बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

फ्लेमिंगो अभयारण्य

लाखभर पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेला ठाणे खाडी परिसर राज्य सरकारने ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे संजय  गांधी राष्ट्रीय उद्यानापाठोपाठ मुंबईतील हे दुसरे अभयारण्य म्हणून ओळखले जाणार आहे. या निर्णयामुळे हा परिसर आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यास संधी मिळणार असून ठाणे खाडी परिसरासह विक्रोळी, भांडूप, कांजूर, मुलुंड या भागातील पाणथळ जागी बांधकामासाठी परवानगी मिळावी म्हणून टपून बसलेल्या बिल्डर लोकांचे मनसुबे आता धुळीस मिळाले आहेत.
 
राज्य सरकारच्या महसूल आणि वनविभागाने 6 जुलै 2015 रोजी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्याप्रमाणे 16905 चौ.कि.मी.चा भूभाग फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून गणला जाईल. त्यात मुलुंड, विक्रोळी, भांडूप, कांजूर, कोपरी, तुर्भे गावाची सीमा, नाहूर, सायन-पनवेल महामार्ग तसेच मंडालेतील भूभाग समाविष्ट असेल.
 
ठाणे खाडी परिसरात सुमारे दोन लाख पक्ष्यांचे अस्तित्व होते. मात्र पाणथळ जागावर टाकण्यात आलेला भराव आणि अतिक्रमणामुळे हे प्रमाण आता एक लाखावर आले आहे. आता खाडी परिसराला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा मिळणार असल्याने या संपूर्ण परिसरातील अतिक्रमणे राज्यसरकारला हटवावी लागणार आहेत. परिसरातील अधिकृत बांधकामांचीही अन्यत्र व्यवस्था करावी लागणार आहे.
 
या परिसरातील जमिनीवरील बांधकामांचे स्वरूप, व्याप्ती यांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मुंबई उपनगर, जिल्हा मुंबई उपनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
अभयारण्यात समावेश करण्यात येणारा खाडीलगतचा पश्चिमेकडचा भाग मुलुंड, विक्रोळी, भांडुप, कांजूर, मंडाले इत्यादी खाडी क्षेत्राचा भाग 794.487 हेक्टर इतका आहे. 
 
पश्चिमेकडचे आणि खाडी क्षेत्राचे मिळून पाऊण क्षेत्रफळ 1690.5255 हेक्टर इतके आहे. पक्ष्यांची संख्या कमी झाली असली तरी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
 
म. अ. खाडिलकर