मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2016 (11:17 IST)

Book Review - एक सर्वोत्तम समाजशास्त्रीय लघुकादंबरी - ऑर्डर ऑर्डर

लेखक महादेव आण्णाप्पा कांबळे यांचे ऑर्डर ऑर्डर हे पुस्तक वाचताना आपल्या समाजातील अनेक कमकुवत असलेल्या परिस्थितीचा आढावा मिळतो तसेच भारतीय न्याय व्यवस्था ही जगात सर्वात श्रेष्ठ न्याय व्यवस्था म्हणून पहिली जाते परंतु मराठी मध्ये एक म्हण आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणी प्रमाणे न्यायव्यवस्था ही संथगतीने कशा पद्धतीने चालते याचा आढावा लक्षात घेता येईल आणि काही वेळा न्याय देण्यासाठी इतर ही उपाय योजावे लागतात हे समजते.
 
लेखकाने एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कामातून निर्माण होते म्हणजे आपण समाजातील अनेक व्यक्तींना ते करीत असलेल्या कार्यामुळे ओळखतो. त्यानुसार स्वतः आपण काय काम करतो तशी स्वतः ची ओळख निर्माण होत असते. या पुस्तकातील वकिलाची भूमिका असणारे पात्र सुद्धा अशाच प्रकारची ओळख असणारे आहे. कोणाच्याही मदतीशिवाय आणि स्वतः च्या कुशाग्र बुद्धीने, बोलण्याच्या कौशल्यातून आणि शारीरिक हालचालीतून स्वतः ची एकवेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
 
या पुस्तकामध्ये स्त्रीवर झालेल्या अन्याय आणि त्या नंतर तिच्या जगण्यातील बदलाची स्थिती लेखकाने खूप छान पद्धतीने लिहिली आहे. अचानक आलेल्या प्रसंगामुळे अनेकांचे जीवन उध्वस्त झाली असल्याची लाखो उदाहरणे आज समाजामध्ये आपणास पहावयास मिळतात. स्वतः च्या हातून न केलेल्या चुकीची शिक्षा मात्र आयुष्यभर भोगावी लागते. अशा वेळी जवळ असणा-या व्यक्ती सुद्धा सारड्या सारखे रंग बदलून टिकाकारांच्या भूमिकेत असतात आणि नको त्या शब्दामध्ये, नको त्या व्यक्तीसमोर, आणि नको असलेल्या ठिकाणी टिका केली जाते. त्याचा  एखाद्याच्या मानसिक तसेच शारीरिक त्रासाला कंटाळून अनेकजण नको ते पाऊल उचलतांना आपण पाहतो.
 
आपल्या समाजामध्ये अत्याचार घडलेल्या स्त्री किंवा पुरुषाला वाळीत टाकले जाते. परंतु त्याचा नेमका अपराध काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाही. उलट ज्या गोष्टीबद्दल आपल्याला संपूर्ण ज्ञान नाही अशाच गोष्टींवर अनेकजण तासन् तास गप्पा करत बसतात आणि स्वतः च्या अल्प बुद्धीने इतरांवर घाणेरडे आरोप केले जातात.
 
लेखक महादेव कांबळे यांनी ऑर्डर ऑर्डर या पुस्तकामध्ये घेतलेला काल्पनिक प्रसंग आहे. परंतु समाजामध्ये अनेक ठिकाणी दररोज अशा प्रकारच्या प्रसंगाला अनेकांना सामोरे जावे लागते. त्यांच्या मानसिक आणि शारीरिकतेचा कोणीही विचार करत नाही. मराठीमध्ये एक छान म्हण आहे, दुस-याला सांगे ब्रह्म ज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशा प्रकारचे वर्तन करणा-या व्यक्तीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या व्यक्तीने केलेल्या अपराधाची शिक्षा त्याला कायद्याच्या शिस्त बद्धतेने देता येत नसली तर कायद्याच्या बाहेर जाऊन परंतु मानवतेच्या हिताने योग्य अशा प्रकारचे निर्णय घेतले.
 
लेखकाने या पुस्तकामध्ये समाजातील खूप चांगल्या आणि वास्तववादी विचारला स्पर्श केला आहे. यावर एखाद्या ठिकाणी उत्तमोत्तम नाटक नक्कीच समाजातील सर्वच स्तरातून पसंतीला उतरेल अशी माझी खात्री आहे. लेखक महादेव आण्णाप्पा कांबळे पुढील लिखाणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.
 
- मंगेश विठ्ठल कोळी (लेखक-संपादक-समीक्षक)