गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (16:23 IST)

गुलजार यांच्या आईंना वाटायचं की ते नेहमी कर्ज घेऊन आणि गुरुद्वारात जेवून दिवस काढतील

guljar
एखादी व्यक्ती प्रतिभा, परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर त्याच्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचू शकते. पण जर तेच एखादा व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपली ओळख निर्माण करत असेल तर त्याला आपण गुलजार असंच म्हटलं पाहिजे.
 
गुलजार यांच्या कामाचा आवाका पहिला आणि त्यांची अनेक शैलींमध्ये सतत काम करण्याची वृत्ती पाहिली तर एखाद्याचा विश्वास बसणार नाही.
 
अगदी न थकता आणि कामात तोचतोचपणा न आणता काम करणं तसं अवघड. पण गुलजार मात्र या कामात चुकले नाहीत.
 
पाच दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात गुलजार बदलता काळ आणि तरुण पिढीचा उत्साह या दोन्ही गोष्टींना वेळोवेळी न्याय देत राहिले.
 
हम सबके मेहबूब
बॉलीवूडमध्ये दर शुक्रवारी एखादा तारा उगवतो तर एखादा मावळतो. पण पाच दशकं आपलं अस्तित्व राखून ठेवणं चेष्टेची गोष्ट नाही.
 
केवळ यशाचं शिखर गाठण्यासाठी हे अस्तित्व टिकवून ठेवलेलं नाही, तर आजूबाजूच्या जगातील गोष्टी अनुभवून त्याला 'गुलजार' करणं हे त्यांचं काम आहे.
 
त्यामुळेच तर गुलजार आपल्या सगळ्यांचे आवडते आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते 89 वर्षांचे प्रियकर आहेत.
 
पण गुलजार एका दिवसात लोकांचे आवडते बनले नाहीत. जीवनातील अडथळ्यांनी त्यांच्यात गांभीर्य निर्माण केलं. त्यांचा जन्म आजच्या पाकिस्तानमधील दिना येथे झाला. त्यांचं मूळ नाव संपूरण सिंह कालरा असं होतं, पण त्यांनी नाव बदलून गुलजार केलं.
 
बॉलीवूडच्या जगतात गोऱ्या रंगाला किती महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण गुलजार यांना मात्र सावळ्या रंगाची भुरळ पडली होती. म्हणून त्यांनी पहिलंच गाणं लिहिलं, 'मोरा गोरा अंग लइ ले, मोहे श्याम रंग दे दई...'
 
पटकथा लिहायला बसले तर आनंद सारख्या चित्रपटाची निर्मिती झाली. यातला नायक हसत हसत मृत्यूला कवटाळतो. त्यांच्या चित्रपटांमध्ये भावनांचा कल्लोळ दाटलेला दिसतो.
 
दूरदर्शनवरील मालिकांचा विचार केला तर मिर्झा गालिब समोर येतात. मोठ्या पडद्यावर जसा मुघल-ए-आझम साकारला होता अगदी तसाच गालिब छोट्या पडद्यावरचा बादशाह ठरला.
 
छोड़ आए हम वो गलियां...
या सगळ्यातून वेळ काढून गुलजार यांनी शायरी केली, कविता केल्या, कथानकं लिहिली. गुलजार आपली संपूर्ण प्रतिभा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात वापरू शकतात. आणि हा स्वतःमध्येच एक चमत्कार आहे.
 
या सगळ्यांत तुम्ही त्यांना एखाद्या विषयावर बोलायला सांगितलं तर ते तयारी न करता अगदी तासनतास त्या विषयावर बोलू शकतात. आणि त्यांचं बोलणं ऐकताना थिएटर हॉलमध्ये हजारो श्रोते असतील तरी कुठेही चूळबूळ होत नाही. हिंदी आणि उर्दूत घोटलेले त्यांचे शब्द, त्यांची भाषा आणि त्यांचे संदर्भ ऐकून अधूनमधून टाळ्यांचा गजर होतो.
 
गुलजार यांचा हा प्रवास सुरू झाला 1947 च्या फाळणीनंतर. देश विभागल्यानंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं.
 
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे वडील छोटे-मोठे व्यवसाय करू लागले. फाळणीच्या काळात झालेला हिंसाचार गुलजार वर्षानुवर्षे विसरू शकले नाहीत. त्यावेळी ते अकरा-बारा वर्षांचे होते.
 
डोळ्यांसमोर त्यांनी शेकडो लोकांना मरताना पाहिलं होतं. लाखो लोक एका रात्रीत उद्ध्वस्त झाले होते. लहान वयात मिळालेल्या जखमा आयुष्यभर भरून येत नाहीत. गुलजार यांच्या मनात आजही या आठवणी ताज्या आहेत.
 
म्हणूनच गुलजार लिहितात, डोळ्यांना व्हिसाची गरज नसते, स्वप्नांना सीमा नसतात, मी बंद डोळ्यांनी रोज सीमेपार जातो. त्यांनी जेव्हा माचिस चित्रपट बनवला तेव्हा त्यांच्या वेदना काहीशा अशा पद्धतीने बाहेर आल्या...
 
छोड़ आए हम वो गलियां, छोड़ आए हम वो गलियां...
 
जहां तेरे पैरों के कंवल गिरा करते थे...
 
हंसे तो दो गालों में भंवर पड़ा करते थे...
 
तेरी कमर के बल पे नदी मुड़ा करती थी...
 
हंसी तेरी सुन-सुनके फ़सल पका करती थी...
 
चित्रपट जगताकडे कल
पण गुलजार या वेदनेपुरते मर्यादित राहिले नाहीत. ते म्हणतात, "वेळेबरोबर मला जाणवलं की कमी बोलण्यात जास्त अर्थ दडलाय. जास्त बोलल्याने वाक्याचा अर्थ संपतो."
 
म्हणून हेच गुलजार जेव्हा चेष्टेच्या मूडमध्ये येतात तेव्हा लिहितात, 'गोली मार भेजे में, भेजा साला शोर करता है...'
 
हेच गुलजार एक प्रेमकविता लिहितात... टतुम्हारे ग़म की डली उठा कर.. ज़ुबां पर रख ली है देखो मैं ने... वह क़तरा क़तरा पिघल रही है... मैं क़तरा क़तरा ही जी रहा हूं...'
 
गुलजार यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याची आवड होती. गुलजार यांच्या वडिलांना वाटायचं की कविता आणि गोष्टी लिहून आपलं पोट भरत नसतं. त्यामुळेच ते आपल्या नातेवाईकांना सांगायचे की, हा आपल्या भावांकडून कर्ज घेईल, गुरुद्वाराच्या लंगरमध्ये जाऊन आपली भूक भागवेल.
 
1950 मध्ये गुलजार आपल्या भावाला कामात मदत करण्यासाठी मुंबईत आले. आपण एक दिवस सिनेसृष्टीत काम करू असं त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. सुरुवातीला त्यांनी मोटार गॅरेजमध्ये काम केलं पण हळूहळू त्यांचा चित्रपट जगताकडे कल वाढला.
 
मोहे श्याम रंग दे दई...
त्या काळात गुलजार चित्रपट गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होते. डाव्या विचारसरणीमुळे गुलजार शैलेंद्रसारख्या गीतकारांच्या संपर्कात आले. पुढे ते बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. पण त्यांना लेखन सुरू करता आलं नाही.
 
शैलेंद्र यांनीच त्यांना सर्वप्रथम बिमल रॉय यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची प्रेरणा दिली. त्यांनीच बिमल रॉय यांचे सहकारी देबू सेन यांना गुलजार यांचं नाव सुचवलं. अशा प्रकारे 1963 मध्ये बंदिनी चित्रपटातील 'मोरा गोरा अंग लइ ले, मोहे श्याम रंग दे दई...' हे गाणं गुलजार यांनी लिहिलं.
 
बिमल रॉय यांच्या निधनानंतर गुलजार हृषिकेश मुखर्जी यांचे सहाय्यक बनले. हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांचे स्क्रीन प्ले आणि गाणी यामुळे गुलजार यांना कमालीचं यश मिळवून दिलं. त्यात आशीर्वाद, आनंद आणि गुड्डी या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे.
 
गुलजार यांना आनंदसाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, पण ते इतके घाबरले होते की ते स्वीकारण्यासाठी ते स्टेजवर गेले नाहीत.
 
मात्र नंतर हा पुरस्कार घेण्यासाठी त्यांना तब्बल 19 वेळा स्टेजवर चढावं लागलं. पहिल्या पुरस्कारानंतर त्यांना पुरस्कार घेण्याची सवयच लागली होती, कारण त्यांचं कामच त्या तोडीचं होतं.
 
यशस्वी प्रयोगांचा कालावधी
हृषिकेश मुखर्जी यांच्या सोबत सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर गुलजार दिग्दर्शक म्हणूनही बऱ्यापैकी यशस्वी झाले. त्यांच्या चित्रपटांमध्ये मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, माचीस आणि आंधी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
 
माचीसनंतर गुलजार यांनी चित्रपट दिग्दर्शनाला अलविदा ठोकला. आणि गाणी लिहायला सुरुवात केली. त्यामुळे काही वर्षांतच त्यांना स्लमडॉग मिलेनियरसाठी ऑस्कर मिळाला.
 
'बिडी जलइले' पासून 'दिल तो बच्चा है जी' पर्यंत गुलजार यांनी नवनवे प्रयोग केले आणि विशेष म्हणजे ते त्यात यशस्वी देखील झाले.
 
मात्र या संपूर्ण प्रवासात गुलजार यांनी इतरांची नक्कल केल्याचा आरोपही करण्यात आला. मग ते 'इबने बतूता, पहनके जुता' किंवा 'ससुराल गेंदा फूल' अशी गाणी असतील.
 
गुलजार यांनी गालिबचे शेर इतके वापरले आहेत की गालिबच्या नावाने पेन्शन मिळत असल्याचे ते स्वतः सांगतात. जी पेन्शन गालिबला कधी मिळूच शकली नाही.
 
गुलजार लिहितात, गालिबचं कर्ज घेणं, ते कर्ज वेळेत फेडता आलं नाही म्हणून त्यासाठी सबबी शोधणं, या गोष्टी मला भावनिकरित्या गालिबच्या जवळ घेऊन जातात. पण ते नक्कल करण्यात सुद्धा यशस्वी झाल्याचं त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय.
 
गुलजार आज त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, त्यामुळे आजकाल ते त्यांच्या प्रकृतीवर काम करत आहेत. कविता लिहिणं, रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांचं भाषांतर करणं हे काम सुरूच आहे. त्यांनी तीस वर्षांपूर्वी आपली मुलगी बोस्की म्हणजे मेघनासाठी बोस्कीचं पंचतंत्र लिहिलं होतं. आता ते आपल्या नातवासाठी पंचतंत्र नव्याने लिहित आहेत.
 
क्रिकेटच वेड
या टप्प्यावर आजही गुलजारसाठी काही गोष्टी बदललेल्या नाहीत. मुंबईत राहूनही गुलजार पहाटे पाच वाजता उठतात. सूर्याने त्यांना उठवण्यापूर्वी त्यांना सूर्याला उठवायचं असतं असं ते म्हणतात.
 
रोज उठल्यानंतर वांद्र्याच्या जिमखाना क्लबमध्ये टेनिस खेळल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. टीव्हीवर टेनिस आणि क्रिकेटचे सामने सुरू असले की गुलजार दुसरं कोणतंही काम करत नाहीत.
 
ते रॉजर फेडरर, आंद्रे अगासी आणि जॉन मॅकनरो सारख्या स्टार्सचे चाहते आहेत. त्याचबरोबर क्रिकेटच्या जगतात त्यांना सुनील गावस्कर आणि वसीम अक्रम आवडतात. गुलजार यांचं क्रिकेटवर इतकं प्रेम आहे की ते त्यांच्या स्वप्नातही अनेकदा क्रिकेट खेळतात.
 
या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त सार्वजनिक जीवनात गुलजार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी दोन महत्त्वाचे पैलू आहेत. ते नेहमी पांढऱ्या कपड्यातच दिसतात.
 
असं का याचं उत्तर देताना गुलजार, नसरीन मुन्नी कबीर यांना म्हणाले की, जेव्हा ते वेगळ्या रंगाचे कपडे घालतात तेव्हा त्यांच्या खांद्यावर एक अनोळखी व्यक्ती येऊन बसल्याचं त्यांना वाटतं. खरं तर एकाच रंगाचे कपडे घालून त्यांनी गुलजार शैली विकसित केली आहे.
 
वेगाची आवड
याशिवाय ते नेहमी उर्दूमध्येच लिहितात. त्यांची गाणी आणि स्क्रिप्ट्स बऱ्याचदा उर्दूमध्ये लिहिलेल्या असतात त्यामुळे त्यांच्या गाण्यांची नक्कल करणं शक्य होत नाही.
 
गुलजार यांच्या व्यक्तिमत्त्वात आणखी एक खास गोष्ट आहे. शांत दिसणाऱ्या गुलजार यांना गाडी वेगात चालवण्याची सवय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ते लाँग ड्राईव्हला जातात.
 
पण आपल्या सगळ्यांना गुलजार आवडतात त्यांच्या गाण्यांसाठी, चित्रपटांसाठी, त्यांच्या शायरीसाठी, कवितांसाठी, कथांसाठी. चित्रपटात दिलेल्या योगदानामुळे त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
 
पण आता गरज आहे ते, साहित्यविश्वाने चित्रपटसृष्टीतील लेखनाव्यतिरिक्त गुलजार यांचं लेखन गांभीर्याने घेण्याची.