बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (08:28 IST)

५ मोटारगाड्यांमधून महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या व्यापारी वाधवावर कारवाई

देशभरात लॉकडाउन असताना मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन एक बडा उद्योजक आपल्या कुटुंबियांसह मुंबईतून महाबळेश्वरमध्ये दाखल झाला आहे. जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून आलेल्या या उद्योगपती व त्याच्या कुटुंबियांसह २३ जणांवर जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठी कारवाई केली आहे.

मुंबईतील मोठे व्यापारी वाधवा हे आपले कुटुंबीय आणि कर्मचारी अशा २३ जणांसह लॉकडाउनचे सर्व नियम धाब्यावर बसवून ५ मोटारगाड्यांमधून महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. महाबळेश्वरमधील नागरिकांनी त्यांना आपल्या फार्महाऊसवर थांबण्यास कडाडून विरोध केला. त्यानंतर प्रशासनाने त्यांना पाचगणीमध्ये उभारलेल्या विलगीकरण कक्षात दाखल केले.

लॉकडाउनचा आणि संचारबंदीचा आदेश तोडल्यामुळे वाधवा कुटुंबावर कारवाई करीत असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. या उद्योगपतीने महाबळेश्वरला येण्यासाठी मंत्रालयातून विशेष परवानगी मिळवली होती. संबंधित उद्योगपतीला परवानगी दिलेली असतानाही सातारा प्रशासनाने त्यांच्यावर धडक कारवाई केली आहे.