शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : गुरूवार, 24 मार्च 2022 (08:59 IST)

निवडणूक प्रक्रियेवर अभ्यासक्रम : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सांगली निवडणूक प्रक्रियेबाबतची ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी पुणे विद्यापीठात अशा पध्दतीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. शिवाजी विद्यापीठातही तो लवकरच सुरू होणार असून विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप प्रोग्रॅमबाबतही विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
 
त्याचबरोबर एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असणे हा गंभीर गुन्हा असून अशा मतदारांना त्वरीत नोटीस जारी करावी व अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करा, असे आदेशही देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बुधवारी जिल्हा दौऱयावर आले होते. मतदान नोंदणी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आदींचा आढावा घेतला.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, यांच्यासह सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. यावेळी देशपांडे यांनी मतदान प्रक्रियेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढवावा. महाराष्ट्रात 18 ते 19 व 20 ते 21 या वयोगटातील युवा वर्गाची संख्या जास्त आहे पण तुलनेने त्यांची मतदार नोंदणी कमी आहे. हा गॅप भरून काढणे व लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेमध्ये युवा वर्गाचा महत्वपूर्ण सहभाग घेणे आवश्यक आहे. स्वीप कार्यक्रमांसाठी नाविण्यपूर्ण संकल्पनांबरोबर जाणीवपूर्वक आखणी झाली पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
 
विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकटीकरणात महत्वपूर्ण योगदान द्यावे यासाठी निवडणूक आयोग जाणीवपूर्वक विविधांगी प्रयत्न करीत आहे. निवडणूक प्रक्रियेबाबतची ओळख विद्यार्थ्यांना असावी यासाठी अशा पध्दतीचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. शिवाजी विद्यापीठातही तो लवकरच सुरू होईल, असे सांगून मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप प्रोग्रॅमबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले. या धर्तीवरच जिल्हास्तरावही इलेक्ट्रोल लिट्रसी क्लब सारखे महत्वपूर्ण प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. विद्यार्थ्यांना एकूणच मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी ठेवण्यासाठी महाविद्यालये, विश्वविद्यालये यांच्यासोबत सातत्याने संवाद साधावा. विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे कॅम्प, परिसंवाद आदि नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. मतदार नोंदणी उपक्रमामध्ये बीएलओ हा या यंत्रणेचा कणा आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहीत करावे. त्यांच्या कामांना अधिकाधिक गती देण्यासाठी यंत्रणेकडून प्रयत्न केले जावेत, असेही आग्रही प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.