Last Modified शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (12:45 IST)
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा प्रवास थक्क करणारा आहे. अभिनयाबरोबरच विविध कारणामुंळे प्रियांका सतत चर्चेत असते. आता तर ती जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या यादीत विराजमान झाली आहे. याबरोबरच प्रियांका चोप्राबाबत आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. जगभरात गुगलवर सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलेल्या अभिनेत्रींमध्ये प्रियांका अव्वल ठरली आहे.
यामध्ये तिने बॉलिवूडमधील खान मंडळींसह बिग बींना सुद्धा मागे टाकले आहे. ऑक्टोबर 2019 रोजी झालेल्या सर्वेक्षणात बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'ला 2.72 मिलियन पेक्षा जास्त ऑनलाइन सर्च करण्यात आलं आहे. या यादीत प्रियांका नंतर अभिनेता सलमान खानचं नाव आहे. सेमरूशकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने जगातील असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचे सांगितले आहे. या सर्वेक्षणात प्रियांका उच्च स्थानावर आहे. तर सादर करण्यात आलेला हा अहवाल ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 मधील आहे. शिवाय, प्रत्येक महिन्यात गुगलवर प्रियांकाला 4.2 मिलियन चाहते सर्च करतात. या सर्वेक्षणात प्रियांकानंतर सनी आणि दीपिका पदुकोण यांची नावे आहेत. तर भारतीय अभिनेत्यांमध्ये सलमान खान पहिल्या क्रमांकावर आहे.