1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (11:25 IST)

कोरोना लस: देशात 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण मग राज्यात लसीकरण का मंदावलंय?

Corona vaccine: 100 crore dose phase completed in the country
- मयांक भागवत
 
21 ऑक्टोबर 2021ला भारतात कोव्हिड-19 विरोधी लशीचे 100 कोटी डोस देऊन पूर्ण झाले.
 
तज्ज्ञांच्या मते, कोरोनासंसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती पाहता, जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण झाल्यास कोव्हिड-19 ची लाट आपण टाळू शकतो.
 
एकीकडे लसीकरणाचा टक्का हळूहळू वाढत असताना ऑक्टोबर महिन्यात देशभरात आणि महाराष्ट्रात लसीकरणाचं प्रमाण घटल्याचं पाहायला मिळतंय.
 
लशींचा तुटवडा नसताना लसीकरणाचं प्रमाण का कमी झालं? लसीकरण कमी झाल्याने तिसऱ्या लाटेची भीती वाढेल का? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
देशात लसीकरणाची परिस्थिती काय?
लसीकरणाचा आकडा 100 कोटी डोसेसपर्यंत पोहोचला असला तरी लशीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 28 कोटी आहे.
 
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात कोरोनाविरोधी लसीकरणाने वेग घेतला. हळूहळू लसीकरणाचा आकडा आठवड्याला तीन कोटींपेक्षा जास्त पोहोचला.
 
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही लसीकरणाचं प्रमाण सातत्याने 4 ते 5 कोटीपर्यंत वाढत गेलं. पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरण मंदावल्याचं पाहायला मिळतंय.
 
जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचं प्रमाण कमी झालंय का? हे तपासण्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या को-विन पोर्टलचा अभ्यास केला.
 
केंद्र सरकारच्या Co-win पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या सुरूवातीपासून देशभरात लसीकरणाचा आकडा दर दिवशी 1 कोटींपेक्षा कमी नोंदवण्यात आलाय.
 
1-नवरात्रीच्या पहिल्या दिवशी (7 ऑक्टोबर) 52 लाख डोसेस देण्यात आले
 
2-दसर्याच्या दिवशी (15 ऑक्टोबर) फक्त 9 लाख 24 डोसेस
 
3- नवरात्रीच्या काळात 4 कोटी 53 लाख डोस देण्यात आले
 
(स्रोत-CoWin)
 
सप्टेंबर महिन्यात 18.74 कोटी तर ऑगस्ट महिन्यात देशभरात 18.38 कोटी कोरोनाविरोधी लशीचे डोस देण्यात आले होते. मे महिन्याच्या तुलनेत याचं प्रमाण चार पट होतं.
 
महाराष्ट्रात लसीकरण मंदावण्याची कारणं काय?
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातही लसीकरण कमी झाल्याचं पहायला मिळालंय.
 
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात दर आठवड्याला लशीचे 50 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले होते. तर, 18 ते 24 सप्टेंबर च्या आठवड्यात 55 लाख डोस देण्यात आले.
 
पण ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात लसीकरणाचं प्रमाण 35 ते 43 लाखांपर्यंत खाली आल्याचं दिसून आलं.
 
(स्रोत- आरोग्य विभाग)
 
लसीकरण मोहिमेतील अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात. ऑक्टोबर महिन्यात लसीकरण कमी होण्याची चार प्रमुख कारणं असू शकतात,
 
1- नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. त्यामुळे लस घेण्यासाठी बाहेर पडले नसावेत.
 
2- सणांच्या दिवसात लस घेतल्यानंतर आजारी पडू नये म्हणून लोक टाळाटाळ करत असण्याची शक्यता
 
3- कोव्हिशिल्ड लशीच्या डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर
 
4- रुग्णसंख्या कमी होत असल्याने बाहेरगावी सुट्टीवर गेलेले नागरिक
 
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होऊ लागलीये. रस्त्यावर, बाजारपेठेत लोकांची गर्दी होताना पहायला मिळतेय. कोरोनाची भीती कमी झाल्याने लसीकरणावर परिणाम झालाय?
 
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "लोकांमध्ये कोरोनाची भीती आता राहिलेली नाही. लसीकरण कमी होण्यामागचं हे एक प्रमुख कारण आहे."
 
लोक आजाराला गांभीर्याने घेताना दिसून येत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सर जे.जे रूग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर्स नाव न घेण्याच्या अटीवर म्हणतात, "ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचं प्रमाण कमी झालंय हे खरंय."
 
पण सरकारी रुग्णालयात लसीकरण मोहीम योग्य सुरू असल्याचं ते सांगतात.
 
2009 साली पुण्यात स्वाईन-फ्लूची साथ आली होती. त्यावेळचा अनुभव सांगताना डॉ. भोंडवे पुढे म्हणतात, " स्वाईन-फ्लूची साथ असताना लोक लस घेण्यासाठी पुढे येत होते. पण केसेस कमी झाल्यानंतर लोकांनी लस घेण्याकडे दुर्लक्ष केलं."
 
महाराष्ट्रात आत्तापर्यंत 9 कोटी 23 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाविरोधी लशीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.
 
लसीकरण कमी झाल्याने तिसऱ्या लाटेचा धोका वाढेल?
राज्यात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट ओसरताना पहायला मिळतेय. पण तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे.
 
डॅा भोंडवे सांगतात, "पुढील काळात लसीकरण न झालेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे."
 
कोरोना व्हायरसचा नवीन म्युटंट आला तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जातेय.
 
ते पुढे म्हणाले, "दिवाळीनंतर सरकारने पोलिओच्या mop-up ड्राइव्हप्रमाणे घराघरात जाऊन लोकांना लसीकरणासाठी बाहेर काढलं पाहिजे."
 
कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची गरज असलेल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
 
फोर्टीस एस.एल रहेजा रूग्णालयाचे इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॅा पारितोष बघेल म्हणतात, "लसीकरण न केल्यास धोका नक्कीच वाढेल. त्यामुळे लसीकरण झालंच पाहिजे."
 
जास्तीत जास्त लोकांनी लस घेतल्यास कोव्हिड-19 पासून सुरक्षा मिळेल, असं ते पुढे सांगतात.
 
दिवाळीच्या दिवसात लसीकरणावर परिणाम होईल?
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॅा इश्वर गिलाडा म्हणाले, "दिवाळीत लसीकरण थोडं कमी होईल. त्यानंतर लसीकरणात पुन्हा वाढ होईल." पण लसीकरण कमी झाल्याने कोरोनारुग्ण वाढतील असं नाही.
 
ऑक्टोबर महिन्यात राज्याला केंद्राकडून 2.2 कोटी डोस मिळणार होते. राज्य सरकारने लसीकरणासाठी मोहीम सुरू केली होती.
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते, "दर दिवशी 15 लाख डोस देण्याचं सरकारचं टार्गेट आहे."