1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (07:42 IST)

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट? 10 दिवसात तब्बल 241 टक्के रुग्णवाढ

covid
कोरोनाने पुन्हा एकदा देशाला घाबरवायला सुरुवात केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी एकाच दिवसात आठ हजारांहून अधिक नवे बाधित सापडले आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 48 हजारांवर पोहोचली आहे. त्याचवेळी महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाचा बालेकिल्ला बनत आहे. गेल्या 10 दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये तब्बल 241 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली आणि केरळ ही राज्ये देखील चिंता वाढवत आहेत.
 
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासात कोरोनाचे 8048 नवीन रुग्ण आढळले आहेत. तेथे 10 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल केरळ आणि दिल्लीचा समावेश आहे. महाराष्ट्रात आठवडाभरामध्ये 10 हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत. राज्यात आलेल्या नवीन रुग्णांपैकी 61 टक्के रुग्ण हे मुंबईतील आहेत. महाराष्ट्रातील संसर्गाचा दर 7 च्या जवळ पोहोचला आहे.
 
राजधानी दिल्लीतही कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. एका आठवड्यात येथे सक्रिय रुग्ण दुप्पट झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा वेग चिंतेचा विषय ठरत आहे. एका आठवड्यात दिल्लीत कोरोनाचे 2419 नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी दिल्लीत 735 नव्या बाधितांची नोंद झाली होती. राजधानीत सक्रिय रुग्णांचे प्रमाण 4 टक्क्यांवर गेले आहे. त्याचवेळी कोरोनाने एका दिवसात तीन रुग्णांचा बळी घेतला.दरम्यान, उत्तर प्रदेशातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. रविवारी उत्तर प्रदेशात 258 नवीन रुग्ण आढळले आहेत.