कॉलर्यात दालचिनीचे चूर्ण फायदेशीर
गिरणगावातील भारतमाता हे मराठी चित्रपटगृह वाचविण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचाही इशारा मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी सोमवारी दिला. यावेळी स्थानिक आमदार बाळा नांदगावकर यांनी भारतमाता चित्रपटगृहाबाबत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळावा आणि ही जागा राज्य सरकारने एन.टी.सी. कडून त्वरित विकत घ्यावी व चित्रपटगृह वाचवावे अशी मागणी केली. सध्या भोपटकर कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या 'भारतमाता चित्रपटगृहाशी' मराठी संस्कृती आणि मराठी कामगारांच्या भावना निगडीत आहेत. त्यामुळे हे चित्रपटगृह न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या 'नॅशनल टेक्सटाईल्स कॉर्पोरेशन'(एन.टी.सी) या संस्थेच्या ताब्यात जाण्यास विरोध करण्यासाठी 'गिरणी कामगार संघर्ष समिती', 'गिरणी चाळ भाडेकरू संघर्षकृती समिती ','मराठी नाटय चित्रपट सृष्टीतील कलाकार'यांनी सोमवारी भारतमाता चित्रपटगृहाजवळ धरणे दिले होते. मुंबईतील मध्यमवर्गीयांना आणि कामगारांना परवडेल अशा माफक दरात सिनेमे दाखविणारे हे चित्रपटगृह ताब्यात घेणार्या 'एन.टी.सी.च्या विरोधात कडक शब्दात ज्येष्ठ कलाकार सुहास भालेकर यांनी आपला निषेध नोंदवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारे हे चित्रपटगृह आम्ही बंद होऊ देणार नाही असे त्यांनी ठणकावले.अखिल भारतीय मराठी लोकनाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुकर नेराळे यांनी आपण हौतात्म्य पत्करू पण भारतमाता जाऊ देणार नाही असे उद्गार काढत सत्ताधारी पक्ष अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला साथ देत नसल्याची खंत व्यक्त केली.भारतमाताची एकही वीट पडू देणार नाही,आम्हाला मल्टीफ्लेक्स नकोत असे सांगत मराठी चित्रपटांच्या दृष्टीने भारतमाता हे महत्वाचे आहे असे शिवसेना चित्रपट शाखा संघाचे अध्यक्ष संग्राम शिर्के म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनीही त्याला दुजोरा देत स्थानिक मराठी माणसाचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे असे आग्रही मत मांडत चित्रपटगृह वाचविण्याची मागणी केली. जर भारतमाता बंद झाले तर मराठी चित्रपटसृष्टी पोरकी होईल असे प्रतिपादन जयप्रकाश भांडे यांनी केले. तर शाहीर मंडळींनी आपल्या शाहीरी अंदाजात विरोध व्यक्त केला. यावेळी शाहीर आनंद सावंत, शाहिर मधु खामकर, मराठी चित्रपट निर्माते विकास पाटील, कुणाल म्युझिकचे निर्माते जमेश वीरा, स्मिता तळवळकर, अनिल गवस, मंगेश कदम, विजय कदम, दिग्दर्शक रमेश साळगावकर आदी मान्यवरांची भाषणे यावेळी झाली.