शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (08:20 IST)

आरोग्य संस्थांमध्ये खाटा वाढवितानाच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचे व्यवस्थापन करा

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा. ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे व्यवस्थापन तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा. पॉझिटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरणा ऐवजी संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा. जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.
 
आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले, वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य संस्थांमधील कमतरता दूर करा. ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही याकडे लक्ष द्या. वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोवीड सेंटर्स सुरू आहेत त्यांना ही प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात यावे, जेणेकरून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत रुग्णालये सक्षम होतील.
 
कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असून ज्या जिल्ह्यांचे प्रमाण कमी आहे, त्यांनी ते वाढवावे त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीने अन्य विभागातील मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. पॉझीटिव्ह रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 
काही  जिल्ह्यांचा मृत्यूदर वाढतोय त्याचे कारण शोधा. रुग्ण उपचारासाठी उशीरा दाखल होत असून त्यांनी वेळेवर दाखल व्हावं यासाठी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून लक्षणं दिसताच रुग्ण वेळेवर रुग्णालयात येतील. त्यासाठी ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घ्यावी आणि लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी करतानाच अनावश्यक उपचार न करण्याबाबत सूचना देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना नाकारला जाणार नाही याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी विशेष लक्ष द्यावे. कोविड सेंटर्समधील वातावरण, स्वच्छता, भोजनाचा दर्जा, स्वच्छतागृहांची साफसफाई यासाठी नियंत्रण ठेवावे, आवश्यकता भासल्यास अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.