बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (12:14 IST)

बिग बींनी धरली दक्षिणेची वाट

दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहतावर्ग आणि वेगळ्या धाटणीचे कथानक पाहता अनेक कलाकारांना दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची इच्छा असते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही हा मोह आवरला नाही. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार चिरंजीवी यांच्या आगामी चित्रपटात ते भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. चिरंजीवी यांच्या 'से रा नरसिम्हा रेड्डी' या तेलुगू चित्रपटात ते पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली असून चित्रपटातील त्यांचा लूकसुद्धा पोस्ट केला आहे. 'दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा, चिरंजीवी. त्यांच्या आगामी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याची विनंती त्यांनी माझ्याकडे केली आणि मी ती मान्य केली आहे.

त्याच्या शूटिंगसाठी मी हैदराबादला रवाना होत आहे. चित्रपटातील माझ्या लूकचा फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा अंतिम नाही मात्र, लूक असाच काहीसा असेल,' असं बिग बींनी लिहिलं. अमिताभ बच्चन यांनी 'मनम' या तेलुगू चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्याचप्राणे लवकरच त्यांचा '102 नॉट आऊट' हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ते 75 वर्षीय मुलाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मुलाची भूमिका ऋषी कपूर साकारणार आहेत.