शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (17:25 IST)

शिवमुद्रा कधी तयार झाली? शिवमुद्रेवर असलेल्या मजकुराचा अर्थ काय?

shivaji rajmudra
भारतीय नौदलाने शुक्रवारी (29 डिसेंबर) ॲडमिरल, व्हाईस ॲडमिरल आणि रिअर ॲडमिरल या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या इपॉलेटचा नवीन लोगो जारी केला. हा लोगो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर रोजी (नौदल दिनी) सिंधुदुर्ग येथे ही रचना बदलण्याबाबत बोलले होते.
मुद्रा म्हणजे काय? पूर्वीच्या काळी पत्रांवर, कार्यालयीन दस्तऐवजावर मारलेला शिक्का म्हणजे मुद्रा.
 
थोडक्यात एखाद्या ऐतिहासिक कागदावर मुद्रा उमटवली असेल तर त्यावरुन त्या कागदाची विश्वासार्हता किंवा मान्यता सिद्ध होते.
 
मुद्रेवरून त्या त्या राजांचं वेगळेपण सिद्ध व्हायचं. इतिहासात विशेष आकर्षित आणि उल्लेखनीय मुद्रा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेकडे पाहिलं जातं.
 
जाणून घेऊया शिवमुद्रेचा इतिहास..
 
मुद्रांचा वापर कधीपासून सुरू झाला?
कागदावर मुद्रा उमटवण्याला नेमकी कधी सुरूवात झाली याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण ज्यावेळी छापखाना सुरू झाला आणि कागद वापरात आले त्यावेळी मुद्रांचा वापर सुरू झाला असावा असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे.
 
पूर्वीच्या काळात पत्रव्यवहार करताना विश्वासार्हता जपण्यासाठी म्हणून मुद्रांची निर्मिती झाली. एका राजाने दुसऱ्या राजाला पाठवलेल्या पत्रातला मजकूर विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही यासाठी मुद्रा हाच एकमेव पर्याय होता. त्यामुळं प्रत्येक राजाची स्वतंत्र मुद्रा होती.
 
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत सांगतात, "हडप्पा आणि मोहंजोदोडो संस्कृतीतही मुद्रांचा वापर केल्याचे इतिहासात उल्लेख आढळतात. मध्ययुगीन काळापासून मुद्राचा वापर होत आलाय. हस्ताक्षर ओळखण्याचे किंवा हस्ताक्षराची ओळख पटवण्याची सोय नसल्यामुळे पत्रावर उमटवलेली मुद्रा हाच एक पर्याय होता.
 
"विशेष म्हणजे ही मुद्रा खरी की खोटी हे देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासलं जायच. लेखनप्रशस्ती शास्त्रानुसार मुद्रांचा वापर आणि ओळख पटवली जायची."
 
शिवमुद्रा कधी तयार झाली?
1636 साली छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजी राजांसोबत बेंगळुरूमध्ये राहत होते. वयाच्या बाराव्या वर्षी 1642 साली शहाजी महाराजांनी शिवाजी राजांना पुणे जहांगिरी सांभाळण्यासाठी पाठवले.
 
त्यावेळी शहाजी राजेंनी शिवाजी राजांना मुद्रा, ध्वज, प्रधान आणि शिक्षक यांच्यासोबत पुणे जहांगिरीकडे रवाना केले होते. याचा उल्लेख शिवभारत या शिवाजी महाराजांच्या चरित्रात आढळतो.
 
शिवाजी महाराजांच्या कार्यालयीन कामकाजाचा पत्रव्यवहार करताना ही शिवमुद्रा उमटवलेले पहिलं पत्र कोणतं याबद्दल इतिहास संशोधकांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. काहींच्या मते, 1642 साली एका पत्रावर शिवमुद्रा उमटवली होती. पण याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.
 
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात की, "1646 मध्ये शिवमुद्रा उमटवलेले पत्र हे पहिलं पत्र आहे यावर संशोधकांचे एकमत आहे. शिवकाळातील 1646 पासून ते 1680 सालापर्यतची अनेक पत्र उपलब्ध आहेत. शिवमुद्रा उमटवलेली 250 पत्रे इतिहास संशोधकांकडे उपलब्ध आहेत."
 
शिवकालीन पत्रावर शिवमुद्रेसह मर्यादा मुद्रेचा वापर
शिवाजी महाराजांच्या काळात कागदपत्रांवर दोन प्रकारच्या मुद्रा उमटवल्या जायच्या. त्यात पत्राच्या माथ्यावर शिवमुद्रा असायची. तर पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्रा असायची.
 
शिवमुद्रा ही मुख्य मुद्रा होती तर मर्यादा मुद्रा ही पत्रातला मजकूर संपल्याची खूण मानली जायची.
 
मर्यादा मुद्रेच्या पुढे कुणीही कोणता मजकूर लिहू नये यासाठी मर्यादा मुद्रेचा वापर केला जायचा.
 
शिवमुद्रेवर असलेला मजकूर आणि त्याचा अर्थ
शिवमुद्रा म्हणजे मुख्य मुद्रा ही अष्टकोनी आहे. विशेष म्हणजे ही मुद्रा अतिशय योग्य मापानुसार आहे. या मुद्रेवर 1 सेमीचे आठ कोन आहेत. श्लोकबद्ध असलेली ही एकमेव मुद्रा असावी असं इतिहास संशोघकांना वाटतं.
 
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
 
शाहसुनोःशिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
 
याचा अर्थ असा आहे की, प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी, शहाजी राजेंचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते.
 
मर्यादा मुद्रेवरचा मजकूर होता, मर्यादेय विराजते. याचा अर्थ इथे लेखनाची मर्यादा म्हणजे शेवट झाला. यासोबतच पत्राच्या मध्यभागी ही प्रधान मुद्रा उमटवली जायची.
 
या चित्रात दाखवलेले हे पत्र शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. हे पत्र म्हणजे किल्ल्यांवर किती खर्च करायचा याचा जाबता असलेले हे पत्र आहे. यात नियोजित कामं आणि त्यासाठी खर्च होणारी होनाची रक्कम याची यादी आहे. या पत्राच्या माथ्यावर शिवमुद्रा आहे तर पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्रा आहे.
 
शिवमुद्रेचे वैशिष्ट्य
शहाजी राजे, जिजामाता यांच्या मुद्रा या फारसी भाषेतील आहेत. मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. शहाजी राजे, जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होता. पण आपल्या भाषेला चालना मिळावी, आपली भाषा संस्कृती टिकावी हा यामागचा उद्देश होता. शिवमुद्रेवर लिहिलेला मजकूर हा देखील राज्याच्या हितासाठी लाभकारक असाच होता.
 
इतिहास अभ्यासकांच्या मते, शहाजी राजांनी शिवरायांची मुद्रा बनवताना बारकाईने अनेक गोष्टींचा विचार केला असावा.
 
संस्कृत भाषेतील ही मुद्रा वापरताना शिवाजी महाराजांच्या हातून स्वराज्य निर्मिती होणार असल्याने ते राज्य जनतेच्या हिताचं असावं. दिवसागणिक या राज्याचा विस्तार व्हावा आणि लोकांच्या कल्याणाचे कार्य शिवाजी राजांच्या हातून घडावं अशी धारणा असावी, असं इतिहास अभ्यासक सांगतात.
 
शिवकाळात पत्रावर कोणत्या जागी मुद्रा उमटवयाची याबाबतही काही नियम होते.
 
सावंत सांगतात, "शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून ज्यावेळी एखादं पत्र कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून लिहिले जायचे त्यावेळी शिवमुद्रा ही पत्राच्या माथ्यावर उमटवली जायची. पण जेव्हा एखादं पत्र नातलग, वडिलधारी माणसं किंवा साधू संताना पाठवलं जायचं त्यावेळी मात्र शिवमुद्रा ही पत्राच्या पाठीमागे उमटवली जायची. अशी दोन पत्रं समोर आली आहेत.
 
"त्यापैकी एक कोल्हापूरच्या घाटगे घराण्याला पाठवलेले पत्र तसंच कान्होजी जेधे यांना पाठवलेल्या पत्राच्या पाठीमागे शिवमुद्रा उमटवली आहे. याचं कारण म्हणजे शिवरायांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या मंडळींना पाठवलेले पत्र हे आदेश नसायचे. तर त्या माणसाप्रती असलेला आदर आणि आपुलकी दाखवण्याच्या दृष्टीने शिवमुद्रा ही पत्राच्या पाठीमागे उमटवली जात होती.
 
सध्या बऱ्याच ठिकाणी उपलब्ध मुद्रा ही चुकीची असल्याचं इंद्रजीत सावंत सांगतात. खरी मुद्रा ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे मुद्रेवर असलेल्या अक्षरांचा क्रम. यात पहिल्या ओळीतील प्रतिपच्चंद्र लेखेव यात मूळ मुद्रेत द्र हा पहिल्या ओळीत आहे. तर इतर उपलब्ध मुद्रांच्या चित्रात द्र हा खालच्या ओळीत आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीत महत्वाची भूमिका असलेली ही शिवमुद्रा म्हणूनच शिवप्रेमींना शिरसावंद्य आहे.
 
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महादेव मुद्रा बनवण्यात आली होती. पण या मुद्रेचा वापर झाल्याची माहिती उपलब्ध नसल्याचं इतिहास संशोधक सांगतात.
 
Published By- Priya Dixit