काय म्हणता उर्मिला मातोंडकर यांच्याकडून करोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन ? प्रशासनाचे चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर उपस्थित असलेल्या कार्यक्रमात करोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. झारखंडमधील पलामू जिल्ह्यात एका हॉटेलचं उद्धाटन करण्यात आलं. उर्मिला मातोंडकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी नियमांचं पालन करण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मेदिनीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात करोनासंबंधी निर्बंधांचं उल्लंघन झाल्याची तक्कार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.दुसरीकडे हॉटेल प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले असून नियमांचं पालन झाल्याचा दावा केला आहे.
उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या अशी माहिती हॉटेल प्रशासनाने दिली आहे. करोनामुळे आपण या कार्यक्रमासाठी दोन तासांऐवजी एक तासच उपस्थित राहू असं उर्मिला मातोंडकर यांनी कळवलं होतं असंही त्यांनी सांगितलं आहे.अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर यांनी बंद खोलीतून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्या रांचीसाठी रवाना झाल्या आणि तेथून मुंबईसाठी विमान पकडलं.