मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (14:43 IST)

कोरोना : उपचार करत असलेल्या डॉक्टरांना आता कोणती भीती सतावतेय?

सौतिक बिस्वास
त्या व्हेंटिलेटरवर होत्या आणि कोव्हिड-19 होऊन गेल्यानंतर बराच काळ जाणवणाऱ्या परिणामांना त्या तोंड देत होत्या. व्हेंटिलेटर काढून टाका, मला आता जगायची इच्छा नाही, असं त्या वारंवार डॉक्टरांना बोलत होत्या.
 
उन्हाळ्याच्या दिवसांत कोरोनावर मात करून सुमारे एका महिन्यांच्या उपचारांनंतर त्या घरी परतल्या होत्या. पण घरी आल्या तरी त्यांना ऑक्सिजनवरच ठेवण्यात आलं होतं.
 
एका महिन्यानंतर त्यांना पुन्हा रोहतकच्या पंडित भागवत दयाल शर्मा पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समध्ये दाखल करावं लागलं.
 
त्यांना लंग-फायब्रोसिसला तोंड द्यावं लागत होतं. या आजारात फुफ्फुसांचा नाजूक भाग दगावला गेलेला असतो. संसर्ग बरा झाल्यानंतरही त्यावर इलाज करता येत नाही.
"मला जगायचं नाही, मला या नळ्यांपासून स्वातंत्र्य हवंय."
 
"कोरोना झाल्यानंतर मला तुम्ही का वाचवलं?" असं त्या सारख्या म्हणायच्या.
 
बराच काळ उपचार करूनसुद्धा त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांची अशी अवस्था झाली होती.
ICU कक्षात रुग्णांची देखभाल करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी गंभीरपणे संसर्गाला बळी पडणे. तासनतास काम करत राहणं आणि मृत्यू यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
डॉ. कक्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांपासून या रुग्णालयात शेकडो कोव्हिड रुग्णांची सेवा-सुश्रुषा केली आहे. पण संसर्ग वाढत गेला आणि रुग्णांची संख्याही वाढत गेली.
क्षमतेपेक्षा अधिक संख्येने रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागले. बऱ्याचवेळा रुग्ण अखेरच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरही ताण येऊ लागला.
 
दिवसेंदिवस सलग काम केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना शारीरिक थकवा आणि मानसिक तणाव या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
 
डॉ. कक्कर यांनी सांगितलं, "इथं एक रुग्ण होता, हा रुग्ण बरा होईल, अशी अपेक्षा होती. पण त्याने नंतर धीर सोडला. आता मला जगायचंच नाही, असं तो सारखा म्हणायचा. त्या रुग्णाचं दुःख शब्दांत सांगणं कठीण असतं."
 
मुंबईचे रहिवासी असीम गर्गवा 31 वर्षांचे आहेत. ते पेशाने डॉक्टर आहेत. KEM सरकारी रुग्णालयात ते काम करतात. त्यांनीही बीबीसीला आपला अनुभव सांगितला.
 
त्यांच्या आणि डॉ. कक्कर यांच्या अनुभवात फारसा काही फरक नाही.
 
त्यांनी कहाणी सांगितलेल्या रुग्णाचं वय जास्त नव्हतं. आपल्या घरात कमावणारा तो एकटाच होता. पहिल्यांदा त्याला कोरोना संसर्ग झाला. संसर्गातून तो बरा झाला. पण ज्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळणार होता, त्याच्या आदल्या दिवशी त्याला हृदयविकाराचा झटका आला.
 
सुमारे दोन आठवडे तो लकवाग्रस्त स्थितीत होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
 
त्याच्या फुफ्फुसांमध्ये ब्लड क्लॉट (रक्ताची गाठ) झाली होती. वैद्यकीय भाषेत याला पल्मोनरी इंबोलिज्म असं म्हटलं जातं. कोरोना संसर्गानंतर काही रुग्णांमध्ये असे परिणाम दिसण्याची शक्यता असते.
डॉ. गर्गवा सांगतात, "तो एक तरूण मुलगा होता. त्याचं शरीर उपचारांना चांगला प्रतिसाद देत होतं. तो कोरोना व्हायरसवर मात करू लागला होता. घरी परतण्याची तयारी त्याने सुरू केली होती. पण दुर्दैवाने त्याला या व्याधीने ग्रासलं, त्यातून तो बाहेर पडू शकला नाही."
 
डॉ. गर्गवा पुढे सांगतात, "त्याच्या पत्नीला ही गोष्ट सांगणं अत्यंत कठीण काम होतं. तो रुग्ण आमच्यासोबत 45 दिवस होता. हा आमच्यासाठीही एक धक्का होता. हा आजारच असा आहे. याबाबत काहीही सांगणं अतिशय कठीण आहे."
 
नाईलाज आणि भीतीचं वातावरण
कोव्हिड-19चा प्रसार संपूर्ण भारतात झालेला आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांचा महापूर आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एक कोटी लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी 1 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
भारतात कोरोना साथीविरोधात लढण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवण्यात आली, पण आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपेक्षेनुसार नाही. कोरोना रुग्णांची देखभाल करण्यासाठी ही कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे.
 
अशा परिस्थितीत हॉस्पिटल्सनी प्रत्येक डॉक्टरला प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं. प्लास्टीक सर्जन असो वा ईएनटी स्पेशलिस्ट, किंवा भूलतज्ज्ञ. प्रत्येक प्रकारच्या डॉक्टरला कोव्हिड-19विरुद्ध लढण्यासाठीचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
पण हेसुद्धा पुरेसं नाही. आपण पूर्णपणे थकलो असल्याचं आरोग्य कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
थंडीचे दिवस येताच रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. अशा स्थितीत डॉक्टरांमधील ऊर्जा संपत चालली आहे.
 
याबाबत बोलताना डॉ. कक्कर सांगतात, "वास्तविक पाहता, कोरोना साथ रुग्णालयांतून कधी संपलीच नाही. पण बाहेरच्या जगात वावरणाऱ्या लोकांना याची कल्पना नाही."
 
पण फक्त कोरोना साथीमुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थिती अशी बनली, असं नाही. त्यासोबतच एका जीवघेण्या आजाराचा धोकाही त्यांना आहे.
 
डॉक्टरांच्या मते, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तो कोरोनाचा रुग्ण असं ढोबळमानाने मानलं जातं. पण त्याला हृदयाशी संबंधित आजार असू शकतो, किंवा डेंग्यू, अॅसिड रिफ्लक्स यांचंही ते लक्षणं असू शकतं.
सध्याच्या काळात कोव्हिड साथीमुळे डॉक्टर आणि नर्सना काळजी घ्यावी लागते. कोरोना चाचणीसाठी रुग्णाचा स्वॅब घेणं, संशयित रुग्णांना एका वेगळ्या कक्षात ठेवणं, चाचणी अहवाल कळेपर्यंत त्यांना आतच राहण्यास सांगणं या गोष्टी करणं क्रमप्राप्त असतं.
 
गंभीरपणे आजारी पडलेले रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन थेट अतिदक्षता विभागात येतात. या रुग्णांचा विश्वास जिंकणं अतिशय अवघड काम असतं.
 
आरोग्य कर्मचारी थकले
एका डॉक्टरनी मला सांगितलं, "डॉक्टर आणि नर्सेस तासनतास सलग काम करत आहेत. हातात ग्लोव्हज आणि पीपीई किट घालून काम करता करता आपण एखाद्या शवपेटीत बंद असल्याप्रमाणे वाटू लागतं.
 
त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये काढलेले काही फोटो मला दाखवले. यामध्ये काही फोटो रात्रीच्या शिफ्टचे होते. यामध्ये रुग्णालयाच्या बाकांवर ते मृतदेहांप्रमाणे पडलेले होते.
 
जून महिन्यात डॉ. गर्गवा यांनी लांबलचक शिफ्टचं काम संपवल्यानंतर आपल्या हातांचा एक फोटो काढला होता. घामेजून सुरकुत्या पडलेल्या हातांचा तो फोटो त्यांनी सोशल मीडियावरही टाकला होता.
 
त्यांच्या हाताची रबरी हातमोज्यांमध्ये तासनतास राहिल्यामुळे ही गत झाली होती.
 
या काळात अनेक कर्मचारी कित्येक महिने आपल्या घरी गेले नाहीत. दिल्लीतील एका डॉक्टरने तर सहा महिन्यांनी आपल्या मुलाची भेट घेतल्याचं मला सांगितलं.
 
कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयातच राहायचे. काहीजण हॉटेलात राहायचे.
डॉ. कक्कर यांनी सुटी मिळाली त्यादरम्यान त्यांना संसर्ग झालेला होता. त्यामुळे त्यांनी होम-क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.
 
नोव्हेंबरअखेरीस दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या प्राची अग्रवाल यांनी कोव्हिड-19 ची नवव्या राऊंडची ड्युटी सुरू केली.
 
एक राऊंड म्हणजे ICU मध्ये सलग 15 दिवस प्रत्येकी आठ तासांची ड्यूटी.
 
यानंतर एक आठवडा हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावं लागतं. त्यानंतर प्रत्येक वेळी कामावर परतताना त्यांना चाचणी करून घ्यावी लागते.
 
डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं, "सध्याचं आयुष्य विचित्र आहे. रुग्णांची तपासणी, मृत्यू झालेलं पाहणं, हॉटेलात राहणं, स्वतःला जगापासून वेगळं ठेवणं."
 
दुसऱ्यांचा जीव वाचवणारे डॉक्टर आणि नर्स यांना आपल्या व्यक्तीला गमावल्याचं दुःख करण्यासाठीही वेळ मिळाला नाही. या संसर्गाने अनेकांनी आपल्या निकटवर्तीयांना गमावलं आहे. भारतात कोरोनामुळे तब्बल 660 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश डॉक्टर रुग्णालयांमध्ये काम करत होते.
मुंबईतल्याच एका डॉक्टरांनी मला सांगितलं, "माझे काही मित्र थकव्याशी संबंधित औषधं घेत आहेत. त्यांना थेरपीही करून घ्यायची आहे."
 
ते सांगतात, "लोकांना मास्क घालून लग्न-समारंभांमध्ये जाताना पाहून मला राग येतो. साथ संपल्याप्रमाणे सगळे वागत आहेत."
 
वारंवार कोव्हिड योद्धा म्हटल्याचाही काहींना त्रास होत आहे.
 
डॉ. कक्कर सांगतात, "आपण त्या काळाच्या पलिकडे गेलो आहोत. मला कुणी हिरो म्हणत असेल तर मी त्यांना थांबवते. आता यामुळे काही होत नाही. प्रोत्साहन देण्याचीही एक सीमा असते."
 
द्वैपायन मुखर्जी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एक मेडीकल अँथ्रोपोलॉजिस्ट आहेत. त्यांच्या मते, "थकव्यामुळे भारतीय डॉक्टरांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांची सहनशक्तीची परीक्षा बघितली जाऊ नये."