रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2019 (11:12 IST)

... शाहरुखच्या पार्टीत आमिरने नेला स्वतःचा डबा

बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या चित्रपटांसाठी आणि कलाविश्र्वात असणार्‍या स्थानासाठी ओळखले जातात. त्यासोबतच ही कलाकार मंडळी आणखी एका कारणासाठी ओळखली जातात. ते कारण म्हणजे सेलिब्रिटी पार्टी. अशाच एका सेलिब्रिटी पार्टीविषयी आमिरने केलेला खुलासा सध्या अनेकांच्या भुवया उंचावत आहे. अर्थात त्यामागचं कारणंही तसंच आहे. परफेक्शनिस्ट आमिर कधी, कुठे, कसा वागेल आणि त्याचा परफेक्शनिस्टपणा सिद्ध करेल याचा खरंच काही नेम नाही हेच त्याने सांगितलेला तो किस्सा ऐकून लक्षात येत आहे. विविध चित्रपटांतील भूमिकांसाठी लूकप्रमेणेच आमिर शरीरयष्टीवरही तितकंच लक्ष देतो. ज्यासाठी अनेकदा त्याला खाण्यापिण्याच्या सवयींवरही लक्ष द्याव लागतं. याचं उदाहरण त्याच्या 'दंगल' या चित्रपटाच्या वेळी पाहायला मिळालं. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात आमिरला त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींविषयी काही प्रश्र्न विचारण्यात आले. डाएटविषयी विचारण्यात आलेल्या या प्रश्र्नाचं उत्तर देत, मी माझ्या खाण्याचा डबा सोबत नेतो' असं तो म्हणाला. आमिरचं हे उत्तर ऐकून अनेकांना धक्काच बसला. पण, त्याने याविषयी खोटं वाटत असल्यास तुम्ही शाहरुखला याविषयी विचारा असं तो म्हणाला. शाहरुख खानच्याच घरी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत घडलेल्या प्रसंगाची त्याने माहिती दिली. 'अ‍ॅपलचे सीईओ भारतात आले असता शाहरुख खानने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्याच्या घरी अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा जेवणास सुरुवात केल्यानंतर गौरी खानने येऊन मला त्याबद्दलची माहिती दिली. तिने जेवायला जाण्यास सांगताच मीही उत्साहात म्हटलं हो चला... पण, मी माझा स्वतःचा खाण्याचा डबा आणला आहे', असं आमिर म्हणाला. त्याने डबा आणल्याचं ऐकताच गौरीलाही धक्काच बसला. ज्यानंतर आमिरने तिला आपण दंगल या चित्रपटासाठी तयारी करत असल्याचं सांगितलं होतं.