सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By वेबदुनिया|

बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व

बुद्धाची गणना दशावतारात केली जाते. इ. स. पूर्व 626 या वर्षातल वैशाखी पौर्णिमेला लुंबिनी उद्यानात (नेपाळचा तराई भाग) जन्मलेल्या गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून वेदकालीन यज्ञक्रियेतल्या पशुहहत्यांना, जन्मजात उच्च-नीचतेला लगाम घालण्याचे काम करत समजाला योग्य दिशा दाखविली. त्यामुळेच समाजात बहुजनांना दिलासा मिळाला आणि ते नव मानवतावादी धर्माकडे आकृष्ट झाले. कोसल देशाच्या या राजपुत्राचे (सिद्धार्थाचे) मातृत्व बालपणीच हरपले असले तरी त्याच्या मावशीने गौतमीने त्याचे पालनपोषण केले. योगायोगाने जरा, मृत्यू आणि दैन्याचे क्लेशकारक दर्शन त्याला घडल्यामुळे तो उद्विग्न झाला. काहीकाळ यशोधरेशी विवाह आणि पुत्र राहुलच्या जन्माने तो संसारात रमला. पण अखेर जीवनातील अंतिम सत्याच्या शोधात वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यानी गृहत्याग केला. पुढील भटकंतीत बिंबीसार राजाशी भेट, यग्यांचे शिष्यतत्व, कठोर तपस्या केल्यावर ध्यान मार्गानं त्याला बोधगया येथे पिंपळवृक्षाखाली ज्ञानमार्गाचा साक्षात्कार झाला.

दया, अहिंसा, शांती, मानवतावाद आणि समानता या चिरंतन तत्त्वांनी जीवनातल्या खडतरतेवर आणि दु:खावर मात करता येते हे त्याला समजले. पुढची 45 वर्षे भिक्षूसंघाची स्थापना करून या तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. भिक्षूणी संघाची स्थापना, कर्माधारित उच्च-नीचतेचा पुरस्कार बहुमतांनी संघांचे निर्णय घेणे आणि सर्वसामान्यांच्या पाली भाषेत धार्मिक ग्रंथांचे लेखन ही त्यांची कृतिशील पावले होती. पूर्व आशियातील अनेक देशांत आज हा धर्म फोफावला आहे. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर करताना बौद्ध धर्माची निवड केली. मानवी अक्षय मूल्यांचा अंगिकार आणि प्रसार करणार्‍या गौतम बुद्धांचे निर्वाण इ. स. पूर्व 543 मधील वैशाखी पौर्णिमेलाच झाले!