शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (07:33 IST)

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत सुमारे १४ टक्क्यानी घट

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत सुमारे १४ टक्क्यानी घट होत असल्याचं दिसून येत आहे. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे. काल ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ५ हजार ५१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र मृतांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८०० जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिली.

जालना जिल्ह्यात आज सकाळी आणखी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४१ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जालना शहरातल्या एका खासगी रूग्णालयातल्या एक डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं, त्यांच्या संपर्कात अनेक कर्मचारी आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. याआधी दोन कर्मचारी बाधित झाल्याचं आढळून आल्यानंतर पुन्हा चार जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले. मुंबईहून अंबड तालुक्यात शिरनेर इथ परतलेली एक व्यक्तीही बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. आतापर्यंत सात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, सध्या रुग्णालयात ३४ रुग्णांवर उपचार आहेत.

हिंगोली जिल्ह्यात तेवीस वर्षीय युवक कोरोना विषाणू बाधित आढळून आला आहे, त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या एकशे पंधरा झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण शंभर रूग्ण आढळले असून त्यापैकी ८५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सापडलेला रुग्ण हा वसमत इथं मुंबईहून परतलेल्या रुग्णांसोबत कामाला होता. तो हिंगोलीतील भिरडा या गावचा रहिवासी असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४१ नं वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ हजार ११७ झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात आज १८ नवे कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आल्यानं जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १३३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला, ६२ जण कोरोना मुक्त झाले, तर १६८ जणांना विलगीकरणात ठेवलं आहे. 

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात   एका 46 वर्षीय  व्यक्तीचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीनं दिल्लीहून प्रवास केला आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. पालघर जिल्ह्यात कोव्हीड-१९ चे एकूण ४०५ रुग्ण आहेत. त्यापैकी १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर २१९ जण कोविडमुक्त झाले आहेत.