शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (11:27 IST)

वाढदिवसानिमित्त : म्हणून अमिताभ झाले बच्चन

कवी हरिवंशराय यांनी आपले उपनाव ‘बच्चन’ असे स्वीकारले होते. अन्यथा ते हरिवंशराय श्रीवास्तव या नावानेच ओळखले गेले असते आणि त्यांचा मुलगा अमिताभ श्रीवास्तव याच नावाने ओळखला गेला असता. 11 ऑक्टोबर 1942 च्या संध्याकाळी अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला. हरिवंशराय बच्चन यांच्या घरी रोज रामचरित मानस, गीतेचे नियमित पठण होत असे. अमिताभ आजही गीता-रामायणाचे नियमित पारायण करतात.
 
सुमित्रानंदन पंत यांनी जेव्हा नर्सिग होममध्ये नवजात बाळाला पाहिले तेव्हा ते त्यांना अत्यंत शांत असलेले दिसले, जणूकाही ध्यानस्त अमिताभ. म्हणून बच्चन दाम्पत्याने त्याचे नाव अमिताभ असे ठेवले. हरिवंशराय बच्चन यांचे मित्र अमरनाथ झा यांना भारत छोडो आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जन्मलेल्या बाळाचे नाव ‘इंकलाब राय’ असे ठेवायचे होते. परंतु पंतांच्या सांगण्यावरुन त्याचे नाव अमिताभ ठेवण्यात आले. 
 
सुरुवातीला अमिताभ त्यांच्या कुटुंबीयांसाठी केवळ अमित होते. त्यांची आई त्यांना मुन्ना म्हणायची. तेजी बच्चन यांच्या बहिणीने अमिताभ यांचे टोपणनाव बंटी ठेवले होते. लहानपणी त्यांचे मुंडण झाले त्या दिवशी त्यांना एका रेडय़ाने डोक्याला मारले होते. त्यात त्यांच्या डोक्याला जबर जखम होऊन टाके लागले होते. 
 
पहिल्यांदाच राणीच्या बागेत जाण्यासाठी अमिताभ यांनी घरातून चार आण्याची चोरी केली होती. अमिताभ यांच्याकडे एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याची खुबी आहे. तरुणपणात त्यांना वायुसेनेत सहभागी होण्याची इच्छा होती. त्यांना इंजिनिअर व्हायचे होते. अमिताभ यांच्या आवाजाला सुरुवातीच्या काळात ऑल इंडिया रेडिओने नकार दिला होता.