शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 5 मार्च 2020 (14:38 IST)

कोरोनातून जगाला कायमस्वरूपी रिसेट बटण मिळेल : महिंद्रा

चीनमधून पसरण्यास सुरू झालेल्या कोरोना व्हारसने जगभरात दहशत माजवली आहे. या परिस्थितीतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, असे मत उद्योजक आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. सध्या आलेले संकट एक दिवस निघून जाईल, पण यामुळे आपल्याला एक कायमस्वरूपी रिसेट बटण मिळेल, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले.
 
सध्या अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना घरातूनच काम करण्याची मुभा देत आहेत. यावर आनंद महिंद्रा म्हणाले, ' या परिस्थितीत आपण काही गोष्टी नक्कीच  शिकू. पहिली म्हणजे वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढेल, डिजिटल कॉन्फरन्स वाढतील, मीटिंगच ऐवजी व्हिडिओ कॉल्स होतील आणि कमी हवाई वाहतूक होईल, ज्याने प्रदूषण टाळता येईल.' यासोबतच आपण आणखी काय-काय करू शकतो याबाबतही त्यांनी सोशल मीडियावर विचारणा केली.
 
गुगलने आयर्लंडची राजधानी डबलिनमधील मुख्यालयात हजारो कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे मुख्यालय रिकामे दिसून आले. एका कर्मचार्‍यामध्ये काही लक्षणे दिसून आली होती. हा कोरोना व्हायरसच असल्याचे स्पष्ट नव्हते. पण व्यवस्थापनाने तातडीने पुढील सूचना मिळेपर्यंत वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. ट्विटरनेही जगभरातील आपल्या 5 हजार कर्मचार्‍यांना शक्य तसे घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. चीनमधून सुरू झालेल्या या व्हारसने विश्व व्यापले आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची काळजी म्हणून घरातून काम करण्याची मुभा देत आहेत.