राजपूत करणी सेना आता 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणार नाही. सिनेमामध्ये राजपूतांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच आता सिनेमाला विरोध न करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला आहे. करणी सेनेने याबाबतची घोषणा केली आहे. राष्ट्रीय राजपूर करणी सेनेचे नेते योगेंद्र सिंह कटार यांनी सांगितले की, सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह यांच्या आदेशानुसार सिनेमाला विरोध करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करणी सेनेतील काही सदस्यांनी मुंबईमध्ये पद्मावत सिनेमा पाहिला. सिनेमामध्ये राजपूतांनी दिलेले बलिदान व त्यांच्या शौर्याचं वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राजपूताला अभिमान वाटले, असा हा सिनेमा आहे, अशी प्रतिक्रिया करणी सेनेनं सिनेमा पाहिल्यानंतर दिली. सिनेमामध्ये दिल्लीतील सुलतान अलाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यादरम्यान कोणतेही आक्षेपार्ह असे दृश्य चित्रित करण्यात आलेले नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन करणी सेनेनं सिनेमाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर 'पद्मावत' राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यासाठी प्रयत्न करणी सेना करणार आहे, असेही योगेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.