बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हॅप्पी बर्थडे ऐश्वर्या राय

सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. अनेकांकडे सौंदर्य असतं आणि वरचा मजला रिकामा असतो. ऐश्वर्या त्याही बाबतीतही ऐश्वर्यसंपन्न आहे. तिच्या व्यक्तीमत्वात नैसर्गिक कलागुण व बुद्धिमत्तेचा सुयोग्य मिलाफ झालेला आहे. दाक्षिणात्यांच्या सौंदर्याच्या कल्पना काही वेगळ्या असतात. त्यांच्या सौंदर्याचा रंगही सावळा असतो ऐश्वर्या मात्र या रूढ कल्पनेला सणसणीत अपवाद आहे.
हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. तिच्या जन्मानंतर राय कुटुंबीय मुंबईत आलं. तिचं बालपण मुंबईतंच गेलं. लहानपणापासून बहुभाषिक, बहुसांस्कृतिक वातावरणाचा संस्कार झालेल्या ऐश्वर्याचे व्यक्तिमत्वही म्हणूनच कॉस्मोपॉलिटिन वाटतं. दाक्षिणात्य ठसा तिच्यात नाही. त्याचप्रकारे ती कुठल्याही एका प्रांताची वाटत नाही. म्हणून जगातल्या दहा ऐश्वर्यवतींमध्ये ती शोभून दिसते. टाईमच्या मुखपृष्ठावरही झळकते. आणि कान्सच्या चित्रपट महोत्सवातही कॅमेऱ्याचे झोत आपल्यावर आकर्षून घेते. 
 
ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका आहेत आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ होते. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. थोडक्यात तिची पार्श्वभूमी अगदी उच्चशिक्षित कुटुंबाची आहे. 
शिक्षण, संशोधन व साहित्य अशा संगतीत वाढलेल्या ऐश्वर्यावर हे संस्कार होणे अगदी सहाजिक होते. व्यक्तिमत्वातल्या सौंदर्याने ऐश्वर्याला जगाकडे बघण्याची सुंदर नजर दिली. म्हणूनच वास्तूत सौंदर्य कसे असावे हे सांगणाऱ्या आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात शिक्षण घेणारी ऐश्वर्या पुढे आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात कशी ओढली गेली ते तिला कळलेही नाही. मॉ़डेलिंगकडे वळविण्यासाठी तिला काही करण्याची गरजही कधी पडलीच नाही. कारण या मॉडेलिंग जगालाच या लोभस चेहऱ्याची गरज होती. 
 
मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर पुढे सौंदर्यस्पर्धामध्ये भाग घेणंही आलंच. मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण सुश्मिता सेनच्या स्पर्धेत (?) तिला दुसरा क्रमांक मिळाला. पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूटही तिच्या डोक्यावर चढला. या स्पर्धेत केवळ सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ताही पणाला लागली होती. तिच्या चटपटीत, हजरजबाबी आणि बौद्धिक चातुर्याच्या उत्तरांनी परीक्षकांचंही मन जिंकलं.ऐश्वर्याने जगावर राज्य करायला सुरवात केली तो क्षण हाच. 
 
मिस इंडिया, मिस वर्ल्ड या स्पर्धांनंतर बॉलीवूडची वाट चालण्याची पूर्वापार प्रथा ऐश्वर्यानेही जपली. पण यापूर्वी आलेल्या ग्लॅमरस मॉडेल या चांगल्या अभिनेत्री कधी झाल्याच नाहीत. (अपवाद जुही चावलाचा.) पण हे केवळं सौंदर्याचंच ऐश्वर्य नाही, अभिनयाचंही आहे, हे ऐश्वर्याने खर्‍या अर्थाने दाखवून दिलं. 
ज्याच्या चित्रपटात काम मिळते याचा कलावंतांना अभिमान वाटतो, अशा मणिरत्नम यांच्या 'इरूवर' चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा 'और प्यार हो गया' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. ‍दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा 'जीन्स' या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. 
 
तिच्या सौंदर्यापेक्षाही अभिनयासाठी लक्षात राहिलेले चित्रपट आठवा. हम दिल दे चुके सनममध्ये ती अप्रतिम दिसली होतीच. पण अभिनयाच्या बाबतीतही कमालीची समज पहिल्यांदा दिसून आली. मग देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट हे चित्रपट खास तिच्या अभिनयासाठी ओळखले जातात. याशिवाय अनेक टुकार चित्रपटही तिने केले. पण चांगले काय नि वाईट काय हे समजण्यासाठी अखेर काही चित्रपटांचे दान हे द्यावेच लागते. तिचा जोधा अकबर, सरकार राज हे महत्त्वाचे चित्रपट आहेत.
 
मिसेस ऑफ स्पाईसेस, ब्राईड अँड प्रिजुडाईस, प्रोव्होक्ड, द लास्ट लिजन ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही तिने अभिनयगुणाची छाप सोडली. आर्थिक उदारीकरणाचा काळात भारत जागतिक पातळीवर जात असताना ऐश्वर्या हा भारताचा ब्रॅंड आहे हेही ठसायला सुरवात झाली आहे. 
 
म्हणूनच कान्सच्या चित्रपट महोत्सवात म्हणूनच 'ज्युरी' बनण्याचा मान मिळालेली ती ऐकमेव भारतीय अभिनेत्री आहे. 'टाइम' मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे. लंडनमधील 'वॅक्स म्युझियम'मध्ये तिचा मेणाचा पुतळा आहे. 
 
 गॉसिप तिला कधी चुकली नाहीत. सलमान खानबरोबर तिचे अफेअर हम दिल दे चुके सनमपासूनच जोडले गेले होते. पण दोघांमधील मतभेद व सलमानच्या विचित्र वागण्याच्या बातम्या एकामागोमाग आल्या. मधल्या काळात विवेक ओबेरॉयबरोबरही तिचे नाव जोडले गेले. नंतर मात्र अभिषेक बच्चनबरोबर तिचे नाव आले आणि अखेर तिचे लग्नही त्याचाशीच झाले आणि त्यांना आराध्या नावाची एक गोंडस मुलगी देखील आहे. आता हे दाम्पत्य सुखाने संसार करते आहे.  तिच्या वाढदिवशी सर्व चाहत्यांमार्फत अभिष्टचिंतन चिंतुया. तिला शुभेच्छा देवूया.