विदर्भाचे प्रादेशिकतेनुसार पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे दोन मुख्य भाग पडतात. वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले तर गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा हे जिल्हे पूर्व विदर्भातले ! चला तर मग निघुया पूर्व विदर्भाच्या सफरीकडे.
जिल्हा चंद्रपुर
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान
चंद्रपुरहून ४५ किमी अंतरावर असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ही एक अद्वैत अनुभूती त्या सच्च्या दिलदार व्याघ्रप्रेमींसाठी जे या राजाच्या दर्शनासाठी जंगलांमधुन आतुरतेने सफरी करत फिरतात ! चंद्रपुर जिल्ह्यातील या अभयारण्यास 'ताडोबा' हे नाव येथील घनदाट जंगलात राहणाऱ्या 'तारू' जमातीच्या नावावरून पडले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे. ६२५ स्क्वेअर किलोमीटर इतके मोठे याचे क्षेत्रफळ आहे. याचे प्रामुख्याने दोन मुख्य भाग असून १९५५ पासून अस्तित्वात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि १९८६ मध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेले ५०८ स्क्वेअर किलोमीटरचे अंधारी अभयारण्य या दोन्हींचे मिळून बनलेले आजचे हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते. त्यावरुनही याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे म्हणतात. यात प्रामुख्याने घनदाट जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या या उत्तर आणि पश्चिम भागात आहेत. ताडोबा रिझर्व्हमध्ये चिमुरच्या टेकड्यांचा परिसर येतो तर, अंधारी अभयारण्यात मोहर्ली आणि कोलसा टेकड्यांचा परिसर येतो. अंधारी नदीच्या व्यतिरिक्त असलेल्या पाणथळ जागा अर्थातच कोसला तळे जंगलाच्या मध्यवर्ती भागात आहे. ताडोबा हे मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय जंगल प्रकारांमध्ये मोडते. याचा ८७% भाग अतिसुरक्षित आहे. जंगलात ऐन, बीज, धौडा, हळदू, साल, सिमल, तेंदू, बेहडा, हरडा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात असून महुआ, ब्लॅक प्लम, अर्जुन फळ, बांबू अशी वनसंपदाही आढळते.
प्राणीसंपदा
ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी. याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चीतळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात. इंडियन स्टार जातीचे कासवही या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर पाणथळ जागेत वावरणारे आणि जमिनीवर उडणारे सुमारे १९५ विविध जातींच्या पक्षांची नोंद जंगलात करण्यात आली आहे.
या जंगलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्य घोषित झाल्यानंतरही आज इतक्या वर्षांनंतर जंगलाच्या आतील भागात सुमारे ६० गावे आणि पाडे वसलेले असून विविध भटक्या विमुक्त जमातींचे लोक या ठिकाणी आपली संस्कृती जपत आहेत. जंगलाच्या कोर आणि बफर झोनमध्ये केवळ पारंपरिक शेती करणाऱ्यांनाच राहण्यास परवानगी आहे. आधुनिक पद्धतींच्या वापराने जंगल धोक्यात यायला नको हाच यामागे उद्देश आहे. येथील स्थानिक लोक मोहाच्या फुलापासून दारु बनवण्याचा उद्यग करतात.
सफारींचे नियोजन
सफारी हाच या जंगलसृष्टीच्या स्वर्गासुखाचा मार्ग ! त्यामुळे त्याचे बुकींग पूर्वनियोजितच असावे.
ताडोबाची पहिली सफर प्रातःकाली साडेपाच वाजताच सुरु होते. उन्हाळा आणि हिवाळ्याचा काळ या सफारींसाठी उत्तम ! ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात असल्यामुळे उन्हाळा अत्यंत उकाड्याचा पण तरीही सकाळ सफारीमुळे प्रसन्न होते. बहिरी ससाणा आणि मेन गेटजवळच्या तळ्यातील सुंदर बदके अंतरास सुखावून जातात! अनेकविध पक्षी, रानमांजरे, रानकोंबड्या, हरणे, बारहसिंगे, नीलगायी, हत्ती सारे काही अद्भूत ! मात्र जंगलच्या राजाच्या दर्शनासाठी फार मोठे धैर्य असावे लागते ! पहिल्याच सफारीत ते होईल असे नाही. दुपारच्या वेळेत जंगलच्या नियमांनुसार कोणत्याही पर्यटकाला जंगलात प्रवेश करता येत नाही. साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपयर्यंत अशी आणखी एक जंगल सफारी केली जाते. पुन्हा एक अद्भुत सफारी व्याघ्रदर्शनासाठी ! कित्येकदा व्याघ्रराजे हुलकावणी देऊन जवळूनच निघून जातात. अशा क्षणांना चित्रीत करून आठवणीत साठविता यावे यासाठी पर्यटकांनी सुसज्ज कॅमेरा मात्र अवश्य सोबत बाळगावा !
निवासाची व्यवस्था
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे जंगल रिसोर्ट (मोहर्ली) हे निवासासाठी उत्तम ठिकाण ! कुटुंब अथवा दोस्तमंडळी एकत्र राहू शकतील अशा हवेशीर आणि सुस्थितीत रूम्स मंडळाच्या जंगल रिसोर्टला उपलब्ध असतात ज्याचे बुकींग मुंबई, नागपूर आणि ईतर विभागीय कार्यालयांमधुन करता येते.
भद्रावती
भद्रावती किंवा भांडक नावाने ओळखले जाणारे हे गाव आपल्या ऐतिहासिक स्थापत्य कलेची साक्ष देणारे ! गोंड राजा भांकासिंह यांच्या काळातील भांकागढ म्हणजेच आजही ३ एकरात अस्तित्वात असलेला भद्रावतीचा किल्ला ! या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गोंड राजाचे राज चिन्ह कोरलेले आढळते. गोंड, सातवाहन आणि कौशल वंशांची संस्कृती अनुभवलेले हे गाव किल्यासह विशेषत्वाने ओळखले जाते येथील जैन मंदिरासाठी ! स्वच्छ, शांत आणि प्रसन्न असे हे मंदिर पर्यटकांना मनःशांती देऊन जाते. देव देव्हाऱ्यात नाही असे मानणारे आपण मनःशांतीच्या शोधात मात्र अशा स्थळी नक्कीच विसावतो यात शंका नाही !
आनंदवन (वरोरा)
इतरांसाठी जगणे म्हणजे काय याची प्रचिती देणारे ठिकाण म्हणजे आनंदवन ! मॅगसेसे पुरस्कार विजेता बाबा आमटे यांनी कुष्टरोग्यांसाठी स्थापलेली ही संस्था केवळ एक संस्था नसुन ते माणुसकी जपणारे आणि ती वृद्धिंगत करणारे जीवंत उदाहरण ! नागपुरहून १०० किमी अंतरावर असलेले आनंदवन केवळ महारोग्यांचे निवासस्थान किंवा इस्पितळ नसून त्यांचे पुनरूत्थान करणारे कुटुंबच जणु ! येथील आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे इथले निवासी नित्योपयोगी आणि आकर्षक सुबक वस्तू तयार करून स्वतःच्या उपजिवीकेसह सकारात्मक कार्यात हातभार लावतात! आमटे कुटुंबाच्या या दिव्यत्वाचे तेज अनुभवावे ते आनंदवनला प्रत्यक्ष भेट देऊनच !
संकलन : तृप्ती अशोक काळे