मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी पुस्तक परिचय
Written By वेबदुनिया|

सुंदर ती दुसरी दुनिया - अंबरीश मिश्र

MHNEWS
आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर सिनेमानं मनावर गारूड केलेलं नाही, अशी व्यक्ती सापडणं ही निदान भारतात तरी गुलबकावलीचं फूल सापडण्याइतकीच दुर्मिळ बाब. तुम्ही कधी तरी लहानपणी आईचं वा मावशीचं बोट धरून सिनेमाला गेलेलाच असता वा शाळेला दांडी मारून सिनेमाची वारी केलेली असता. कॉलेजच्या त्या सुरवंटी दिवसांत कधी सिनेमाची गाणी तुमच्या मनात रुंजी घालत असतात वा नायक-नायिकेबरोबर तुम्हीही त्या ऑर्किडच्या बागांमध्ये जाऊन पोहोचलेले असता... अर्थात या सार्‍या 'पापां'ची उघड कबुली द्यायला अनेकजण तयार होत नाहीत. हिंदी सिनेमे ही त्यांच्या दृष्टीनं अगदीच तुच्छ लेखावी अशी बाब. पण हा सारा निव्वळ ढोंगीपणा झाला. तुम्ही जर सच्चे भारतीय असाल, तर हिंदी सिनेमानं तुमच्या मनाच्या कोणत्या ना कोणत्या सांदीकोपर्‍यात घर हे निश्चितच केलेलं असतं. कुणाच्या मनातलं ते घर मेणाचं असतं, तर कुणाच्या मनातलं शेणाचं. पण कितीही पाऊस कोसळला, तरी ते वाहून जाणं हे कठीणच असतं! त्याचं कारण त्या हिंदी सिनेमानं गेली पाच-सात दशकं या देशात उभा केलेला भूलभूलैया, हेच आहे.

हा भूलभूलैया अगदीच जालीम असतो, अगदी त्या लखनऊच्या सुप्रसिद्ध भूलभूलैयासारखा... खरं तर त्याहूनही अधिक गुंतागुंतीचा. थेट महाभारतातल्या चक्रव्यूहासारखा... लखनऊच्या त्या भूलभूलैयातून वाटाडय़ाच्या मदतीनं का होईना बाहेर येता येतं. पण हिंदी सिनेमाचा चकवा हा एकदा का मागं लागला की कोणतेही दोर मग तुम्हाला मागे खेचू शकत नाहीत. मनाच्या कोणत्या अवस्थेत कधी ते लताचे आर्त सूर तुम्हाला त्या दुनियेत घेऊन जातात, तर कधी दिलीपकुमार तुमच्या हाताचं बोट धरून तुम्हाला त्या विश्वाची सैर करायला लावतो... कधी राज कपूर तर कधी नर्गीस, कधी मधुबाला तर कधी अशोककुमार असे त्या दुनियेतले अनेक साथी हे तुमचे जीवाभावाचे सोबती कधी बनून गेलेले असतात, हे खरं तर तुमच्या ध्यानातही आलेलं नसतं. बघता बघता तुम्ही तुमच्या वास्तवाच्या पातळीवरच्या दुनियेतनं बाहेर पडून कल्पनेच्या तीरावरील 'सुंदर त्या दुसर्‍या दुनिये'त जाऊन पोहोचलेला असता...

प्रख्यात लेखक अंबरीश मिश्र याने आपल्या 'सुंदर ती दुसरी दुनिया' या पुस्तकातनं नेमका हाच चमत्कार घडवून आणला आहे. अंबरीश मिश्र हे नाव मराठी वाचकांनाच नव्हे तर इंग्रजी वाचकांनाही नवं नाही. एकीकडे 'टाइम्स ऑफ इंडिया'सारख्या दैनिकातून मराठी दुनियेचं अस्तित्व कायम टिकवतानाच, अंबरीशनं मराठी लेखनावरचं आपलं प्रेम आणि लोभ कायम ठेवला आहे. खरं तर तो इंग्रजीत लेखन करता, तर आज त्याचं नाव अधिक मोठं तर झालं असतंच शिवाय पदरी चार पैसेही अधिक आले असते. पण मराठी भाषा, संस्कृती आणि मुख्य म्हणजे भोवताली जमलेला मराठी गोतावळा यांच्यावरच्या लोभापोटीच अंबरीश मराठीतून लेखन करत आला आहे. सिनेमा हा अंबरीशच्या अगदी जीवाभावाचा सोबती आणि अंबरीशचं वैशिष्ट्य म्हणजे तो सिनेमा काही त्यानं केवळ थिएटरात बसून समोरच्या पडद्यावर बघितलेला नाही... तो त्या सिनेमाच्या मोहमयी दुनियेत आरपार घुसला आहे. थिएटरातल्या त्या पडद्यावर उमटणारी दृश्यं प्रथम त्या सेल्यूलॉईडच्या पट्टीवर कोरली कशी जातात आणि ती कोरणारे ते थोर थोर कलावंत नेमकं कसं जीवन जगतात, या कुतुहलापोटी अंबरीशनं अनेक थिएटरांच्या वार्‍या तर केल्याच शिवाय अनेक स्टुडिओही धुंडाळले... पण त्या सार्‍या तांत्रिक गोष्टींच्या पलीकडे असलेल्या सिनेमाच्या माणसांमध्ये त्याला खरा रस होता आणि अजूनही आहे. त्यामुळेच तो तिथं भेटलेल्या माणसांशी धडाधडा बोलत गेला आणि त्या माणसांनाही बोलतं करत गेला. कुणी त्याच्याशी सरळपणे बोलत गेलं, तर कुणी त्याला हाड्तहुड्तही केलं. पण त्यानं ते मनावर घेतलं नाही कारण त्या 'दुसर्‍या दुनिये'वरच्या प्रेमापोटी तो ते सारं सहन करायला तयार होता. त्यातून त्याच्या मनात साकार झालेल्या त्या दुनियेचं दर्शन त्यानं आपल्याला घडवलं आहे. खुद्द अंबरीशच्याच शब्दांत सांगायचं तर -
सिनेमाची गोष्ट म्हणजे शुक्रवारची कहाणी...

चित्रसृष्टी म्हणजे भूलोकीची अमरावती. कधीही न पाहिलेलं परंतु हवंहवंसं वाटणारं जग.
आपल्या नगराला लागूनच उभी असते
'सुंदर ती दुसरी दुनिया...'
तिचा हा रसाळ सफरनामा.

या सफरनाम्यात अंबरीश एखाद्या ट्रेलरप्रमाणे आपल्याला त्या चित्तचक्षुचमत्कारी दुनियेचं दर्शन तर घडवतोच पण पुढे तपशीलात जाऊन रणजित फिल्म कंपनी, बॉम्बे टॉकिज या हिंदी सिनेमाचा भक्कम पाया घालणार्‍या कंपन्यांची ओळख करून देतो. तो सारा तपशील आणि त्यातून उभं राहणारं विश्व हे थक्क करून सोडणारं असतं. त्यानंतर अंबरीश आपल्याला घेऊन जातो, तो अशोककुमार, काननदेवी, शमसाद बेगम आणि विजय आनंद यांच्या भेटीला. या भेटी सहजासहजी होणार्‍या नसतात, पण अंबरीशनं त्यांचा पुरता पिच्छा पुरवून त्या घडवून आणलेल्या असतात. त्या भेटीतनं उलगडणारी 'सुंदर ती दुसरी दुनिया' ही शब्दांत पकडता येणं कठीण आहे. ती मूळातूनच अनुभवायला हवी, अर्थातच अंबरीशचा हात धरून...