पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
सहकार मंत्रीपाटील म्हणाले, राज्यात एप्रिल व मे 2021 मध्ये उद्भवलेल्या कोविड-19 च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड 30 जूनपर्यंत करतात. अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते.
या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.