रितेशसोबत काम करणे भाग्याचे: नर्गिस
अभिनेता रितेश देशमुखसोबत काम करणे सहज सुंदर असल्याचे नर्गिस फाक्रीने म्हटले आहे. आगामी ‘बँजो’ चित्रपटात दोघे एकत्र काम करीत आहेत. रितेशसोबत काम करणे भाग्याचे आहे, कारण तो चांगला अभिनेता तर आहेच, पण तो व्यक्ती म्हणूनही खूप चांगला आहे. तो अतिशय काळजी घेणारा अभिनेता असल्यामुळे त्याच्यासोबत काम करणे सहज सुंदर होते.
शूटिंगच्यावेळी त्याने खूप गमती केल्या. मी खूप भाग्यवान आहे, असे नर्गिस फाक्री म्हणाली. ‘बँजो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग एफएम’ रेडिओमध्ये आलेल्या नर्गिसने रितेशसोबतचा कामाचा अनुभव सांगितला.
मॉडेल अभिनेत्री असलेल्या नर्गिसने यावेळी मराठी भाषाही शिकून घेतली. सध्या सुरू असलेल्या गणेश उत्सवाबद्दल नर्गिस म्हणाली, सर्व उत्सव उत्साह वाढवणारे असतात असे मला वाटते. गणेश उत्सव हा जास्त आनंददायी आहे.
चित्रपटाचे प्रमोशन या उत्सवात करताना खूप आनंद झाला. या प्रमोशनसाठी हजर असलेल्या रितेशनेही आपला बँजो वाजवण्याचा अनुभव सांगितला. रितेश म्हणाला, हे वाद्य माझ्यासाठी एकदम परके नाही. माझ्या घरी एक बँजो आहे. मला ते वाद्य कसे वाजवायचे हे माहिती आहे. पण माझ्या भूमिकेसाठी मला खूप कष्ट घ्यावे लागले. मी बँजो वाजवणार्या व्यक्तींना भेटलो आणि त्यांना वाजवताना पाहिले. बँजो वाजवणे हे अगदी शर्तीचे काम आहे. एखाद्या रॉकस्टार ग्रुप प्रमाणे आम्ही हे वादन सादर करावे अशी रवी जाधव यांची इच्छा होती. त्यामुळे स्टायलिशपणे हे वाद्य वाजवण्याचा आम्ही प्रयत्न केला.