शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रेहमानसाठी ‘विराट’ म्हणणार गाणे

क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणारा विराट कोहली आता आपल्याला गाताना दिसणार आहे. चक्क ए. आर. रहमान या दिग्गज संगीतकाराने विराटला आपल्या संगीतावर सूर पकडण्याची संधी दिली आहे. ‘फुटसॉल लीग’ या स्पर्धेसाठी निर्मिती करण्यात आलेले हे गाणे विराट कोहली याने रेहमानसोबत नुकतेच रेकॉर्ड केले. ‘नाम है फुटसॉल’ असे या गाण्याचे बोल आहेत. 20 जूनला हे गाणे रिलीज करण्यात येणार आहे.
 
रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये विराटने रेहमानसोबत एक सेल्फी काढून आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट हा ‘फुटसॉल लीग’चा ब्रँड अँबेसेडर असून ही स्पर्धा देशातील आठ शहरात 15 ते 24 जुलैदरम्यान होणार आहे. विराटला त्याच्या गायकीविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘रेकॉर्डिग स्टुडिओत माईक समोर उभा राहून गाणं म्हणण्यापेक्षा मला क्रिकेटच्या मैदानात फास्टर बॉलिंगवर सिक्स ठोकायला सोपं वाटतं. पण ए. आर. रेहमानसारख्या संगीतकारासोबत मला एक वेगळी ‘इनिंग’ खेळायला मिळाली हा अनुभव माझ्यासाठी खूपच भन्नाट होता. रेहमानजींनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याने मी रेकॉर्डिगच्या काळापुरता का होईना माझ्या बालपणीच्या आठवणीत हरवून गेलो होतो. त्यांच्या या कलात्मकतेला माझा नेहमीच सलाम राहील.’ असे म्हणत विराटने रेहमान यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.