वंदना
1978 मध्ये अमिताभ बच्चन यांचे 5 मोठे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांनी 'जंजीर' चित्रपटातून 'अँग्री यंग मॅन' म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली होती.
अमिताभ आणि रेखा यांचा 'गंगा की सौगंध' हा चित्रपट 10 फेब्रुवारी 1978 रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर राखी, रणधीर कपूर आणि नीतू सिंग यांच्यासोबतचा 'कसमें वादे' हा चित्रपट 21 एप्रिल 1978 रोजी प्रदर्शित झाला होता.
संजीव कपूर, शशी कपूर आणि अमिताभ यांचा 'त्रिशूल' हा चित्रपट अवघ्या दोन आठवड्यांनी म्हणजेच 5 मे 1978 रोजी आला होता.
'त्रिशूल'नंतर अवघ्या सात दिवसांनी म्हणजेच 12 मे 1978 रोजी अमिताभ बच्चन यांचा आणखी एक चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला होता.
या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव चंद्रा बारोट होतं. त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाचे निर्माते पूर्णत: कर्जात बुडाले होते. हा चित्रपट चांगला गल्ला जमवेल आणि त्यातून कर्ज फेडलं जाईल, अशी आशा व्यक्त केली जात होती.
पण या चित्रपटाच्या नावावरच आक्षेप घेण्यात आला होता. चित्रपटाचे नाव होते 'डॉन'. हा शाहरुख खान आणि फरहान अख्तरचा 'डॉन' नसून 1978 चा अमिताभ यांचा डॉन आहे.
'डॉन'च्या नावावर आक्षेप
खरं तर त्या काळात 'डॉन' (dawn) नावाचा अंडरगारमेंटचा एक प्रसिद्ध असा ब्रँड होता. त्यामुळेच चित्रपट सृष्टीत कुणीही 'डॉन' चित्रपट खरेदीसाठी तयार नव्हतं.
या गोष्टीचं वर्णन करताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की, “अनेकांसाठी डॉनचं शीर्षक कुतूहलाचा विषय होतं. ते एका बनियानच्या ब्रँडचे नाव होतं. पुढे गॉडफादरच्या आगमनानंतर, डॉन हा शब्द लोकप्रिय झाला आणि तो सामान्य मानला गेला. पण त्या काळी त्याला विनोदी स्वरात वापरलं जायचं.”
कुण्याही वितरकांना 'डॉन' नावाचा चित्रपट खरेदी करायचा नव्हता, इथपर्यंत ही गोष्ट पोहोचली होती.
हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो फ्लॉप घोषित करण्यात आला.
पण काही दिवसांतच चित्रपटाची तिकिटं काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.
'खाइके पान बनारस वाला', हे गाणं ऐकण्यासाठी लोक पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जात असत.
डॉन हा चित्रपट काही वेळातच सुपरहिट ठरला. 'डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है' हा डायलॉग प्रत्येकाच्या ओठावर होता.
45 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज ही एक 'कल्ट फिल्म' मानली जाते.
'खाइके पान बनारस वाला' चित्रपटात नव्हतं
चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर सर्वात आधी 'खाइके पान बनारस वाला' बद्दल बोलूया.
वास्तविक हे गाणं चित्रपटात नव्हेतं. याचा उल्लेख अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. ते लिहितात, "हे नंतर डोक्यात आलं होतं. 'डॉन' चित्रपट पूर्ण झाल्यानंतर खाइके पान बनारस वालाचा समावेश करण्यात आला होता."
चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट हे मनोज कुमार यांचे शिष्य होते. त्यांनी मनोज कुमार यांना 'पूरब और पश्चिम', 'रोटी कपडा और मकान' सारख्या चित्रपटात मदत केली होती.
डॉन तयार झाल्यावर चंद्रा बारोट यांनी मनोज कुमार यांना चित्रपट दाखवला. मनोज कुमार म्हणाले की, सलीम जावेद यांनी लिहिलेली ही कथा इतकी थरारक आहे की त्यात थोडा हलकेपणा आणण्याची गरज आहे.
श्रोत्यांना मधात हलकेपणाचा अनुभव देण्यासाठी चंद्रा बारोट यांनी 'खाइके पान बनारस वाला' हे गाणं समाविष्ट केलं.
बनारसी शैलीतील हे गाणं बनारसचे रहिवासी असलेले गीतकार अंजन यांनी लिहिलं आहे. चित्रपटाचं संगीत कल्याण जी आनंद जी यांनी दिलं आणि हे गाणे किशोर कुमार यांनी गायलं होतं.
किशोर यांनी 'खाइके पान' गाण्यास नकार दिला
अंजान यांचा मुलगा समीरनं 2019 मध्ये 'आज तक साहित्य' नावाच्या कार्यक्रमात सांगितलं होतं, "मुंबईत खाइके पान बनारस वाला गाण्याची रेकॉर्डिंग होत असताना मी 17-18 वर्षांचा होतो.
"किशोर कुमार, अमिताभ बच्चन आणि माझे वडील अंजान रेकॉर्डिंग रूममध्ये होते. जेव्हा मी किशोरजींना पहिल्यांदा पाहिले तेव्हा थक्क झालो. त्यांनी रेशमी लुंगी परिधान केली होती. पायात दोन वेगवेगळ्या प्रकारची चप्पल होती. डोळ्यात काजळ घातलेलं होतं.”
वडिलांनी गाण्याचे बोल ऐकताच किशोरजी म्हणाले की, 'भंग का रंग जमा हो चकाचक', हे काय शब्द आहेत?
ते म्हणाले की, 'मी हे शब्द आधी ऐकले नाहीत, त्यामुळे मी गाणार नाही.' मग जेव्हा त्यांना 'खाइके' पान हा शब्द सांगितला गेला, तेव्हा किशोरजी 'खा के' असा उच्चार करण्यावर ठाम राहिले.
वडिलांनी सांगितलं की 'खाइ के' आणि 'चकाचक' याचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला बनारसच्या रस्त्यांवर जावं लागेल. त्यानंतर किशोरजी काहीच बोलले नाहीत. त्यांच्यासाठी पान मागवण्यात आलं. ते एकदाच गातील आणि रेकॉर्डिंगमध्ये कोणतीही चूक करू नये, असं किशोरजींनी सांगितलं. किशोरजींनी संपूर्ण गाणं एकाच टेकमध्ये गायलं.
खाइके पान बनारस वाला हे गाणं खरं तर 'डॉन' चित्रपटासाठी लिहिलेलं नव्हतं. कल्याण जी आनंद जी यांनी ते देव आनंद यांच्या 'बनारसी बाबू' (1973) चित्रपटासाठी लिहिलं होतं.
पण देव आनंद यांना हे गाणं फारसं आवडलं नाही.
चंद्रा बारोट टांझानियाहून आले होते
गाण्याच्या शूटिंगचे किस्सेही रंजक आहेत. खरे तर आनंदजींना पान आवडत होतं आणि पान खाताना त्यांचे ओठ लाल व्हायचे.
त्यांना पाहून चंद्रा बारोट यांनीही गाण्याच्या शूटिंगपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासाठी भरपूर पान ऑर्डर केले आणि त्यांना खायला दिले. परिणामी अमिताभ यांचे ओठ लाल झाले, पण पानात चुना असल्यामुळे त्यांचे ओठ खराब झाले.
चंद्रा बारोट हे टांझानियाचे रहिवासी होते आणि तिथे ते नोकरी करत होते. पण 1960 च्या दशकात तिथली परिस्थिती खूपच बिकट बनली. अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार झाला. 1966 मध्ये विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलनही झाले.
तिथली वाईट परिस्थिती पाहून बारोट कुटुंबानं टांझानिया देश सोडायचा निर्णय घेतला.
बहीण कमल बारोट यांना भेटण्यासाठी चंद्रा बारोट काही दिवसांसाठी मुंबईत आले होते. कमल या हिंदी चित्रपटातील गायिक होत्या.
'हंसता हुआ नूरानी चेहरा आणि 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ' ही गाणे त्यांनी इतर गायकांसोबत गायली आहेत.
चंद्रा बारोट मुंबईत आले आणि येथेच स्थायिक झाले. मनोज कुमार यांच्या सहवासामुळे त्यांचे नशीबच पालटले.
कर्ज फेडण्यासाठी 'डॉन' करण्यात आला
'रोटी कपडा और मकान' या चित्रपटात ते मनोज कुमार यांना असिस्ट करत होते. या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर नरिमन इराणी हे होते. त्यावेळी त्यांचं मोठं प्रस्थ होतं.
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात, "नरीमन इराणींनी 'जिंदगी-जिंदगी' नावाचा चित्रपट बनवला होता, तो खूप फ्लॉप झाला होता.
इराणी 12 लाखांच्या कर्जात बुडाले. त्यानंतर 'रोटी कपडा और मकान'मध्ये काम केलेल्या काही कलाकारांनी इराणींना सांगितलं की, तुम्ही चित्रपट बनवा आणि गरज पडली तर आम्ही मोफत काम करू.
या चित्रपटाची स्क्रिप्ट सलीम-जावेद यांच्याकडून घेतली होती.
खरं तर डॉन ही एका गुन्हेगाराची कथा असली, तरी प्रत्यक्षात डॉन ही त्या भावनेचीही गोष्ट आहे जिथे चंद्रा बारोट, झीनत अमान, अमिताभ बच्चन आणि प्राण यांसारखे लोक कठीण काळात आपल्या एका सहकाऱ्यासोबत उभे राहिले.
पण चित्रपटादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात, "शूटिंगदरम्यान, लाईट फुटली आणि ती इराणींच्या अंगावर पडली. त्यात ते जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. सर्वांनी पैसे न घेता चित्रपट पूर्ण केला. जेव्हा चित्रपटाने पैसे कमावले, तेव्हा सर्व कलाकारांना पैसे वाटण्यात आले."
या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
पुरस्काराचा जुना फोटो शेअर करत अमिताभ यांनी ट्विट केलं होतं, "त्या वर्षी नूतन आणि मला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 'डॉन' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आम्ही नरीमन इराणींना गमावलं होतं. मी हा पुरस्कार त्यांच्या पत्नीला समर्पित केला होता."
डॉनचं यश
एवढा मोठा हिट चित्रपट देऊनही चंद्रा बारोट यांना दुसरा मोठा चित्रपट देता आला नाही.
2015 मध्ये, बीबीसीच्या सहकारी श्वेता पांडे यांच्यासोबतच्या संभाषणात ते म्हणाले होते, "डॉनचं यश खूप जड झालं आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेवटच्या चित्रपटापेक्षा नवीन चित्रपट नेहमीच चांगला करण्याचा प्रयत्न असतो, पण स्टारकास्ट आणि बजेटच्या अभावामुळे ते होऊ शकले नाही.”
अमिताभ आणि चंद्रा बारोट यांची मैत्री आजही कायम आहे. ते अमिताभला 'टायगर' म्हणून संबोधतात.
ते म्हणतात, "एक नातं एकदाच बनतं आणि आयुष्यभर टिकतं. एकदा मी अल पचिनोचा चित्रपट पाहत होतो, तेव्हा मला 'शमिताभ'मधला अमिताभ यांचा एकपात्री प्रयोग आठवला आणि मी रात्री 4.30 त्यांना वाजता मेसेज केला. अमिताभ यांनी लगेच त्याला उत्तर दिलं."
अमिताभ यांनी शोले, दीवार, चुपके चुपके यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले होते. पण जंजीरनंतर डॉन हा बहुधा पहिलाच सुपरहिट चित्रपट होता, ज्यात अमिताभ यांच्यासोबत दुसरा कुणीही नायक नव्हता.
यानंतर अमिताभ बच्चन यांना वन मॅन इंडस्ट्रीचे बिरुद मिळाले होते. त्याचा पाया डॉनपासूनच मजबूत झाला होता.
डॉन हा त्या काळातील स्टायलिश चित्रपटांपैकी एक होता. तो डाकू आणि सावकारांचा काळ असताना या चित्रपटाचा खलनायक स्टायलिश डॉन होता. अमिताभ यांचा बेल बॉटम, पोल्का डॉटचा शर्ट आणि वेस्टकोट प्रचंड गाजले.
इथं गंमत अशी आहे की, हिंदी चित्रपटांमध्ये दर काही मिनिटांनी कपडे बदलत जाताना दिसतात. पण डॉनमध्ये अमिताभ चित्रपटाच्या शेवटच्या तासापासून ते अगदी शेवटच्या सेंकदापर्यंच एकाच पोशाखात दिसतात. पोलिसांसोबतच्या धावपळीत कदाचित त्यांचा कोट आणि टाय कुठेतरी पडलेला असतो.
रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात, " या चित्रपटात सरोज खान यांनी साइड डान्सरची भूमिका केली होती. त्या रोज तिकीट काढून एकाच थिएटरमध्ये जाऊन नृत्य पाहत असे. काही दिवसांनी थिएटर मालकांना त्या रोज का येतात हे समजल्यावर त्यांनी सरोजसाठी वेगळी सीट राखीव करुन ठेवली.”
झीनत अमान आणि हेलन यांची भूमिका
डॉनमध्ये फक्त अमिताभच नाही तर बाकीची पात्रंही तितकीच दमदार होती. झीनत अमान यांना रोमाच्या भूमिकेत एक आव्हानात्मक भूमिका मिळाली होती. ज्यात त्यांचं काम केवळ रोमान्स करणं नव्हतं.
जसजीत यांच्या पात्रात प्राण खूप महत्त्वाच्या भूमिकेत होते आणि त्या काळात त्यांना नायकापेक्षा जास्त फी मिळायची.
इफ्तेखारच्या भूमिकेत डीएसपी डिसिल्व्हा, वरदानच्या भूमिकेत ओम शिवपुरी, इन्स्पेक्टर वर्माच्या भूमिकेत सत्येन कप्पू, नारंगच्या भूमिकेत कमल कपूर, डॉनच्या टोळीतील सदस्याच्या भूमिकेत मॅक (मॅकमोहन) असो किंवा डॉनच्या मैत्रिणीच्या भूमिकेत अपर्णा चौधरी असो, सगळीच पात्र अविस्मरणीय आहेत.
हेलन यांनी या चित्रपटात छोटी भूमिका केली होती आणि त्यांचं 'ये मेरा दिल' हे गाणं सुपरहिट झालं होतं. त्यावेळी हेलन यांचं वय 40 च्या जवळपास होतं. आणि हा तो काळ होता जेव्हा नायिकेचं वय तिशी ओलांडलेलं नसायचं.
आशा भोसले आणि किशोर कुमार या दोघांनाही डॉनसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.
सलीम-जावेद यांची स्क्रिप्ट
पटकथेबद्दल बोलायचं म्हटलं तर सलीम-जावेद जोडीनं दीवार, शोले किंवा त्रिशूलमध्ये अनेक पात्रे लिहिली होती. यात बरोबर आणि चुकीची रेषा अस्पष्ट अशी होती.
त्याच्या तुलनेत डॉनची कथा कमी-अधिक प्रमाणात सरळ होती. पण पटकथेत प्रचंड ताकद होती. चंद्र बारोट यांनी ती कुशलतेने हाताळली होती.
डॉनच्या यशानंतर हा चित्रपट अनेक भाषांमध्ये तयार झाला. हा तो काळ होता जेव्हा रजनीकांत तमिळ चित्रपटांमध्येही दिसले होते. त्यांना यशही मिळाल होतं. पण 1980 मध्ये बिल्ला नावाने तामिळमध्ये 'डॉन'चा रिमेक बनला तेव्हा रजनीकांत सुपरस्टार झाले.
तेलुगूमध्ये एनटीआर (एनटी रामाराव) यांनी त्यात अभिनय केला. मोहनलाल यांनी मल्याळममध्ये डॉनच्या रिमेकमध्ये काम केलं. 'कोब्रा' नावाने पाकिस्तानात हा चित्रपट बनवण्यात आला होता. 2006 मध्ये शाहरुख खाननं 'डॉन'मध्ये काम केलं आणि 2009 मध्ये प्रभाससोबत त्याचा तेलगूमध्ये रिमेक बनवण्यात आला.
2022 मध्ये अमिताभ यांच्या 80 व्या वाढदिवसा दिवशी जेव्हा 'डॉन' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा लोक हॉलमध्ये नाचताना दिसले.
चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी याचा उल्लेख करताना लिहिलं होतं की, हा चित्रपट त्यांनी लहानपणी सिनेमागृहात पाहिला होता आणि 44 वर्षांनंतर तो पुन्हा सिनेमागृहात पाहण्यासाठी गेले होते.
पठाण चित्रपट हिट होताच लोकांनी शाहरुख आणि डॉन-3चा ट्रेंड करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी डॉनचे पोस्टर आणि शाहरुखसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर लिहिलं होतं, “तीच गोष्ट पुढे चालू ठेवताना डॉन.”
ज्यानं त्यानं याचा आपापल्या परीनं अर्थ काढला.
तेव्हा मी पण विचार केला होता की, अमिताभ आणि शाहरुख खरोखरच 'डॉन'च्या पुढच्या भागात एकत्र दिसले तर...?
(मधु पाल यांच्याकडील माहितीसह)
Published By -Smita Joshi