मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (16:26 IST)

सैफ आता प्रभासशी दोन हात करणार

अभिनेता सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षात सैफच्या अभिनयाचे विविध पैलू पाहायला मिळाले आहेत. सेक्रेड गेम्समधला 'सरताज', जवानी जानेमनमध्ये कॅसिनोव्हा, तान्हाजीमधील 'उदयभान राठोड' आणि अशा अनेक भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 
 
आता पुन्हा एकदा सैफ एका वेगळ्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान ओम राऊत दिग्दर्शित 'आदीपुरूष' या सिनेमात अभिनेता 'प्रभास'शी दोन हात करताना दिसणार आहे. सैफ आता 'लंकेश' अर्थात रावणाची भूमिका साकारणार आहे.
 
प्रभासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्याने असे लिहिले आहे की, '7000 वर्षांपूर्वी जगभरातील सर्वात हुशार राक्षस अस्तित्त्वात होता. #Adipurush #SaifAliKhan'. प्रभासच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर खूप कमेंट्स करण्यात आल्या आहेत. प्रभास आणि सैफ अली खान हे दोन्ही ताकदीचे अभिनेते एकाच पडद्यावर पाहता येणार याकरता चाहते उत्सुक आहेत.
 
दरम्यान अभिनेत्री करीना कपूरने देखील सैफ अली खानच्या या भूमिकेबाबत एक रंजक पोस्ट केली आहे. तिने आदीपुरुषचे पोस्टर शेअर करताना असे म्हटले आहे की, 'इतिहासातील सर्वात देखणा डेव्हिल लवकरच घेऊन येतोय, My Man सैफ अली खान'.
 
दरम्यान सैफ अली खान देखील या भूमिकेबाबत उत्सुक आहे. आधी 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' मध्ये ओम राऊत आणि सैफची केमिस्ट्री पाहायला मिळाली. ती भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता ही जोडी पुन्हा काय जादू करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 
दरम्यान हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, मलयाळम, कानडी आणि काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षीपासून सिनेमाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनाची तारीख 2022 मध्ये जाऊ शकते.