शनिवार, 25 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (08:14 IST)

प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारणार

Corona testing
आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या दोनच लॅब होत्या. आता  त्यांची संख्या ११० वर पोहचली आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रविवारी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हीड -19 आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
 
यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, जालना शहरात आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या  माध्यमातुन नागरिकांना कोरोना विषाणुची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे.  आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबीवर भर देण्यात येत आहे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची  तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. आगामी काळात आरोग्य यंत्रणेसह आपणा सर्वांसमोर कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष व सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.