यापुढे कधीही अशी चूक करणार नाही असं म्हणत सैफने अमृता सिंगची कॅमे-यासमोर मागित होती माफी
क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागौर यांचा मुलगा सैफ अली खान याचा आज वाढदिवस. 1992 साली ‘परंपरा’ या चित्रपटातून सैफने आपल्या अभिनय कारकिदीर्ची सुरूवात केली. नशीबानेही साथ दिली आणि ‘परंपरा’ सुपरहिट झाला. या चित्रपटामुळे सैफचा मार्ग सोपा झाला. यानंतर आशिक आवारा, पहचान, इम्तिहान, ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी असे अनेक चित्रपट त्याने केले. तुम्हाला कदाचित सैफबद्दलचा एक जुना किस्सा माहित नसावा तर आज तुम्हाला सांगणार आहोत.
तर हा किस्सा आहे सैफ व त्याची पत्नी अमृता सिंगबद्दलचा. सैफला कॅमे-यासमोर अमृताची माफी मागावी लागली, त्याचा हा किस्सा. अमृता व सैफ तेव्हा पती-पत्नी होते आणि सैफ ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या सिनेमात बिझी होता. या सिनेमाच्या प्रीमिअरला सैफ पोहोचला आणि पोहोचताक्षणी लेडी फॅन्सनी त्याच्याभोवती गर्दी केली. यादरम्यान एका चाहतीने सैफला डान्स करण्याची विनंती केली. सैफने तिचे मन राखण्यासाठी तिथेच डान्स करायला सुरुवात केली. पण त्या चाहतीच्या बॉयफ्रेन्डला ही गोष्ट रूचली नाही.
सैफ आपल्या गर्लफ्रेन्डसोबत डान्स करतोय हे पाहून तो भडकला. यावरून भांडण झाले आणि संतापलेल्या त्या बॉयफ्रेन्डने सैफला जोरदार बुक्का मारला. प्रीमिअरस्थळी धडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. अर्थात सैफने पोलिसांकडे न जाता हे प्रकरण तिथेच संपवले होते. पण आपले हे वागणे अमृताला अजिबात आवडलेले नाही, याची जाणीव सैफला झाली होती. यानंतर सैफने कॅमे-यासमोर अमृताची माफी मागितली होती.
यापुढे कधीही अशी चूक करणार नाही, असे वचन त्याने अमृताला दिले होते.