शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (12:31 IST)

HSC Result: बारावीचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर होणार?

राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याने याचा फटका बारावीच्या निकालावर बसण्याची शक्यता आहे.
 
पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण अशा अनेक भागांत वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचू शकलेले नाहीत.
 
त्यामुळे बारावीच्या मूल्यमापनाचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण होणे शक्य नाही असं काही शिक्षकांचं म्हणणं आहे.
 
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एचएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केली आणि अंतर्गत मूल्यमापनाचे काम 23 जुलैपर्यंत पूर्ण करा असे आदेश शिक्षकांना देण्यात आले आहेत.
 
परंतु यासाठी आता काही दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली आहे.
 
बारावीचा निकाल जुलै अखेपर्यंत जाहीर करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षण मंडळांना केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने बारावीच्या मूल्यमापनासाठी वेळापत्रकानुसार काम करण्यास सांगितले होते.
 
एचएससी बोर्डाने मात्र बारावीचा निकाल वेळेत लागेल असा दावा केला आहे.
 
बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आतापर्यंत जवळपास साडे पाच लाख शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचा तपशील भरला आहे. आम्ही 23 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा डेटा भरुन होईल असे आम्हाला वाटते. तसंच सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
 
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी इंजिनीअरिंग, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र अशा अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बारावीत किमान गुण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष बारावीच्या निकालाकडे लागलं आहे.
 
कसा जाहीर होणार निकाल?
7 ते 23 जुलैपर्यंत शिक्षकांना आपआपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण करायचे आहे.
 
14 ते 21 जुलैपर्यंत प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केल्यानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण एचएससी बोर्डाच्या संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड करायचे आहेत.
 
निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
कनिष्ठ महाविद्यालयाने गुण अंतिम केल्यानंतर सीलबंदपद्धतीने ते विभागीय मंडळांकडे 23 जुलैपर्यंत पाठवायचे आहेत.
 
ही प्रक्रिया झाल्यानंतर बोर्डाकडून अंतिम निकालपत्र तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल.
 
मूल्यमापनाचा तपशील
एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 फॉर्म्युल्यानुसार होणार आहे.
 
दहावीचे 30% गुण, अकरावीचे 30% गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40% गुण या आधारावर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल घोषित केला जाईल.
 
11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)
 
12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%)
 
दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)