कोरोनाबाधिताकडून रुग्णवाहिका चालकाला मारहाण, अंगावरही थुंकला
मालेगावमध्ये कोरोनाबाधित रूग्णाने रुग्णवाहिका चालकाला मारहाण केली असून चालकाच्या अंगावरही थुंकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित रुग्णाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.
या घटनेत शहरातील मनमाड चौफुली भागात असलेले जीवन हॉस्पिटल व मन्सूरा युनानी कॉलेजचे रुग्णालय या दोन ठिकाणी करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णालयात दाखल असणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना सोयीनुसार या दोन्ही रुग्णालयांमध्ये हलविण्यात येत आहे. यानुसार एका करोनाबाधित रुग्णाला महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून जीवन हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र यावर आक्षेप घेऊन जीवन ऐवजी आपल्याला मन्सूरा रुग्णालयात दाखल करावे असा आग्रह या रुग्णाने चालकाकडे धरला. रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या बाहेर जाता येणार नाही असे सांगत चालकाने त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रुग्णाने चालकावर दमबाजी करायला सुरुवात केली. पुढे थेट मारहाण करत चालकाच्या अंगावरही थुंकला.
विशेष म्हणजे महापालिका उपायुक्त कापडणीस यांनी सदरच्या प्रकाराविषयी दुजोरा दिल्याची क्लीप सोशल मीडियावर आता व्हायरल झाली आहे. अशा घटना रोखण्यासाठी जीवन हॉस्पिटलसह अन्य रुग्णालयांमध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी आता रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.