत्पादने म्ह़णून तांदूळ, रागी, बाजरी, ज्वारी, भुईमुग, दाळी व कडधान्य, गहू, केळी, चिक्कू, आंबा, नारळ व ऊस हे आहेत. या प्रदेशात म्हणण्याजोगा जंगलप्रदेश नाही. 
 
दीव व दमणला 1700 लघु व मध्यम उद्योग आहेत. ओमनीयत औद्यागिक विकास महामंडळातर्फे दमण येथे दोन औद्योगिक वसाहती स्थापन झाल्यात. दाभेल, भीमपूर व कडिया ही इतर औद्यागिक क्षेत्रे आहेत. सर्व खेड्यांना वीज पुरवठा होतो. पश्चिम प्रदेशातील केंद्रीय संस्थेकडून पुरेसा वीज पुरवठा या प्रदेशाला होतो. दमण येथील कचीगाम, दलवाडा व दाभेल येथे 66/11 किलोवॅटचे उपकेंद्र आहे. प्रत्येकी पन्नास मेगावॅट असे. मगरवाडा येथे 220 किलोवॅटचे उपकेंद्र तर दीव येथे 110 मेगावॅटचे उपकेंद्र आहे.
 
दमणला किल्ले, लाईट हाऊस, देवका व जाम्पोरा समुद्रकिनारे, दमणगंगा, बगीचा, कचिराम, सत्यसागर उद्यान, दलवाडा, केडिया तलाव व उद्यान मोती दमण किल्ला, नदिया गुंफा, शांततेचा बुरूज, दमण स्वातंत्र्य मेमोरियल, पोर्तुगिज किल्ला, आदी स्थळे प्रेक्षणीय आहेत. नानी दमण जेठ्ठी किल्ला व उद्यान, जुनी गिरीजा घरे (चर्चेस), किल्ले, दीपगृह व उन्हाळी निवासस्थाने आहेत. दीव येथे किल्ला व नागोबा समुद्र किनारा आहे. घोगला येथील बालोद्यान हे निसर्गरम्य स्थान आहे. इथला किल्ला आणि चर्चेस पाहण्यासारखे आहेत. घोघला, चक्रतिर्थ, गोमतीमाता, जालंदर आदी समुद्र किनारे मन रमविणारे आहेत. 
 
दमण व दीव या बेटांवर काही आदिवासी लोकही वास्तव्य करतात. त्यापैकी धोडिया, दुबळा (हलपती), नायकदा (तालाविया), सिद्दी (नायका), वारली आदी लोक आहेत. धोडिया आदिवासींचे प्रमाण इतर आदिवासींपेक्षा जास्त आहे. ते आपली स्वत:ची धोडिया नावाचीच भाषा बोलतात.
 
गरबा, कोळी नृत्य, पोर्तुगिज लोकनृत्य मांडो, विरा नृत्य, वेरदीगाव आदी लोकगीते या केंद्रशासित प्रदेशात पहायला मिळतात.
 
हा प्रदेश गुजरातला लागून असल्याने इथे गरबा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. दीव फेस्टीवल, नवरात्र उत्सव, अंबा पूजा आदी उत्सव दीवला साजरे केले जातात. डिसेंबर महिन्यात टुरिझम विभागाकडून दीव फेस्टीवल आयोजित केला जातो. दमणला मकर संक्रांती, ख्रिसमस, गरबा, नारळी पौर्णिमा आदी उत्सव होतात तर मांडोचा वाद्य नाचही केला जातो, या प्रदेशातून दमण गंगा, वाघ नदी या नद्या वाहतात. 
 
- डॉ. सुधीर राजाराम देवरे