शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बिहार विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (16:56 IST)

तेजस्वी यादव : 'बिहारमध्ये बेरोजगारी हा मुद्दा कधीच नव्हता, आता मात्र लोक स्थलांतर करत आहेत'

बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवार (5 नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. सत्ताधारी जनता दल (संयुक्त)-भाजप यांच्या आघाडीला राजद-काँग्रेसच्या महागठबंधनचं कडवं आव्हान आहे. महागठबंधनचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 17 सभा घेतल्या. आतापर्यंत त्यांनी जवळपास 230 प्रचारसभा बिहार निवडणुकीसाठी घेतल्या. इतक्या सभा इतर कोणत्याच नेत्याने घेतलेल्या नाहीत.
 
बुधवारीही (4 नोव्हेंबर) सकाळपासून 16-17 सभा घेतल्या. त्यानंतर मधेपुराच्या सागर सेवा सदनमध्ये त्यांची मुलाखत बीबीसीने घेतली. यावेळी तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. बिहारमध्ये बेरोजगारी हा मुद्दा कधीच नव्हता. या निवडणुकीत हा प्रमुख मुद्दा बनला आहे. लोक स्थलांतर करत आहेत. तसंच नितीश कुमार यांचं सरकार भ्रष्टाचारी असून त्यांनी 60-60 घोटाळे केल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.
 
तेजस्वी यादव यांच्या मुलाखतीतील संपादित अंश इथं देत आहोत.
 
प्रश्न - तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय, काय अपेक्षा आहेत?
 
उत्तर - लोकांमध्ये खूप उत्साह आहे. आम्ही एक अजेंडा पुढे ठेवला आहे. कमाई, शिक्षण, औषध आणि सिंचन. हेच निवडणुकीचे मुद्दे असतील. आम्ही याच गोष्टी लोकांसमोर मांडायचं ठरवलं आहे. भ्रष्टाचार हा इथला प्रमुख मुद्दा आहे. नितीशकुमार यांच्याविरुद्ध लोकांमध्ये फक्त आक्रोशच नाही, तर द्वेषसुद्धा आहे. गेल्या 15 वर्षांपासून त्यांचं सरकार आहे. पण लोकांना काहीच मिळालं नाही. लोकांना स्थलांतर करावं लागलं. यामुळेच आम्ही महागठबंधन करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न - या निवडणुकीचा अजेंडा 10 लाख रोजगार हा आहे. हे एक आंदोलन असल्याचं तुम्ही म्हणत आहात. पण ही कल्पना लोकांकडून मिळाली की तुमचीच कल्पना लोकांकडून मांडली गेली?
 
उत्तर - आम्ही निवडणुकीत कधीच बेरोजगारी हा मुद्दा बनल्याचं आतापर्यंत पाहिलं नाही. पण बिहारमध्ये कोरोना काळात बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे. इथं बेरोजगारी दर 46 टक्के आहे. लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अडचणी तुम्हाला समजतात.आम्ही आधीही लोकांचे मुद्दे घेतले. कोरोना काळात बेरोजगारी हटाव यात्रेवर आम्ही निघालो होतो. लोकांच्या मूलभूत गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा यांचा मुद्दा आम्ही पुढे केला होता. 15 वर्षं राज्याची सत्ता उपभोगणाऱ्यांकडे कोणताच उपाय नाही.
 
प्रश्न - तुम्ही 15 वर्षांची गोष्ट करत आहात. पण NDA आघाडी तुमच्या वडिलांचा जंगलराज हा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांमध्ये लालू-राबडी यांचा काळ आठवा, असं सांगत असतात. याबाबत तुम्ही काय सांगाल? तुमचं सरकार आल्यास कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल?
उत्तर - गेल्या 15 वर्षांत त्यांनी काहीच केलं नाही. म्हणूनच जंगलराजचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
ते इतिहासातील गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्हाला भविष्याची काळजी आहे. ते काय म्हणतात, याने काहीच फरक पडत नाही. सध्याचं वास्तव काय आहे, यावर चर्चा होऊ शकते.
 
सरकारी संस्थांनी दिलेल्या माहितीवर चर्चा करता येऊ शकेल. तुम्ही NCRB ने आमच्या सरकारबाबत दिलेला अहवाल पाहा. या 15 वर्षांतली आकडेवारी पाहा. शिवाय, आम्ही सरकारमध्ये होतो, तेव्हाच्या 18 महिन्यांच्या काळातील आकडेवारी बघा. गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे.
 
प्रश्न - तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही, असं विरोधकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं?
 
उत्तर - नितीश कुमार हे स्वतः थकले आहेत. त्यांना बिहार सांभाळता येत नाही. बिहारचं एकूण बजेट 2 लाख 13 हजार कोटी इतकं आहे. यापैकी 40 टक्के रक्कम ते खर्च करू शकत नाहीत. राईट टू एज्यूकेशनचे 24 ते 25 हजार रुपये ते खर्च न होता शिल्लक राहतात.
 
नितीश कुमार 500 कोटींच्या जाहिराती देतात. इतका पैसा आहे, पण लोकांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होतो. 60-60 घोटाळे करण्यासाठी पैसा आहे.
 
राष्ट्रीय मानक संस्थेच्या सूचनेनुसार पद वाढवा, इतर विभागांचा जिर्णोद्धार होईल. शाळा-महाविद्यालयात शिक्षक असतील. रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स उपलब्ध असतील. मणिपूरमध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे एक हजार पोलीस बल उपलब्ध आहे. पण बिहारमध्ये इतक्याच लोकसंख्येसाठी फक्त 77 पोलीस आहेत. हे प्रमाण वाढवणं आवश्यक आहे.
प्रश्न - तुम्ही पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या प्रत्येक सभेत तुम्ही तुमचा पक्षा A to Z असल्याचं सांगत असता...
 
उत्तर - काही लोकांना वाटतं की राजद एका विशिष्ट जाती किंवा धर्माचा पक्ष आहे. पण सुरुवातीपासूनच राजद A to Z पक्ष आहे. इथं सवर्ण, मागासवर्गीय किंवा दलित आणि अल्पसंख्याक सर्वांचा समावेश आहे. विरोधकांनी आम्ही कमकुवत होण्यासाठी हा गैरसमज पसरवला. पण आम्ही समाजातील प्रत्येक वर्गाला सोबत घेऊन जाणार आहोत.
 
प्रश्न - निवडणुकीसाठीच्या प्रचारसभांचं द्विशतक पूर्ण झालं. पण निकालाच्या दिवशी काय होईल, शतक पूर्ण होईल?
 
उत्तर - आम्ही पूर्ण बहुमताससह सरकार बनवणार आहोत. जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला मिळेल. पहिल्या दोन टप्प्यांमध्येच नितीश सरकार जाणार हे निश्चित झालं होतं. तिसऱ्या टप्प्यात आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे.