बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी पुस्तक परिचय
Written By वेबदुनिया|

'मैं शायर तो नहीं'

PR
मैं पल दो पल का शायर हूँ
पल दो पल मेरी जवानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी कहानी ह

मुकेशच्या दर्दभर्‍या आवाजातलं साहिर लुधियानवीचं हे गीत म्हणजे हिंदी चित्रसृष्टीतील गीतकारांची 'वस्तुस्थिती' आहे. गायक आणि संगीतकाराच्या प्रतिभेला सलाम ठोकणार्‍या या दुनियेत या सगळ्याचा मूळ कर्ताधर्ता 'शब्दसृष्टीचे ईश्वर' असलेला गीतकार मात्र उपेक्षितच रहातो. गाण्याचं कौतुक करताना गीतकाराची फारशी आठवणही होत नाही. नंदिनी आत्मसिद्ध यांनी 'मैं शायर तो नहीं' या आपल्या पु्स्तकातून या गीतकारांवरच प्रकाश टाकला आहे.

साहिर लुधियानवी, शैलेंद्र, हसरत जयपुरी, शकिल बदायुनी, इंदिवर, आनंद बक्षी गुलजार, जावेद अख्तर अशा तब्बल १७ गीतकारांचा समावेश या पुस्तकात आहे. या सर्व गीतकारांचे योगदान नेमके काय हे या पुस्तकात आहेच. पण कल्पनारम्यतेचे दर्शन घडविणार्‍या या गीतकारांच्या प्रतिभेचे पैलूही यात उलगडले आहेत. त्याच्या जोडीने त्यांना आलेले बॉलीवूडचे अनुभव, टिकण्यासाठी केलेला संघर्ष, बॉलीवूडी दुनियेत त्यांना प्रसंगी कराव्या लागणार्‍या तडजोडीही यात आल्या आहेत.

अनेक गीतांच्या जन्मकथा, कवींच्या संघर्षकथा या पुस्तकात आहेत. अफाट प्रतिभा लाभलेला साहिर लुधियानवी गीतकाराच्या नावासाठी किती आग्रही होता. त्याच्यामुळेच कॅसेटवर गीतकाराचे नाव यायला लागले, यासारखा महत्त्वाचा संदर्भ या पुस्तकात सापडतो. शब्दांचा जादुगार असलेल्या साहिरच्या प्रतिभेचे दिग्दर्शनही यात केले आहे. हकिमीचा व्यवसाय करणारे मजरूह योगायोगाने पुढे गीतकार बनतात नि 'जलते है जिसके लिए' सारखं भावकाव्यही लिहून जातात. कधीही गीते लिहिणार नाही असे राज कपूरला ठणकावून सांगणारा 'शैलेंद्र' पुढे राजसोबत 'बरसात'मध्ये येतो आणि ही जोडी पुढे अवीट गोडीचा सांगितिक सुवर्णकाळ निर्माण करते. उर्दू शायरीच्या स्टेजवरून राजसोबतच चित्रसृष्टीत आलेल्या शकिल बदायुनीचा प्रवासही असाच रंजक आहे. काव्य आणि गीत याचा तोल राखून लिहिणारा इंदिवर, बॉलीवूडची नेमकी गरज ओळखून ती 'भागविणारा' गीतकार आनंद बक्षी यांचीही ओळख यातून होते. 'मोरा गोरा अंग लै लै' पासून तरल प्रतिभेचे दर्शन घडविणारा गुलजार आणि आधी संवादातून आणि मग काव्यातून बोलणारा जावेद अख्तर यांच्या प्रतिभेची छान वैशिष्ट्ये पुस्तकातून उलगडून दाखवली आहेत. याशिवाय पंडित नरेंद्र शर्मा, कमर जलालाबादी, राजेंद्र कृष्ण यांचे योगदानही यात येते.

हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकारांची मोठी परंपरा असली तरी यशाचा टिळा काही सगळ्यांच्याच भाळी लागला नाही. याचा अर्थ ते प्रतिभावंत नव्हते, असा नाही. पण यशासाठी सगळे काही जुळून यावे लागते. ते त्यांच्या नशिबी नव्हते. काही जण प्रसिद्ध हिंदी कवींनीही गाण्यांचे हे माध्यम हाताळण्याचा प्रयत्न केला. पण ते तितके यशस्वी ठरले नाहीत. तरीही त्यांची काही गाणी आजही लोकप्रिय ठरली आहेत. भरत व्यास, नीरज हे त्यातले काही कवी. 'ऐ मेरे वतन के लोगो' लिहिणारे प्रदीप यांच्यासारखे कवी पुढे देश व देवभक्तीपर गीते लिहिण्यापुरतेच मर्यादित झाले, हेही पुस्तकातून दाखविले आहे.

अनेक कवींच्या बाबतीतले रंजक किस्से, त्यांचा प्रवास या पुस्तकातून कळतो. त्यामुळे पुस्तक आवर्जून वाचायला काहीच हरकत नाही.

पुस्तकाचे नाव- मैं शायर तो नहीं
लेखक- नंदिनी आत्मसिद्ध
प्रकाशक- ग्रंथायन प्रकाशन
किंमत- २२५.